भरली बघून ताटे मी हंगरून गेलो
गोडीत पिंड उष्टे मी लंगरून गेलो
काठावरी खलाशी बुडण्यात धन्य झाले
लुब्रे पडाव माझे मी नांगरून गेलो
शंका कुणा न आली की आत काय आहे
नुसतीच शाल भारी मी पांघरून गेलो!
कवटाळण्यास त्यांना गेले उठून सारे
खोलीमधे रिकाम्या मी चेंगरून गेलो
मज लागला कळाया एकेक शब्द त्यांचा
छे, मैफलीत त्यांच्या मी गांगरून गेलो
टीप :
ही गझल सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अर्धवट लिहिलेली होती, ती सुमारे चार वर्षांपूर्वी पूर्ण करावीशी वाटली / करता आली. महाविद्यालयात असताना तेथे कै. सुरेश भटांचा गझलांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा मराठी गझल हा प्रकार आम्हाला अगदी अपरिचित होता. (मला वाटते एल्गार हे पुस्तकही तोपर्यंत प्रकाशित झालेले नव्हते. चू. भू. द्या. घ्या.) तो कार्यक्रम पाहून आम्हा काही विद्यार्थ्यांत गझलेचे निरनिरनिराळे प्रयोग करून पाहण्याची टूम निघाली होती. तीत इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळणे, नामाची क्रियापदे करणे. उंटावर मागे बसणाऱ्याला रदीफ म्हणतात, तर पुढे बसणाऱ्याला काय म्हणत असावेत? म्हणून यमकाच्या अगोदरही अविचल यमक वापरणे, असे अनेक प्रयोग(!) ह्या गझलेत केलेले दिसतील. क्षमस्व.