मेणबत्त्या

सलीलचे हे इंजिनियरिंगचे महत्त्वाचे वर्ष होते, पण तो अभ्यास करायला नेहमीच नाखूष असे. पहाटे उठून करतो असे म्हणून रात्री लौकर झोपायचे, आणि आज रात्री उशीरापर्यंत बसून करतो म्हणून सकाळी उशीरा उठायचे असा त्याचा नेहमीचा क्रम होता.  आईचा (छुपा) पाठिंबा असल्याने तो फारच शेफारला होता.  आणि झोपेच्या बाबतीत तर तो एकदम कुंभकर्ण होता. एकदा झोपला की झाले.

एके दिवशी त्याच्या बाबांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला, आणि आज रात्री काय वाट्टेल ते झाले तरी त्याला अभ्यासाला बसवायचेच या निश्चयाने त्यांनी रात्रीची जेवणे उरकताच हालचाली सुरू केल्या. IPLचा सामना बघून झाला आणि सलीलने जांभया द्यायला सुरुवात केली. बाबांनी त्याला आठवण करून दिली, की सकाळी तो निवांतपणे सातला उठलेला आहे, त्यामुळे जांभया यायची अजिबात गरज नाही.  बाबांनी आईचीही मध्यस्थी मोडून काढल्यावर अखेर सलीलने हार मानली आणि पुस्तके काढली. रात्री अकराची वेळ.

तोच MSEDL सलीलच्या मदतीला धावली. दिवे गेले. सलीलने "हुश्श" करायला घेतले तोच त्याच्या बाबांनी त्यांचे जुने कपाट उघडले आणि त्यातून दोन मेणबत्त्या काढल्या. दोन्ही मेणबत्त्या सारख्याच लांबीच्या होत्या, पण त्यांची जाडी वेगवेगळी होती.

"यातली जाड मेणबत्ती सहा तास जळते, आणि बारीक मेणबत्ती चार तास जळते. या दोन्ही पेटवून ठेवतो टेबलावर, म्हणजे उजेड कमी पडला असे व्हायला नको. अभ्यास पुरेसा झाला की झोप तू मेणबत्त्या विझवून. त्या किती उरल्यात यावरून मला कळेलच की तू किती वेळ अभ्यास केलास ते. "

पहाटे उठून बाबांनी पाहिले तर जाड मेणबत्तीची लांबी बारीक मेणबत्तीच्या लांबीच्या दुप्पट होती.

सलीलने किती वेळ अभ्यास केला?