मराठीचे मारेकरी?

आजच्या लोकसत्तामधील 'परीसशब्द' या सदरात श्री. अविनाश बिनीवाले यांचे हे मौलिक विचार

"शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगाच्या छटा सांगायच्या झाल्या तर मराठी भाषक त्याच्या पर्यावरणानुसार त्या सांगेल. तो (भोंगळपणे) म्हणेल की झाडासारखा हिरवा किंवा चटणीसारखा हिरवा. हिरव्या रंगाबद्दल बोलताना एखादा इंग्लिश माणूस स्वाभाविकपणे त्याच्या भोवतालच्या निसर्गानुसार नि सामाजिक परिस्थिनुसार सांगेल. हिरव्या रंगाच्या वर्णनात एक शब्द तो खूपदा वापरतो तो म्हणजे'बॉटल ग्रीन' नि हा शब्द आपल्याकडच्या कोणत्याच भाषेत नसतो. युरोपियनांच्या जीवनात वाईनच महत्व खूपच असत नि वाईन साठवण्यासाठी हिरव्या रंगाची बाटली उत्तम असल्यामुळे त्याच्या बघण्यात ती रोजच असते. त्यामुळे तो सहजपणे 'बॉटल ग्रीन म्हणतो"

हे वाचून मला पडलेले काही प्रश्नः

- हिरव्या रंगाला झाड वा चटणी हे तुलनारुप वा परिमाण मानणारा मराठी या महाशयांना भोंगळ का वाटावा? आणि युरोपातल्या जीवनात वाईनचे महत्त्व असते व वाईन हिरव्या बाटलीत ठेवतात सबब हिरव्या रंगाला बॉटल ग्रीन म्हणणारा इंग्लिश या महाशयांना महान का वाटावा?
- 'बॉटल ग्रीन' हा शब्द आपल्याकडच्या कोणत्याच भाषेत नसतो हे सांगुन लेखक महाशयांना काय म्हणायचे आहे? हा शब्द नसला तर भाषा मागास व अप्रगत असते असे तर त्यांना म्हणायचे नसावे?
- झाडे व चटणी यांचा रंग नेमका नसतो तर तो अनुक्रमे प्रत्येक झाड व करायची पद्धत याप्रमाणे बदलत असतो व म्हणून ती तुलना भोंगळ असे म्हणायचे असेल तर बाटल्यांमध्ये देखिल हिरव्या रंगाच्या असंख्य छटा असतात. शिवाय वाईन ठेवतात ती हिरवी बाटली असा संदर्भ असेल तर यांचा आदर्श असलेला इंग्लिश 'वाईन बॉटल ग्रीन' का म्हणत नाही?
- एकदा स्वतःच नमूद केले की रंगाचे वर्णन हे परिस्थितीनुसार होते; तर मग मराठी भाषकाला झाड वा चटणी चा संदर्भ दिला म्हणून भोंगळ हे विशेषण का?"

एकुण काय तर मराठीचा पाण उतारा मराठी माणसाने नाही करायचा तर कुणी करायचा? असे सज्जन मराठी असताना ते काम करण्याची वेळ अन्य भाषिकांवर येणारच नाही!

मनोगतींना या विषयी काय वाटते?