अवेळीच केव्हा दाटला अंधार...

कवी ना. धो. महानोर हे खरेतर निसर्गकवी पण त्यांच्या कविता केवळ प्रणयरम्य व शृंगाररस युक्त असतात म्हणून वाचणारे व ऐकणारे अनेकजण असतील. हा खरे तर त्यांच्यातील कवित्वाचा अपमान आहे. त्यांच्या कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.

श्रीधर फडक्यांची 'काही बोलायाचे आहे ही ध्वनिफित जेव्हा ऐकली तेव्हा मला ही कविता विशेष भावली. किंबहूना पुढे कित्येक दिवस ती माझ्या मनांत रेंगाळत राहिली. विशेषत: त्यातील दुसरे कडवे. त्यातील करुण रस,  विरह यातना मनाला चटका लावून जातात. महानोरांच्या कवितांना ग्रामीण मराठीचा सुगंध आहे. अगदी थोड्या पण अचूक शब्दात ते कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कविता वाचताना डोळ्यापुढे जणू शब्दचित्रच उभे राहते.

गावाबाहेरील एखादे निर्जन स्थळ, घरच्यांची करडी नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी आपली नायिका - अभिसारिका, त्या नायिकेची वाट पाहत संकेतस्थळी एकाकी उभा असलेला तो प्रियकर आणि उशीरा का होईना पण दिलासादायक असे तिचे ते येणे.

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले,
हासतांना नभ कलून गेलेले

अनेक दिवसांनंतर असा एकान्त मिळाल्याने मोहरून गेलेले ते प्रेमी युगुल एकमेकांकडे भावूकतेने निशब्दपणे पाहात राहतात. हृदयांत, मनांत आनंदाचे कारंजे फुलले आहे आणि यामध्येच बरांच काळ निघून जातो व दिवस कलतो.

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर,

तिच्या काचोळीला चांदण्याचा जर

दिवस कलून रात्रीचा पहिला प्रहर चालू होतो. तो आणि ती दोघेही भानावर येतात.

तो तिच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि त्याला वाटते जणू आकाशातील चांदण्याच तिच्या तनुलतेला सजवित आहेत.

आणि माझा मला पडला विसर,
मिठीत थरके भरातील ज्वार

हे पाहून तो बेभान होतो आणि त्याचे विषयासक्त मन स्वत:ला आवर घालू शकत नाही आणि ते उत्कट प्रणयाच्या लाटेत वाहून जातात.

ते दोघे संपूर्ण रात्र तिथेच घालवितात. ती त्याला नंतर बरेच दिवस भेटत नाही. त्याला वाटते कि,  तिच्या घरच्यांना झाल्या प्रकाराची कुणकुण लागल्याने तिला कोणा नातेवाईकाकडे पाठविले असावे.

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली,
तिच्या पोटी कुण्या राव्याची साऊली

आणि एक दिवस अचानक ती त्याला भेटते. मात्र यावेळी ती एकटी नसते तर तिच्या पोटी कुणाचा तरी वंश वाढत असतो.

तिच्या डोळीयांत जरा मी पाहिले,
काजळात चंद्र बुडून गेलेले

त्याची जरी तिच्यांत केवळ शारीरिक गुंतवणूक असली तरी तिचे स्त्रीमन त्याच्यात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेले असते. यावेळी जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहतो तेव्हा त्याला खोल कुठेतरी जाणवते की तिच्या डोळ्यातला तो मोद, ते हास्य घनतमांत बुडून गेलेले आहे. ती त्या विरहाग्नीत होरपळून निघालेली आहे.

अवेळीच केव्हा दाटला अंधार,
तिला गळा जड झाले काळेसर....

मनाविरुद्ध झालेल्या अनपेक्षित लग्नामुळे तिच्या जीवनांत जो असमयी अघटित काळोख निर्माण झाला आहे तो शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठिण होय यमक्या कवी आणि महानोर यांच्यातील फरक इथे जाणवतो. तिच्या संपूर्ण आयुष्याची तडफड त्यांनी अवघ्या २- ४ ओळीत अचूक मांडली आहे. फक्त कोमल, भावूक, तरल मनाच्याच व्यक्तीच ही कविता अनुभवू शकतात.

खरोखरच ना. धों. च्या अवघ्या १२ ओळी आणि श्रीधरजींचा आवाज कुठल्याही संवेदनशील, हळव्या मनाला अस्वस्थ करून सोडतांत.