मुद्रिका रहस्य

ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.

त्या दिवसांत विक्रमदित्याच्या दरबारात येऊन-जाऊन कायम कवी कालिदासाबद्दलच बोलले जात असे. 'शाकुंतल'च्या प्रकाशनाची तयारी सरकारी पातळीवर सरकारी पद्धतीने चालू होती. श्लोकांचा उच्चार, अर्थ आणि रस यावरून दिवस नि दिवस कर्मचारीमंडळी कलकलाट करीत बसत. विक्रम राजाला तेव्हा काही काम नव्हते. परमशत्रू शक पराजित झालेले होते, आणि सातवाहनांचा उदय झालेला नव्हता. इकडे-तिकडे सेना पाठवून तो एक बरासा चक्रवर्ती झालेला होता, आणि बर्याच दिशांना 'पृथ्वीचा स्वामी' म्हणून गाजत होता.

सर्वसाधारणपणे राजेलोकांकरता ही अशी वेळ कलासाहित्य यांची चर्चा, आणि कामशास्त्रावर आपल्या अनुभवांवर आधारित विवेचन यासाठी योग्य असे. नृत्याचा यथायोग्य आस्वाद घेतला जात असे, आणि पद्मिनी-लक्षणांच्या स्त्रीच्या शोधात सिंहलद्विपाला जाण्याचे मनसुबे रचले जात. अशा दिवसांत विदूषकांना बर्याचदा ओव्हरटाईम करावा लागे, कारण राजा त्यांना सोडतच नसे. सिंहलद्विपी जाणे झाले नाही, तरी राजा आसपास कुठेतरी हिंडायला जाईच. अशा सर्व वेळांना कवी कालिदास राजांना चिकटूनच असे.

कालिदासाचा प्रतिभेचा बराच बोलबाला होता. संस्कृत शिकवण्याच्या बहाण्याने विक्रमाच्या कन्येशी, प्रियंगुमंजिरीशी त्याचा रोमान्स चालू होता. एकूणच सर्वत्र आबादीआबाद होती. उज्जयिनी नगरी भरभराटीला आली होती. व्यापार आणि माणसांचे येणेजाणे तेजीत होते. बरी अक्कल असलेला माणूस काही ना काहीतरी करून चार दमड्या मिळवीत होता.

तेव्हा 'अभिज्ञानशाकुंतलम'च्या केवळ दोन प्रती होत्या. एक कालिदासाची स्वतःची, आणि दुसरी त्याने विक्रमदित्याला भेट दिलेली सुशोभित प्रत. त्या दुसर्या प्रतीच्या अजून प्रती करण्याचे आदेश सुटले होते. भूर्जपत्राचा गठ्ठा एका खोलीत ठेवण्यात आला होता. काम चालू होते.

याच दिवसांत क्षीरसागराहून महाकालमंदिराकडे जाणाऱ्या गजबजलेल्या रस्त्यावर एक पुस्तक विक्रेता दर संध्याकाळी आपले दुकान थाटी. त्याच्याकडे कायम झुंबड उडालेली असे. त्याच्याकडे कामशास्त्र, थोर सती स्त्रियांची चरित्रे, अनंत प्रकारच्या पोथ्या नि पुराणे हे तर मिळेच. पण गुप्तहेर धुंडीराजच्या पुस्तकांची मागणी सर्वात जास्त असे. दिवसभर दरबारात बसून कालिदासाच्या कवितांचे बेफाम गुणगान करणारे दरबारीजनसुद्धा संध्याकाळी घरी जाताना हे पुस्तक धोतराच्या निऱ्यांत नाहीतर उपरण्याच्या घोळात लपवून घरी घेऊन जात. विक्रमदित्याच्या राण्यासुद्धा ही पुस्तके चोरून-लपून मागवीत आणि उशा-तक्क्यांखाली दडवून ठेवत. राजा जेव्हा राणीवशातून बाहेर जाई, तेव्हा या पुस्तकांचे सामूहिक वाचन होत असे.

या गुप्तहेर कथांचा जनक कालिदासासारखा सुसन्मानित वा सुपरिचित नव्हता. एक गरीब ब्राह्मण दर महिन्याला एक नवे गुप्तहेर पुष्प गुंफून ते फूटपाथवरच्या विक्रेत्याला काही मुद्रांच्या बदल्यात सोपवीत असे. वदंता अशी होती की त्या ब्राह्मणाला त्याच्या गुरूने शाप दिला होता, की तुझी विद्या ख्यातकीर्त होईल, पण तुझ्या नावाने ओळखली जाणार नाही.

हा शाप कसा मिळाला ही एक वेगळीच कहाणी होती. तो ब्राह्मण गुरूच्या आश्रमात शिकायला असताना सकाळी पूजेला फुले-पाने हार आणून देणाऱ्या एका फाकडू माळिणीबरोबर त्याने सूत जुळवले होते. तिच्या मागावर असलेल्या त्याच्या सहाध्यायांचा त्यामुळे अर्थातच जळफळाट झाला होता, आणि त्यांनी याबद्दल गुरुकडे तक्रार करून त्याला आश्रमाच्या बाहेर काढले होते. त्या ब्राह्मणाला एवढे उमगले होते की 'अशा' रीतीने आश्रम सोडावा लागल्याने त्याला अधिकृतरीत्या (राजपक्षात) काही सन्मान मिळण्याची शक्यता नव्हती. मग तो छोटीमोठी पुस्तके लिहून गुजराण करू लागला. 'गुप्तहेर धुंडिराज' ही मालिका फारच लोकप्रिय झाली आणि लोकांमध्ये त्याची मागणी वाढू लागली.

या गुप्तहेरकथांमधली पात्रे सर्वसाधारणपणे येणेप्रमाणे असत : राजा, मंत्री, नगरातले जुगारी, दारुडे, राजाचा लंपट मेव्हणा, भैरवनाथाचा पुजारी, जवाहिर्याची मुले, धर्मशाळेतल्या फटाकड्या स्वैपाकिणी, दासी, तांबोळ्यांच्या बायका, गणिका, विषकन्या आणि शत्रू राज्यातून व्यापारीवेषात आलेली मंडळी. सर्व घटनाक्रम एकदम चित्तथरारक, बुचकळ्यांत टाकणारा, वेगवान आणि रोमहर्षक असे. शेवट सांगण्यात येत नसे, सुरुवात समजत नसे. थोडक्यात, सगळे पुस्तक वाचून होईपर्यंत जिवाला चैन नसे.

या कथांचा नायक गुप्तहेर धुंडीराज ही एक अद्भुत व्यक्ती होती. पट्टीच्या बहुरूप्याप्रमाणे तो सटासट आणि बेमालूम वेषांतरे करीत असे. कधी साधू, कधी सरदार, कधी गारुडी तर कधी प्रियकराला भेटण्यासाठी लपूनछपून (पण काकणे वाजवत) जाणारी सुंदरी. त्याच्याकडे एक अद्भुत मणी होता, ज्याचा अंधारात प्रकाश पडे. त्याची तलवार गरज नसेल तेव्हा घडी घालून ठेवता येत असे. तो पशू - पक्ष्यांचीच नव्हे, तर किड्यांचीही भाषा बोलू शकत असे. त्याला माणसांच्याही अनेक भाषा येत. त्याला साप-विंचू उतरवायचा मंत्र माहीत होता. त्याच्या कमरेला एक बारीकशी दोरी कायम करदोड्यासारखी बांधून ठेवलेली असे. त्याचा फास करून तो पळणार्या अपराध्यांना पकडत असे; तो फास वर फेकून एखाद्या कडीला वा दांडीला गुंतवून त्याच्या आधारे मजलेच्या मजले चढून जात असे; आणि तीच दोरी वापरून विहिरीतून पाणीही काढीत असे. सगळ्या आडविद्या पाठ असल्या तरी गुप्तहेर धुंडीराज हा स्वभावाने अगदी धार्मिक होता. तो कायम सत्य ज्या बाजूला असेल (आणि जी पार पाडल्यावर राजा इनाम देईल) अशीच  कामे हाती घेत असे. पुस्तकी गुप्तहेरांचे नेहमी होते तसे त्याला प्रत्येक कामात अर्थातच हटकून यश मिळे.

लेखकाच्या म्हणण्यानुसार घुंडीराज कुठल्याही हेरगिरीच्या कामगिरीवर जाताना एक लाकडी संदूक घेऊन जाई. त्या संदुकीत एक अशी कळ बसवलेली होती, की ती धुंडीराजखेरीज कुणालाच उघडता येत नसे (लेखकाला कुलूप म्हणायचे असावे). या संदुकीत वेळी-अवेळी लागणारी सर्व साधनसामग्री ठासून भरलेली होती. चेहरा रंगवण्याची रोगणे, तांब्याची अष्टकोनी मुद्रा, खोट्या दाढीमिशा, वेगवेगळे मुखवटे, धारदार चाकू, बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी द्रव्ये, तुळशीची पाने, कुमारी कन्येने कातलेले सूत, खारकेच्या बियांचे चूर्ण, घुबडाच्या नख्या, वृद्धापकाळाने मेलेल्या सिंहाच्या मिशा, निळ्या कमळाची मुळे, त्रिफळाचूर्ण, यज्ञात भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगांची टरफले, वाघाची चरबी, गायीचे शुद्ध तूप, डुकराचे केस, तितराच्या लेंड्या, पंचांग, कस्तुरी, मोराचा तुरा, हरणाच्या शिंगाचा बाजा, विधवेने अमावास्येच्या अंधारात वळलेल्या वाती, सातूचे पीठ, गूळ, गंगाजल, चुना, पहिलटकरणीने सातव्या महिन्याच्या पहिल्या रविवारी धुऊन उन्हात वाळवलेले उत्तरीय, म्हशीच्या शेणाच्या गवऱ्या, सुपारी, कंगवा, रुद्राक्षमाला, वस्तरा, पोपट धुतलेले पाणी, चकमक, वाघाचे कातडे, पाणी पिण्याचा लोटा, कवड्या, सुवर्णमुद्रा, पूजेची सामग्री आणि पांघरण्याची चादर. एवढा सगळा ऐवज बाळगून असलेला गुप्तहेर त्या जमान्यात कुठल्याही वेळेला काहीही करू शकत असे.

धुंडिराज धष्टपुष्ट आणि देखणा होता. त्याच्या गळ्यात ताज्या फुलांचा हार असे, खांद्यावरून एक जानवे लोंबकळत असे आणि हातात सोन्याचे कडे असे. तो रतिकलेत कुशल होता आणि त्याला स्तंभनक्रिया अवगत होती. त्याचा सहवास मिळावा म्हणून गणिका उपासतापास करीत असत. तोदेखील अनेक स्त्रियांच्या सहवासात असे. थोडक्यात म्हणजे तो त्याच्या काळातला जेम्स बाँड होता.

त्याने जर त्याच्या विशिष्ट परशूने कुणाचे मुंडके उडवले तर तो अपराध मानला जात नसे, कारण राजाने प्रसन्न होऊन त्याला तशी सवलत दिली होती.

तर, जेव्हा विक्रमदित्याच्या दरबारात कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलमचे ढोल बडवणे चालू होते, तेव्हा धुंडीराज मालिकेतले नवे प्रकाशन आले - 'मुद्रिका रहस्य ऊर्फ शकुंतलेची खरी कहाणी'. या पुस्तकाच्या विक्रीने तर सगळेच उच्चांक तोडले. भूर्जपत्रावर दिवसाभरात लिहून झालेल्या प्रती संध्याकाळी हातोहात खपत.

हे पुस्तक साधारणपणे असे होते:

श्री गणेशाय नमः। आता मुद्रिका रहस्य ही कथा सांगतो ती श्रवण करा.

सकाळची मनोरम्य वेळ होती. ब्राह्मणजन पवित्र सरितांमध्ये स्नान करून नेहमीप्रमाणे भिक्षांदेही करायला बाहेर पडले होते. 'आज कुठल्या दिशेला जाऊन कुठल्या शत्रूबरोबर लढावे? ' असा विचार करत क्षत्रियजन आपापल्या तलवारींना धार काढत बसले होते. वैश्यजन आपापल्या तराजूंमध्ये हेराफेरी करत होते. शूद्रजन सरकारला शिव्या देत सफाईचे काम करत होते. केवळ रात्रीच्या श्रमांनी थकलेल्या गणिका आणि चोर हेच तेवढे ढाराढूर झोपले होते. चतुरांमधील चतुरशिरोमणी असा गुप्तहेर धुंडीराज प्रातःकर्मे आटपून आपल्या कामकाजाच्या कक्षात येऊन बसला होता. रेशमी वस्त्रे, गळ्यात श्वेतपुष्पांची माला आणि दणकट मनगटात सुवर्णकंकण..... वा, जणू इंद्र आणि कामदेव यांचा संयुक्त अवतार!

कोमल शुभ्र आसनावर विराजमान झाल्यावर त्याने त्याच्या प्रिय अनुचर चतुराक्षाला हाक मारली. "चतुराक्षा, काल नगरात काय विशेष घडले ते वर्णन कर बरे".

चतुराक्ष उतावळाच झाला होता. तो हात जोडून सुरूच झाला, "स्वामी, काल महाराज दुष्यंतांच्या दरबारात एक विचित्र घटना घडली".

"काय ते लौकर सांग. जिज्ञासा, वन्ही, क्षुधा आणि तृष्णा यांची लौकरात लौकर पूर्तता करावी असे शास्त्रवचन आहे".

"कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली एक युवती, जिचे नाव शकुंतला आहे असे म्हणतात, ती काल काही साधूंबरोबर दरबारात आली आणि राजाला म्हणू लागली की तुम्ही माझे पती आहात, तरी माझे ग्रहण करा. "

"काय म्हणतोस काय? "

"म्हणत होती, 'तुम्ही कण्व ऋषींच्या आश्रमात येऊन माझ्याशी गांधर्व विवाह केला आहे'. "

"मग राजा काय म्हणाला? "

"राजा म्हणाला, 'हे देवी, हे गांधर्व विवाहाचे काय काढले आहेस? मी तर तुझे दर्शन आयुष्यात पहिल्यांदाच घेतोय. तू आहेस तरी कोण? "

"मग काय झाले? "

"यावर ती सुंदरी आपल्या दुर्भाग्याला दूषणे देत ती विलाप करू लागली, 'जनहो, पाहा, माझे पतीच मला स्वीकारायला नकार देताहेत'".

"राजाने त्या युवतीकडून काही पुरावा नाही मागितला? "

"मागितला, पण शकुंतला म्हणाली, 'आता माझ्या पोटातला वाढणारा गर्भच पुरावा आहे. तुम्ही दिलेली मुद्रिका कुठेतरी हरवली'".

"गर्भ म्हणजे प्रमाण मानायला गेले तर झालेच! निम्म्या दरबाऱ्यांना फरारी व्हावे लागेल, आणि उरलेल्या निम्म्यांना आपली संतती अचानक दुपटीने कशी वाढली हे कोडे सोडवत बसावे लागेल! "

"तेच तर महाराज म्हणाले. "

"महाराज असे म्हणाले? या शब्दांत? "

"या शब्दांत नव्हे, पण साधारण असेच. "

"मग ठीक आहे. कारण विक्रमदित्याचे अंकगणित कच्चे आहे हे मला माहीत आहे. त्याला निम्मे आणि पाव यातला फरकदेखील कळत नाही. "

धुंडीराज आणि चतुराक्ष अशा गुजगोष्टी करीत बसले होते, तेवढ्यात सेवकाने येऊन खबर दिली की वल्कलवस्त्रावगुंठित एक युवती धुंडीराज यांना भेटण्यासाठी आली आहे.

"चतुराक्ष, मला वाटते आपण जिच्यासंदर्भात बोलत होतो तीच आलेली आहे. आता उरलेली कथा तिच्याकडूनच ऐकतो. तू सजग राहून माहिती गोळा करीत राहा. राजा आता काय करतो आहे आणि नगरीत काय प्रवाद पसरत आहेत, हे मला वेळोवेळी कळव. "

"जी आज्ञा. "

धुंडीराजने सेवकाला आज्ञा केली की त्या युवतीला त्या कक्षात आणून तिला आसन द्यावे. शकुंतला आली नि त्याला प्रणाम करून बसली. तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून धुंडीराजला फारच अचंबा वाटला, की कण्व ऋषींच्या आश्रमात असला माल भरलेला असेल तर आपण तिथे अजून कसे एकदाही गेलो नाही? ती चूक लौकरात लौकर सुधारायचा निश्चय करून तो बोलू लागला, "तुम्ही आश्रमवासिनी दिसता".

"अगंबाई! खरंच मी ऐकलं होतं तसेच तुम्ही अगदी चतुर आहात. तुम्ही कसं ओळखलंत? "

"अजिबात कठिण नाही. वल्कलांची वस्त्रे लेण्याची आणि कानात कुण्डले घालण्याची प्रथा आता शहरात उरली नाही. ती आहे फक्त आश्रम-कन्या आणि भिल्लिणी यांच्यात. आणि तुम्ही भिल्लीण नव्हे हे सरळसरळ दिसतेच आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही दक्षिण दिशेहून आला आहात. "

"हो, हो, पण हे कसं ओळखलंत बाई तुम्ही? "

"अजिबात कठिण नाही. या दिवसांत वारा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो. आणि तुमचे केस मागच्या बाजूने वारा आल्यासारखे उडून कपाळावर आणि चेहऱ्याभोवती पसरले आहेत. तुम्ही चिंतेत दिसता. "

"हेही बरोबर ओळखलेत. मी त्यासाठीच तर तुमच्याकडून मदत मागायला आलेली आहे. "

"अगदी न घाबरता सगळे सांगून टाका. "

"माझं नाव शकुंतला. मी कण्व ऋषींच्या आश्रमातून... "

"माता-पिता? "

"माता मेनका, जी इंद्राच्या दरबारात नाचत असते. पिता ऋषी विश्वामित्र. जेव्हा ते तपस्येला बसले होते तेव्हा इंद्राने माझ्या मातेला... "

"अच्छा, अच्छा, ते प्रकरण.... हं मी ऐकलेय ते. तर तुम्ही त्या मेनकेच्या कन्या. तुमच्या मातोश्रींचे तर मोठेच नाव आहे जिकडेतिकडे! असो, तुमचे काय ते सांगा. "

"कण्व ऋषींच्या आश्रमातच मी लहानाची मोठी झाले. काही महिन्यांपूर्वी आमच्या आश्रमात राजा दुष्यंतांचे आगमन झाले. त्यांनी माझ्यापुढे गांधर्व विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा कण्व ऋषी नव्हते, आणि राजांना घाई होती, म्हणून मी होकार देऊन टाकला. "

"हं.... या वयात होतात असल्या गोष्टी... "

"जे काही असो, आमचा विवाह झाला. पण आश्रमातनं रीतसर पाठवणी होऊन जेव्हा मी काल इथे आले, तेव्हा माझ्या पतींनी, राजा दुष्यंत यांनी, मला ओळखायलाच नकार दिला! "

"तुम्ही त्यांना आठवण करून द्यायचीत ना. हे राजे लोक प्रवासाला निघाले की इकडे-तिकडे विवाह करीत बसतात, आणि राजधानीत येऊन विसरून जातात. पण तुमच्यासारख्या सुंदर युवतीला कुणी एकवार पाहूनही विसरून जाईल..... यावर विश्वास बसणं कठीण आहे म्हणा.... "

"नुसतं पाहिलं नाही त्यांनी.... मी त्यांच्या होणाऱ्या अपत्याची आई आहे. "

"ही फारच दुःखाची गोष्ट आहे. तुमच्याकडे काही म्हणजे काहीच पुरावा नाही? "

"राजांनी एक मुद्रिका दिली होती, पण ती हरवली. "

काही वेळ स्तब्ध बसून विचार केल्यावर धुंडीराज म्हणाला, "सांगा, तुमची काय सेवा करू? "

"तुम्ही मोठे गुप्तहेर आहात. तुम्ही मोठ्यामोठ्या समस्या सोडवल्या आहेत. कण्व-आश्रमातली ब्रह्मचारी मुलं वेदाभ्यास सोडून तुमच्याबद्दलच चर्चा करत असतात. राजा दुष्यंत मला का विसरताहेत याचा जर तुम्ही छडा लावला, आणि या विपत्तीतून सोडवून जर मला तुम्ही राणी केलंत, तर तुम्हांला मागाल तेवढी धनसंपत्ती देईन. "

धुंडीराजने एवढे करण्याचे वचन दिले आणि शकुंतलेची (परत)पाठवणी केली. ती गेल्यावर त्याने चतुराक्षाला हाक मारली. चतुराक्ष तत्काळ हजर झाला.

"काय गडबड आहे समजत नाही. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे, की ती राजाला जाळ्यात पकडायला बघते आहे? तसे असेल, तर यात कुणाचा हात आहे कळत नाही. खुद्द कण्व ऋषींचा? आणि दुष्यंत राजाला शकुंतला अजिबात आठवत नाही? खरंच विसरलाय की नाटक करतोय? तो आश्रमात जिला भेटला ती हीच शकुंतला ना? की तो दुष्यंत म्हणजे हा दुष्यंत नव्हे? मग कण्व ऋषींच्या अनुपस्थितीत त्यांच्या आश्रमात दुष्यंताचे रूप धारण करून शकुंतलेचा कौमार्यभंग करणारी ती व्यक्ती कोण? पण तिच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने तिला राजमुद्रिकाही दिली होती. ती कुठे गेली? शकुंतला दुष्यंताकडे खरोखर जातेय असे दिसल्यावर त्या व्यक्तीने ती राजमुद्रिका तिच्याकडून पळवली की काय? समजत नाही.... " हात पाठीमागे बांधून धुंडीराज त्याच्या कक्षात फेऱ्या मारू लागला.

काही वेळाने तो चतुराक्षाला म्हणाला, "आपल्याला या गोष्टीची सर्व बाजूंनी आणि नीट पडताळणी करायला लागणार आहे. तू राजाच्या महाली जा, आणि ही माहिती मिळव की दुष्यंत काही महिन्यांपूर्वी खरोखरच कण्व ऋषींच्या आश्रमात गेला होता का. "

"जी आज्ञा. "

चतुराक्षाने रथ राजाच्या महालाकडे दौडवला. राजाच्या सारथ्याशी त्याची रामराम-नमस्कार यापुरती ओळख होती. सारथी रथावर बसून तांबूल चर्वण करीत होता. चतुराक्षाने आपला रथ राजरथाजवळ थांबविला आणि विचारले, "अरे मित्रा, कुठे गेला होतास की बसून आहेस नुसताच? "

"कुठे जाणार बाबा? राजाचे सेवक आम्ही. तो जिथे म्हणेल तिथे जाणार. "

"ते ठीक आहे. पण तू राजाला कायम शिकारीकरताच घेऊन जातोस, कधी ऋषी-मुनींच्या आश्रमातही घेऊन जात जा ना. "

"का, काय झाले? "

"काल काही साधू उगाचच राजाविरुद्ध बडबडत होते, की राजा कायम शिकारीला जातो, पण कधी संत-ऋषींच्या दर्शनाला नाही जात. "

"अगदी उगाचच बडबडत होते. राजा कायम ऋषींच्या आश्रमांना भेट देत असतो. सिद्धजोगींच्या मठाला तर पंधरवड्यातून एकदा जातोच. "

"आहे कुठे हा मठ? "

"कण्वाश्रमाच्या रस्त्यावरच आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी राजा कण्वाश्रमातही गेला होता. पण कण्व ऋषी तेव्हा तिथे नव्हते. राजा काही प्रहर थांबला आणि परतला. तोवर रात्र झाली होती. आम्हांला मुक्कामाला सिद्धजोगींच्या मठात थांबावे लागले. राजाला तो मठ खूप आवडला. तेव्हापासून तिथे राजा कायम जातो. हे साधूलोक उगाचच बकत असतात काहीपण. "

"हलकट आहेत. उगाचच बडबडतात. आता अशा प्रतापी राजाने ऋषींचे दर्शन घेतले नाही, तर तर त्याचे यश चहूदिशांना कसे पसरेल? " चतुराक्षाने लगेच आपला रथ परतवला आणि इकडेतिकडे फिरून तो घरी परतला.

म्हणजे दुष्यंत खरंच कण्व ऋषींच्या आश्रमात गेला होता तर. आता धुंडीराजला शकुंतलेच्या सांगण्यावर विश्वास बसू लागला. मग त्याने विचार केला, की स्वतःच कण्व ऋषींच्या आश्रमात एक फेरी टाकून यावी, काही धागेदोरे मिळाले तर मिळतील. तसेही शकुंतलेच्य सौंदर्य पाहून त्या आश्रमाला एकदा भेट द्यायची असा त्याचा विचार झाला होताच. त्यामुळे तो लगेचच निघाला. चतुराक्ष रथ चालवीत होता.

आश्रमाच्या बाहेर रथ थांबवून धुंडीराज आत शिरला. दुपार झाली होती. काही कन्या आश्रमाच्या द्वाराजवळच्या झाडांना पाणी घालत होत्या आणि आपापसात किलबिलत होत्या. ही त्या मुलींची जुनी सवय होती. दुरून कुणीही पुरुष येताना दिसला की त्या लगेच जलपात्रे घेऊन धावत सुटत. आणि पाणी घालताना तिरक्या डोळ्यांनी पाहत आपण त्या गावचेच नाही अशा मुग्धपणे उभ्या राहत. धुंडीराज जरा वेळ त्यांना न्याहाळत बसला आणि मग पुढे होऊन त्याने विचारले, "सुंदरींनो, हाच कण्व ऋषींचा आश्रम आहे का? "

"या भीषण जंगलात अजून कुणाचा आश्रम असणार? " प्रियंवदा नामक आश्रम-कन्येने खोल निःश्वास टाकीत सांगितले. मग एकदम शास्त्रीय पद्धतीने नयनबाणांचा वर्षाव करीत ती म्हणाली, "आपण कोण? "

"मी धुंडीराज. कण्व ऋषींना भेटायला आलो आहे. "

"अरे देवा, तुम्ही धुंडीराज? अगं बाई, तुमच्याबद्दल ऐकलंय किती नि किती. चला ना, तिकडे उपवनात विहार करायला जाऊ. " प्रियंवदेने आपले जलपात्र फेकून दिले आणि ती धुंडीराजाजवळ आली.

"मला आत्ता गांधर्व विवाहाकरता वेळ नाही. "

"गांधर्व नसेल, दुसरी कुठली पद्धत पाहू. या तर खरं? तुम्हांला राक्षस विवाह आवडतो का? मुलीची परवानगी विचारण्याची कटकट नाही. सरळ उचलली की.... "

"नाही. मी इथे ऋषींना भेटायला आलोय. "

"तसं असेल तर थांबा मग इथेच. ऋषी बाहेर गेलेत" प्रियंवदा फणकारली.

"हे तुमचे कण्व ऋषी सदैव बाहेरच असतात. जेव्हा दुष्यंत राजा आला होता तेव्हाही ते बाहेरच गेलेले होते? "

"शकुंतलेचं भाग्य जोरावर म्हणून गेले होते बाहेर. नाहीतर तो म्हातारा आम्हांला कुण्णाला म्हणून भेटून देत नाही. "

"भाग्य जोरावर? दुष्यंत्याने शकुंतलेला स्वीकारायला स्वच्छ नाही म्हटले हे माहीत नाही? "

"दुष्यंताचा बाप स्वीकार करेल तिचा. शकुंतला फेस आणेल त्याच्या तोंडाला. कण्व-आश्रमातली मुलगी आहे, काय? अशीतशी नाही. दुष्यंतासारखे बरेच येऊन गेलेत इथे, आधी गांधर्व विवाह करून मग नाही नाही करणारे. पण कुणीही सुटलं नाही त्यांच्यापैकी. इथली मुलगी म्हणजे एकदा गळ्यात पडली की आयुष्यभराची सुटका नाही. दुष्यंत समजतो काय स्वतःला? "

धुंडीराज त्या मुलींकडे पाहू लागला. भगव्या आणि पिवळ्या रंगाची वस्त्रे नेसलेल्या, कानात कुण्डले घातलेल्या, आश्रमात वाढलेल्या त्या धष्टपुष्ट मुली गोल करून उभ्या होत्या. गांधर्व विवाह करून मग निसटून जाता येईल अशातल्या त्या मुळीच वाटत नव्हत्या.

इतक्यात कण्व ऋषी येताना दिसले. सगळ्या मुली पळून इकडेतिकडे लपून बसल्या.

कण्व ऋषी जख्ख म्हातारे होते. वीस पंचवीस वर्षांपासून ते हा आश्रम चालवीत होते, नि चांगली कमाई करीत होते. विद्यार्थ्यांकडून जंगलातली लाकडे तोडून आणवणे, शेती करवून घेणे, गायीगुरे पाळून घेणे, भाज्या-फळे यांची लागवड करवून घेणे अशी फी वसूल होत असे. आश्रम म्हणून जमीन महसूल खात्याकडून फुकटच होती. मजूरही फुकटाचे. त्यामुळे वर्षाला बरीच रक्कम हाती पडे. राजा आणि इतर धनाढ्य लोक देणग्या देत असत. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत ती वेगळीच.

धुंडीराज कण्वांशी बोलायला गेल्यावर ते उसळलेच. "काय सांगू तुम्हांला, आमच्या आश्रमात वर्षाला एकदोनदा तरी असले घडतेच. तुम्हीच सांगा, मी काय करू? अष्टौप्रहर पाळत ठेवू? नगरातली चहाटळ मुले आश्रमाभोवती शिट्या वाजवत घोटाळत असतात. गुंड कुठले! सुखासमाधानाने आश्रम चालवायचे दिवस गेले. पहिल्यांदा असे नव्हते. अजून कुणाचे कशाला, राजा दुष्यंताचेच घ्या ना. इथे येऊन तो कोण ती..... "

"शकुंतला"

"हां, त्या शकुंतलेला भुलवून गेला. त्या शकुंतलेला मेनका सोडून गेली होती, मी तिला वाढवली. हा पाखण्डी विश्वामित्र, मोठा ब्रह्मर्षी म्हणवतो स्वतःला, सगळ्या राजेलोकांकडून दाबून रकमा काढीत असतो शाप द्यायची भीती घालून, त्याला एक मुलगी वाढवायचा खर्च झेपत नाही. महाचिकट! परवाच एका यज्ञात भेटला होता. मी शकुंतलेचा विषय काढला. म्हटलं, तिच्या लग्नाची वेळ आली आहे, खर्चाची रक्कम दे. गेली सोळा वर्षे तुझी मुलगी पोसतोय, काही आहे की नाही? तर म्हणतो कसा, 'मी तो प्रसंग विसरून गेलो आहे'! मी म्हटलं म्हाताऱ्या, ऋषी होऊन असे बोलतोस, लाज नाही का वाटत? मेनकेबरोबर मजा करायला तू, आणि तुझी संताने वाढवायला मी? तपस्येचे ढोंग करतो नुसता. एक बाई समोर आली नि लंगोटी सुटली या ब्रह्मर्षींची. इथे इतकी वर्षे आश्रम चालवतोय, माझ्याबाबत असे बोलायची हिंमत आहे कुणा एखाद्याची वा एखादीची? "

"पण तुम्हीच सांगा धुंडीराजजी, या बाहेरून येणाऱ्यांचे काय करू? मी दुष्यंताबद्दल बोलत होतो. मी जरा कुठे बाहेर गेलो होतो, तेवढ्यात इथे येऊन गांधर्व विवाह करून मोकळा. मी आल्यावरच कळले मला. "

"यावेळेस शकुंतलेला सोडायला गेलेल्या शिष्यांना सांगितले होते साफ, की जर राजाने तिचा स्वीकार नाहीच केला, तर सोडून या तिला तिथेच. तुम्हीच बघा ना, मी आहे ऋषी. मला माझी काही कामे असतात की नाही? "

"दुष्यंत राजाने शकुंतलेला दिलेली मुद्रिका हरवली असे काहीसे बोलणे ऐकले.... "

"सोडा हो. खांद्याएवढ्या उंचीची स्त्री समोर उभी आहे तिला नाही ओळखली, तर नखाएवढ्या मुद्रिकेला ओळखणार! आणि एक सांगून ठेवतो, मुद्रिका इथे हरवलेली नाही. व्यवस्थित तिच्याबरोबर दिली होती. वाटेतच कुठेतरी हरवली असणार. मला तरी वाटते की त्या बरोबर गेलेल्या शिष्यांपैकीच कुणीतरी ती मुद्रिका पळवून बाजारात विकली असेल आणि चिलमी फुंकत बसले असतील. आजच सकाळी परतले ते. मी त्यांना विचारतोय शकुंतलेला दरबारात सोडून चार दिवस झाले, आणि आज परतलात, तर मधला वेळ होतात कुठे? तर कुणी हलकट एक उत्तर देईल तर शपथ"

काही वेळाने कण्व ऋषींशी बोलून धुंडीराज परतायला निघाला. तो दरवाजाजवळ पोचला तेव्हा अचानक त्याला कुणीतरी मागून धरले नि त्याचे डोळे बांधले. पाठीत कट्यारीसारखं काहीतरी बोचलं. "आरडाओरडा न करता चला गुप्तहेरजी".

काही अंतर असे गेल्यावर त्याला एका जागी बसवण्यात आले आणि डोळ्यांवरची पट्टी काढण्यात आली. चहूंबाजूंना आश्रमकन्या खिदळत उभ्या होत्या.

गांधर्व विवाह केल्याशिवाय धुंडीराजाची त्या दिवशी सुटका झाली नाही हे सांगायला नकोच.

थोडक्यात, कण्व ऋषींच्या आश्रमात धुंडिराजाला प्रियंवदेखेरीज काही पदरात पडले नाही. परतीच्या प्रवासात धुंडीराज याचाच विचार करत बसला होता. चतुराक्ष रथ चालवीत होता. धुंडीराज ज्या कामात हात घाले त्यात सफलच होई. पण इथे बहुधा मात खावी लागणार होती. शकुंतलेचा अस्वीकार करायला राजाच्या अनिच्छेशिवाय काहीच कारण दिसत नव्हते. कण्वाश्रमातल्या त्या मुलींनी अशाच रीतीने त्याला घेरून पकडले असेल, आणि मनाविरुद्ध त्याला गांधर्व विवाह करावा लागला असेल. मग तो राजधानीत गेल्यावर ते झटकून टाकायला पाहणारच. पण त्या मुलींनी खुद्द राजाशी वर्तताना एवढे दुःसाहस केले असेलसे त्याला वाटत नव्हते. धुंडीराज अशा विचारात असताना सिद्धजोगींचा आश्रम आला आणि तेवढ्यात चतुराक्षाला समोरून राजाचा रथ येताना दिसला.

"स्वामी, राजरथ येताना दिसतो आहे. "

"इकडे कुठे? कण्वाश्रमात की काय? "

"नाही नाही, सिद्धजोगी आश्रमात. त्या दिवशी राजसारथी सांगत होता, की पंधरावीस दिवसांतून राजा एकदा तरी सिद्धजोगी आश्रमात जातोच जातो. "

"किती दिवस चालले आहे असे? "

"तीन चार महिने तरी. "

"आश्चर्यच आहे. कण्वाश्रमात शकुंतला आहे तर तिथे जायला राजाला वेळ नाही. आणि त्याजवळच्याच सिद्धजोगी आश्रमात मात्र वारंवार? चतुराक्षा, यात काहीतरी रहस्य दिसते आहे. तू रथ त्या बाजूच्या लता-वृक्षांच्या आडोशाला घे. "

राजा दुष्यंताचा रथ आला नि सिद्धजोगी आश्रमाच्या दिशेने गेला.

आपल्या संदुकीतून आवश्यक त्या वस्तू काढून घेऊन धुंडीराजही झाडांमधून लपतछपत त्या आश्रमाकडे निघाला.

इथे प्रिय वाचकांना हे सांगावे लागेल की सिद्धजोगी मठ खूप जुना होता. घनदाट अरण्यात वसलेल्या या आश्रमाभोवती एक मजबूत तटबंदी होता. त्या तटबंदीवर त्रिशूल हातात मिरवणारे साधू चिलमी फुंकत बसलेले दिसत. मठात सर्वसाधारण जनांना प्रवेश नसे. आत शिष्य आणि साधू यांचा एक मोठा समूह राहत असे. मठाकडे अपार संपत्ती होती. मठात अनेक स्रियाही राहत, ज्या विभिन्न योगक्रियांत साथीदार म्हणून मान्यता पावून होत्या.

गुप्तहेर धुंडीराज आपली घडीची तलवार आपल्या वस्त्रांत दडवून त्या तटबंदीजवळ पोहोचला तेव्हा तिसरा प्रहर झालेला होता. धुंडीराजाने सगळ्या तटबंदीला एक फेरी मारून नीट टेहळणी केली, आणि योग्य जागा सापडताच आपल्या कमरेच्या दोरीचा फास करून तो त्या तटावर चढला. आता त्याला आतले सगळे काही दिसत होते. तटावरून मांजराच्या पावलाने चालत तो मठाच्या छतापर्यंत पोचला. छताच्या एका भागातून धूर येत होता. तिथे पाकसिद्धी चालली असावी असे त्याला वाटले. पण त्याने डोकावून पाहिले तर काही वेगळेच दिसले.

धूर एका कक्षाच्या मध्येच असलेल्या एका यज्ञकुंडातून येत होता. जवळच व्याघ्रचर्मावर एक लांब दाढीधारी व्यक्ती बसली होती. शेजारी एक सुंदरी पंखा ढाळत उभी होती. समोर राजा दुष्यंत हात जोडून बसला होता. म्हणजे हेच ते सिद्धजोगी तर.

"असे ऐकले की कण्वाच्या आश्रमातून कुणी एक मुलगी तुझी राणी होण्यासाठी आली होती" योगीराज गंभीरपणे म्हणाले.

"हो, पण मी तिला ओळखायलाच नकार दिला".

"शाबास". मग पंखा ढाळणाऱ्या सुंदरीकडे पाहून योगीराज म्हणाले, "ते स्थान आमच्या मायासाठीच योग्य आहे".

दुष्यंताचा चेहरा हसरा झाला आणि तो मायाकडे पाहू लागला. आता धुंडीराजाचे लक्ष मायाच्या चेहऱ्याकडे गेले. ती निश्चितच शकुंतलेपेक्षा जास्त सुंदर होती. धुंडीराजला अचानक सगळे चित्र एकदम स्पष्ट झाले. मायाला राणी करायची म्हणून त्याने शकुंतलेला टाळले होते तर.

"राजकोषामध्ये किती धन आहे? " योगीराजांनी पृच्छा केली.

"खूपच आहे. मला अजून अंदाज आलेला नाही. "

"नवमीच्या दिवशी तू जास्तीत जास्त धन घेऊन इथे ये. त्या रात्री बळी देऊ, मग निष्कंटक राज्य कर. तेव्हाच आमची माया राणीही होईल" योग्याने आदेश दिला.

"जशी आज्ञा"

"आता तू नीघ. पंचमीला येऊन मला भेट. मी नसलो तर प्रतीक्षा करीत बैस"

दुष्यंत प्रणाम करून उठला. धुंडीराज पटकन मागे सरला. त्याच्या पावलाची खसफस झाली.

"कोण आहे छतावर? " योग्याचा आवाज गरजला.

"तोच की, धुंडीराज" माया खळखळून हसली.

धुंडीराजचे हातपाय थरथरू लागले. आपण एवढे लपूनछपून आलो ते मायाला कसे कळले? ती तर पंखा ढाळत बसली होती. ते काही असो, आत्ता इथून ताबडतोब निघणे हेच योग्य. परत एकदा दोरीचा फास आणि सरसर उतरणे. उतरताना त्याला कुणाचेतरी विव्हळणे ऐकू आले, "शकुंतले, शकुंतले". तो ओळखीचा वाटणारा आवाज कोठून येत होता हे शोधायचा धुंडीराजने प्रयत्न केला, पण चटकन काही उमगले नाही. आणि फार काळ रेंगाळणे धोक्याचे होते.

रथ नगराकडे परत निघाला. बऱ्याचशा गोष्टी कळूनही मामला अजून अनाकलनीयच होता. सिद्धयोगी राजकोषातल्या धनाबद्दल का विचारत होते? ते माहीत नाही असे खुद्द राजा कसे म्हणाला? हे धन काय त्या माया नामक सुंदरीला प्राप्त करण्यासाठी देण्यात येत होते काय? ही माया कोण आहे? तिला धुंडीराज छतावर असल्याचे कसे कळले? योगीराज म्हणाले की नवमीच्या रात्री बळी देऊ. कोणाचा बळी, की ज्यानंतर दुष्यंत निष्कंटक राज्य करील? आणि तो शकुंतलेच्या नावाने विव्हळणारा स्वर कोणाचा होता?

विचारात गढलेल्या धुंडीराजाला चतुराक्षाने सावध केले, "स्वामी, मागून राजाचा रथ येत आहे". राजाच्या रथासमोर आपला रथ दौडवणे योग्य मानले जात नसे. चतुराक्षाने एका बाजूला रथ उभा केला.

राजा दुष्यंत धुंडीराजाचा मित्र होता. ते दोघेही एकाच आश्रमात शिकलेले होते. राजा काही अडचणीचा प्रसंग आला तर धुंडीराजाचा सल्ला घेत असे. धुंडीराजाच्या गुप्तहेरगिरीवर राजा खूष असे. नेहमी भेटल्यावर त्यांचे नमस्कार-चमत्कार होत.

पण यावेळेला काहीतरी वेगळेच घडले. राजा दिसल्यावर धुंडीराजाने झुकून प्रणाम केला. पण त्या प्रणामाचे उत्तर राजाने दिले ते सर्वसामान्य प्रजाजनांना द्यावे तसे, नाखुशीने, अनिच्छेने आणि वरवर. राजाचा रथ गेल्यावर धुंडीराज चतुराक्षाला म्हणाला, "राजाला आपल्या सगळ्या परिचितांना विसरण्याचा रोग झालेला दिसतोय. " चतुराक्ष हसला.

गुप्तहेरांना अशी एक सवय असते की सुरुवातीला कुठल्याही समस्येचे निराकरण करण्याच्या नावाखाली ते सैरावैरा इकडेतिकडे पळत सुटतात आणि मग आपलेच शेपूट पकडणाऱ्या कुत्र्यासारखे फिरत बसतात. पण अचानक काहीतरी घडते, आणि त्यांची पावले अचानक अशा तर्कशुद्ध रस्त्याला लागतात, की जिथून परतणे त्यांना (आणि वाचकांना) कठीण होऊन बसते. 'मुद्रिका रहस्य ऊर्फ शकुंतलेची खरी कहाणी' यातही असेच झाले.

दुपारची वेळ. महाराज दुष्यंत आपल्या कक्षात बसून द्राक्षे खात होते. एवढ्यात एक अनुचर येऊन निवेदन करता झाला की प्रतिष्ठानपूर येथील प्रसिद्ध व्यापारी आणि त्यांचा बालसखा आनंदवर्धन आले आहेत आणि महाराजांचा भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. "येऊं देत त्यांना" राजाने एक क्षण विचार करून उत्तर दिले.

काही क्षणांतच किंमती वस्त्रे धारण केलेला एक हसरा युवक राजाच्या कक्षात आला. त्याच्या हातात एक छोटेसे गाठोडे होते. राजाने त्याला आपल्याजवळ बसवून घेतले.

"बोल मित्रा, कधी आलास? "

"मी कालच आलो. "

"आणि, बाकी सर्व ठीक? "

"हो. यावेळेस तुम्ही सांगितलेली वस्तू आणली आहे. "

राजाने आश्चर्याने पाहिले. त्याला इच्छा झाली की विचारावे, 'कोणती वस्तू? ' म्हणून. पण मग ती इच्छा दाबून टाकत तो म्हणाला, "वा, वा, हे तर उत्तमच झाले. कुठे आहे वस्तू? "

युवकाने राजाच्या कानाजवळ तोंड नेऊन सांगितले, "असली शिलाजीत आहे. दहा अश्वांची शक्ती फुरफुरेल अंगात. पण इथे नाही, उद्यानात जाऊ या. उपयोग कसा करायचा हेदेखिल नीट समजावून सांगितले पाहिजे. नाहीतर सगळेच मुसळ केरात जाईल. "

'असली शिलाजीत' ऐकल्यावर राजाचे डोळे चमकू लागले. मिळतात कुठे आजकल असली गोष्टी? दहा अश्वांची शक्ती, आणि मायासारखी राणी? तो चटकन उठला.

इथे आम्ही प्रिय वाचकांना सांगू इच्छितो, की राजा दुष्यंताचे उद्यान स्वर्गातल्या कुठल्याही उद्यानापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नव्हते. कित्येक ठिकाणी इतकी गर्द झुडुपे होती की त्यात विसावलेल्या प्रेमिकांना बाहेरून कुणीही पाहू शकत नसे. राजा आणि त्याच्या पूर्वजांनी या झुडुपांमध्ये राण्यांसोबत, दासींसोबत आणि नगरातल्या अनेकानेक कुमारिकांसोबत या झुडुपांत विभिन्न लीला केलेल्या होत्या.

अशाच एका झुडुपात जाऊन आनंदवर्धन राजाला म्हणाला, "तुम्ही अनेक वेळेस सांगितलेत की असली शिलाजीत मिळेल म्हणून. पण मिळायलाच तयार नाही. शेवटी एकदाचे भाग्य उजळले आणि हे मिळाले. " आनंदवर्धनने ते छोटेसे गाठोडे उघडले आणि त्यातून एक शुभ्र चूर्ण काढले. राजाच्या हातावर त्यातले थोडे ठेवून तो म्हणाला, "पाहा, कसा सुगंध दरवळतो आहे. " राजाने त्याचा वास घेताच चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला.

काही वेळानंतर उद्यानातल्या एका झुडुपामधून एका पक्ष्याचा आवाज आला. त्याला उत्तर म्हणून उद्यानाच्या भिंतीबाहेरून दुसऱ्या पक्ष्याचा आवाज आला. लगेच एक युवक ती भिंत ओलांडून आत उतरला. त्या युवकाला आपण चतुराक्ष या नावाने ओळखतो. त्याला पाहताच आनंदवर्धन, म्हणजे अर्थातच आपला प्रिय गुप्तहेर धुंडीराज, म्हणाला, "मला वाटलंच होते की हा राजाचे सोंग घेतलेला कुणी दुष्ट आहे. राजाचा प्रतिष्ठानपुरात आनंदवर्धन नावाचा कुणीच मित्र नाही. पण हा जो सोंगाड्या होता, तो 'असली शिलाजीत' ऐकताच शेपूट हालवत मागोमाग आला. मूर्ख. "

"आता काय आदेश आहे स्वामी? " चतुराक्षाने विचारले.

"हे मोटकुळे उचल आणि आपल्या तळघरात नीट बंदोबस्तात ठेव. कडक पाहरा ठेव याच्यावर. "

"आणि तुम्ही? "

"मी राजा बनून बसतो नि हुडकतो की खरा दुष्यंत कुठे आहे? तू पंचमीला राजाच्या सारथ्यासारखा वेष करून सिद्धजोगी मठाच्या मार्गात मला भेट. "

पंचमीच्या दिवशी धुंडीराज, जो आता दुष्यंत बनला होता, रथ घेऊन प्रातःसमयीच सिद्धजोगी मठाच्या रस्त्याला लागला. त्याने सारथ्याला सोबत घेतले नाही. मार्गात चतुराक्ष ठरल्याप्रमाणे उभा होताच.

आश्रमात सिद्धजोगी नव्हते. धुंडीराजला विचार करायला वेळ पाहिजे होताच. तो विचार करत असतानाच शेजारच्या कक्षातून मायाचा आवाज आला, "काय धुंडीराज, कसं काय? "

धुंडीराजचा चेहरा पांढराफटक पडला. म्हणजे हिला कळले तर. ठीक, आता उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. काय होईल ते समोरासमोरच निपटवावे असा विचार करून तो शेजारच्या कक्षात गेला. तिथे माया एका काळ्या बोक्याला गोंजारत बसली होती. "अरे, तू कधी आलास? "

"हा आत्ताच तर आलो. "

मायाने बोक्याला मांडीवरून उतरवले आणि म्हणाली, "जा धुंडीराज, आश्रमातले उंदीर पकड. "

(गुप्तहेर) धुंडीराजच्या जिवात जीव आला. असे होते तर प्रकरण. म्हणजे त्या दिवशीसुद्धा या काळ्या बोक्याबद्दलच बोलणे चालले होते तर.

"तू तर आता एकदम राजाच दिसायला लागलास. "

"हं.... माहीत नाही हा राजयोग कधीपर्यंत टिकेल ते. "

"अरे, तुला कसली शंका राहिली आहे आता? अजून चार दिवसांनी राजा दुष्यंताचा बळी दिला जाईल देवीसमोर. मग तूच तर कायमचा राजा. कुणाला कळणारही नाही. "

"राजा दुष्यंत? "

ती तुच्छतेने हसली, "दिवसभर पडल्यापडल्या शकुंतलेचा जप करत बसलेला असतो. मूर्ख. आपण आता काही दिवसांचेच सोबती एवढेदेखील माहीत नाहीये त्याला. "

"चल त्याला पाहून येऊ. "

"चल. नाहीतरी सिद्धजोगी यायला अजून वेळ आहे. " मायाने सिद्धजोगींच्या कक्षातून एक किल्ली आणली आणि एक गुप्त द्वार उघडले. दुष्यंताच्या रूपातील धुंडीराज तिच्या मागोमाग काळोख्या पायऱ्या उतरत गेला.

"काय राजा दुष्यंत, काय बरं आहे ना? " मायाने कैद्याला लाथ मारली. तेवढ्यात तिला असे जाणवले, की तिच्या पाठीत कट्यारीचे टोक रुतले आहे, आणि सोबत आलेल्या दुष्यंताने तिचे तोंड दाबून धरले आहे. कट्यार खरी आहे हे जाणवल्यावर ती घाबरून गप्प बसली. मग धुंडीराजने तिचे हातपाय आणि तोंड बांधून एका कोपऱ्यात ढकलले. मग कैद्याला बंधमुक्त करीत तो म्हणाला, "मी धुंडीराज. आता आपण निश्चिंत राहा, मी तुम्हांला सोडवायला आलो आहे. "

'मुद्रिका रहस्य ऊर्फ शकुंतलेची खरी कहाणी' या धुंडीराज मालेतील सोळाव्या पुष्पाचा अंतिम अध्याय आधीच्या पंधरा पुष्पांप्रमाणेच सुखांत होता. धुंडीराज आणि चतुराक्षाने सिद्धजोगी मठातून खऱ्या दुष्यंताला घेऊन पळणे, राजाच्या सैनिकांनी मठ घेरणे, त्रिशूळ आणि तलवारींची लढाई, मारामारी, खूनखराबा, अटकसत्र, देहदंडाच्या शिक्षा आणि शेवटी 'खऱी कहाणी' काय याचे खऱ्या दुष्यंताकडून विवेचन.

जेव्हा शकुंतलेला भेटून आणि गांधर्व विवाह करून दुष्यंत नगरात परतत होता तेव्हा तो सिद्धजोगी मठामध्ये वस्तीला थांबला. तेव्हा सिद्धजोगीने त्याला अटकेत टाकून आपल्या एका शिष्याला त्याच्याजागी राजधानीत पाठवले आणि राजकोषावर कब्जा मिळवायला सांगितले.

आणि शेवटी एक छोटीशी घटना. राजाकडून सन्मान स्वीकारून जेव्हा आपले आवडते गुप्तहेर धुंडीराज आपल्या घरी पोचले, तेव्हा त्यांचे प्रिय अनुचर चतुराक्ष यांनी येऊन निवेदन केले, "स्वामी, एक वल्कलवस्त्रधारी युवती, जी कण्वांच्या आश्रमातून आलेली आहे आणि तिचे नाव प्रियंवदा असे सांगते आहे, शयन-कक्षामध्ये आपली प्रतीक्षा करीत आहे. तिचे म्हणणे आहे की ती गुप्तहेर धुंडीराज यांची भार्या आहे कारण तिच्याशी धुंडीराज यांनी कण्व-आश्रमात गांधर्व विवाह केलेला आहे. "

हे ऐकून आपल्या कथानायकाची काय अवस्था झाली असेल याचे अनुमान काढण्याची जबाबदारी वाचकांवर सोपवून 'अभिज्ञानशाकुंतल'च्या स्पर्धेत उतरलेल्या आणि विजेत्या ठरलेल्या 'मुद्रिका रहस्य ऊर्फ शकुंतलेची खरी कहाणी' या पुष्पाचा शेवट झाला.