दाटून कंठ येतो.....

येतेय येतेय म्हणता म्हणता आली आणि एका आठवड्यातच गेलीसुद्धा ! एकदा बारावी झाली आणि मुलं घराबाहेर पडली की दूर गेलीच म्हणायला हवीत.  पुढच्या शिक्षणासाठी एकदा पाऊल घराबाहेर पडलं की समजावं…. आता आपल्याला त्यांच्या दूर राहण्याची सवय करायला हवी.  जोपर्यंत वेळ येत नाही……. तोपर्यंत त्याची जाणीवही होत नाही.  पण जेव्हा ती वेळ येते ना……. जीव अक्षरशः कासावीस होतो.

बारावी आली की अभ्यास, ट्‍यूशन्स, परीक्षा ह्यातच सगळा वेळ संपून जातो आणि मग ऍडमिशन्स साठी धावपळ…! फार चटकन निघून जातं हे वर्ष ! ऍडमिशन होईपर्यंत जीवाची घालमेल….. आणि ती एकदा झाली की हुश्श !  मग पुढचे सोपस्कार…! होस्टेल वर राहणार….मग काय …नवा संसारच उभारून द्यायचा असतो.  अगदी भांड्यांपासून तर गादी, पांघरुणापर्यंत सगळी तयारी. 

गणपतीचा छोटासा फोटो, त्याच्यासमोर लावायच्या उदबत्तीच्या घरापासून सुरवात होते यादीची आणि छोट्या मोठ्या गोष्टी लिहिता लिहिता चक्क पानभर वस्तू होतात.  लेक सुद्धा शेवटी कंटाळते…….म्हणते…..अगं मी काय सासरी निघालीये काय गं…… जरा बाहेर पडलं होस्टेलच्या तर सगळी दुकानं आहेत.  आई…….. तू म्हणजे ना…..!! पण असू दे गं…… घाईच्या वेळी सगळं आपल्या जवळ असलेलं बरं म्हणून बळेबळेच सगळं सामान तिच्या खोलीत पोचतं.  सगळं सामान अगदी मनासारखं लागल्यावर सुरू होतो सूचनांचा भडिमार……हे कर……ते करू नकोस……हे वेळेवर कर….आणि ते चुकूनसुद्धा करू नकोस……. एक नाही तर असंख्य……  कांट हेल्प इट!! मला असं वाटतं……की हा आईचा गुणधर्मच असावा  

लेकीचं हे छोटं विश्व….. हळूहळू विस्तारत जातं ! आई-पप्पांच्या परिघाबाहेरही तिची दुनिया पसरते.  ती खरं तर पंख पसरायला लागते……. नव्याच सापडलेल्या दुनियेत ती छान विहरत असते, नवा अनुभव घेत असते.  कधी चुकते, कधी धडपडते…… पुन्हा उठते….. पुन्हा सावरते…..! हा अनुभवच पुढे जगण्याच्या धडपडीला उपयोगी पडतो.  पण आई-पप्पांचा जीव मात्र कसावीस होत असतो.  आपलं लेकरू असं एकदम आपल्या पांघरुणातून जगात उघड्यावर ठेवताना घालमेल होत असते……जीवाला अगदी चैन नसते.  नेहमी तिचा सोबत असणारा वावर आता फक्त आठवणीतच असतो. 

[float=font:vijay;place:top;]हळूहळू ही सवय सुद्धा होते. मध्ये मध्ये आठवणींचे ढग दाटून येतातच. पण फक्त पाऊस पाडून हलकेच निघूनही जातात. तिकडे लेक सुद्धा नव्या जगात रमलेली असते![/float] तीन-चार महिने निघून जातात असेच.  परीक्षा होते…… आणि तिची इकडे येण्याची वेळ जवळ येते.  सुस्त चाललेल्या आयुष्याला एकदम खडबडून जाग येते  लेकीच्या येण्याचे वेध लागतात आणि सुरू होतो काउंटडाऊन !!

तिकडून निघताना पुन्हा सूचनांचा मारा…… पोचेपर्यंत डोळ्यात जागलेली रात्र कशीबशी सावरत एयरपोर्टवर पोचतो.  सगळ्या फ्लाईट्स बिफोर टाईम….. फक्त हिचीच लेट…….चक्क दहा मिनिटं !  एक एक मिनिट युगायुगासारखा संथ वाटतो.  आणि दुरून ती दिसते……!! मनातला नाचरा मोर….डोळ्यात मात्र पाणी आणतो ! 

जवळ पोचायच्या आधीच मन तिच्याजवळ पोचतं….पाठोपाठ पाय असतातच ! घट्ट मिठीत  तिचा इतक्या दिवसांचा दुरावा अगदी पुसून टाकायचा असतो…. तिचेही डोळे भरून येतात आणि पप्पाही त्या पावसामध्ये चिंब भिजतात !

किती बोलू आणि किती नको असं होऊन जातं.  अद्वैतचं इतक्या दिवसांचं भांडायचं पण राहून गेलेलं असतं…. आईशी वाद किती दिवसात घातला नसतो.  पप्पांजवळ हट्टीपणा केलेला नसतो……सगळं सगळं भरून काढायचं असतं.  पप्पांची सुद्धा सुट्टी मग अजून काय हवं !  कुठे कुठे जायचं हे तर आधीच प्लॅन झालेलं असतं….आईची किचनला अगदी अधिकारातली सुट्टी असते.  मग काय….सकाळी मस्तपैकी आरामात उठायचं…ब्रेकफास्ट करून……..लगेच भटकंती सुरू.  दिवसभर भटकून….. घरी आल्यावर रात्री पत्त्यांचा डाव…! आरडाओरडी करत खेळलेली सत्ती लावणी….. !!

दिवस कसे भुर्रकन उडाले.  त्यातले दोन पूर्ण दिवस मैत्रिणींसाठी…. हे काय अगदी जायचीच वेळ  आली ! सामानाची बांधाबांध करेपर्यंत असं वाटतंच नव्हतं की आता लेक जाणार म्हणून.  घरातून नमस्कार करून जेव्हा निघालो………तेव्हा मात्र जीव खालीवर व्हायला लागला…… आता पुन्हा जाणार…! एक मोठा आवंढा घशात….आणि डोळ्यात पुन्हा दाटलेले ढग ! तिची मात्र लगबग उडालेली….उद्या पोचल्यावर कॉलेज सुरू…. !! तिच्या डोक्यात तिचं विश्व पुन्हा डोकावायला लागलेलं पण आम्ही मात्र अजूनही तिच्याच अस्तित्वात रेंगाळलेलो….!!

विमानाची वेळ होते….. इम्मिग्रेशन पार करून ती दिसेनाशी होते. जाताना टाचा उंचावून केलेला बाय मात्र सुखावून जातो. अश्रूंच्या पडद्यामुळे सगळंच धूसर होतं…….. मात्र मनात तिच्या आठवणी अगदी लख्ख !!

आता कळतंय….. आईचे डोळे आपण जाताना का सारखे पाऊस पाडायचे…..!!

जयश्री