गाणी : खणखणीत नाणी!

काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड?

पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर 'छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी 'झी'वर 'टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. 'छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! 'मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून 'आज या चित्रपटातील गाणे 'छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा. आम्ही त्यासाठी अगदी देव पाण्यात बुडवून तन-मन अर्पून भक्तिभावानं टीव्हीपुढे बसायचो.

आता सिनेमा यायच्या आधीच गाणी त्याच्या चित्रीकरणासह पाठ झालेली असतात. इतकी, की काही वेळा ती ऐकून ऐकून वीट येतो!

एखाद्या गाण्यातले शब्द आपल्याला आवडतात, एखादी उपमा आवडते किंवा एखादा ठेका, नाहीतर तान आवडते. अलीकडच्या काळातही मला आवडलेली कित्येक गाणी आहेत! सगळंच्या सगळं गाणं आवडलं नसेल कदाचित, पण त्यातल्या आवडलेल्या भागाचा प्रभाव एवढा, की बाकीचं गाणं त्यासोबत सहज खपून जावं!

'कहो ना प्यार है'चं शीर्षक गीत पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच ते प्रचंड आवडलं. शब्दांत काही विशेष नव्हतं. पण ठेका मस्त होता. त्यानंतर त्याचं चित्रीकरण आणि नृत्यही खूप आवडलं.

'लगान'चं 'घनन घनन घन' पहिल्या प्रोमोमध्ये ऐकलं, तेव्हा जबरदस्त आवडलं. पण गाणं सुरुवातीला जरा बोअरिंग वाटलं. त्यापेक्षा मला 'राधा कैसे न जले' प्रचंड आवडलं होतं.

'दिल तो पागल है'मधलं 'भोली सी सूरत' सर्वाधिक आवडलं. त्यातलं 'आए हाए' आणि उदीत नारायणचा आवाज तर लाजवाब!

'कहो ना प्यार है'सारखंच 'कोई मिल गया'चं शीर्षकगीत प्रचंड आवडलं. विशेषतः, त्यातलं 'ख्वाबों, खयालों, ख्वाइशों को चेहरा मिला' हे वाक्य म्हणजे अफाटच! 'माझी स्वप्नं, इच्छा आणि विचारांना एक 'चेहरा' (रूप) मिळाला' ही कल्पनाच एवढी बेफाट आहे, की बस्स! त्यातून चित्राचा वेगळा आवाज. भन्नाट!

'कभी कभी अदिती'मधला 'अदिती' शब्दाचा अनुप्रास अलंकारासारखा वापरही अफाटच होता.

'वेलकम'मधलं 'तेरा सरापा ऐसा है हमदम'मधला 'सरापा' या एका शब्दासाठी अख्ख्या गाण्याच्या प्रेमात पडावं लागलं. (मला त्या शब्दाचा अर्थ अजूनही माहित नाही! )त्यातून त्याचं सादरीकरण अचाट होतं. मल्लिका शेरावतनंही त्यात उत्तम अभिनय केलाय. अनिल कपूर तर विचारायलाच नको!

'झलक दिखला जा'मधलं हिमेश रेशमियाचं रेकणंही वेगळं म्हणून आवडलं. आणि त्यात तो 'झलक' हा शब्द!

तसंच 'ओम शांती ओम'मधलं 'दिल को बनादे जो पतंग सॉंसे ये तेरी वो हवाएं है' ही रचनाही खूप भावली. मनाचा पतंग होणं, ही कल्पनाच अफाट आहे.

तुमच्या आवडीची आहेत अशी काही गाणी? नेमकी कशासाठी आवडली ती?

-----------------