शेलक्या कविता

शेल सिल्व्हरस्टाईन या अमेरिकन लेखकाच्या निवडक कवितांचा संतोष शिंत्रे याने केलेला मुक्तानुवाद - किंवा शेलच्या कवितांवरून सुचलेले काही - आणि तसेच जयंत गाडगीळने शेलच्या कवितांवरून केलेले मुक्त काव्यचिंतन या दोन्हींचे एकत्र 'शेलक्या' कविता नावाचे पुस्तक शनिवारी प्रकाशित झाले. 'टाईम ऍंड स्पेस कम्युनिकेशन' तर्फे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले.

अवलिया हा शब्द हल्ली कुणाही गणागणपाच्या बाबतीत वापरला जातो. पण खऱ्या अर्थाने अवलिया म्हणावा असा हा  शेल सिल्व्हरस्टाईन. त्याने लिहिले बरेच, पण सामान्य वाचक शेलला 'मुलांसाठीचा लेखक' म्हणून ओळखतो.   पण शेलच्या कवितांना  असे सरसकट बालकविता म्हणणे हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. 'ऍलिस इन वंडरलँड' सारखे 'नॉट फॉर चिल्ड्रन, बट फॉर चाईल्डलाईक ऑफ ऑल एजेस' असे म्हणावे फार तर. अशा या शेलच्या काही कवितांचे -भाषांतर नव्हे तर रुपांतर - तेही एकाच वेळी या दोघांनी या पुस्तकात केले आहे.

या प्रकाशनाच्या प्रसंगी जयंता म्हणाला की परदेशात एकाच पुस्तकाची दहा दहा, पंधरा पंधरा भाषांतरं होतात, आणि ती वाचलीही जातात. एकच कवी/ लेखक  कुणाला कसा दिसतो तर कुणाला कसा. ('भावतो' हा  शब्द निर्धारपूर्वक टाळून) त्यामुळे शेलच्या कवितांचे त्यातल्या त्यात मुळाबरहुकूम रुपांतर संतोषचे तर शेलची कविता हा खुंटा असे धरून त्याभोवती फेरी मारल्यासारखी रचना जयंतची  असे या पुस्तकाचे ढोबळ स्वरुप आहे. काही काही वेळा उलटेही झाले आहे. काही वेळा अशा दोन्ही रचना एकानेच केल्या आहेत. मराठीतला असा हा बहुदा पहिलाच प्रयोग आहे.

या निमित्ताने शेलचा मराठी वाचकांना होणारा परिचय आणि एकच रचना दोन व्यक्तींना - दोन भिन्न प्रवृत्तींच्या व्यक्तींना - कशी दिसते हा एक वेगळा अभ्यास अशा दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. आता उदाहरणार्थ 'दी लिटल बॉय ऍंड दी ओल्ड मॅन' अशी एक शेलची कविता आहे:     

सेड दी लिटल बॉय, " समटाइम्स आय ड्रॉप माय स्पून"
सेड दी ओल्ड मॅन, "आय डू दॅट, टू"
दी लिटल बॉय विस्परड, "आय वेट माय पँटस"
"आय डू दॅट टू" लाफड दी लिटल ओल्ड मॅन
सेड दी लिटल बॉय, "आय ऑफन क्राय"
दी ओल्ड मॅन नोडेड, "सो डू आय"
"बट वर्स्ट ऑफ ऑल, " सेड दी बॉय
"ग्रोन अप डोंट पे अटेन्शन टु मी"
ऍंड ही फेल्ट दी वॉर्म्थ ऑफ अ रिंकल्ड ओल्ड हँड
"आय नो व्हॉट यू मीन" सेड दी लिटल ओल्ड मॅन

या कवितांची ही दोन रुपे पहाः

सहअनुभूती

छोटा सांगे, आजोबा, कधी चमचा पडतो माझ्या हातून
आक्रसून बोले बुढ्ढा, अगदे अस्सेच होते माझे अजून

हळूच छोटा कुजबुजला, मी कपडे करतो ओले
अस्सेच माझे होते बुढ्ढा म्हणे मिचकावून डोळे

सांगे छोटा मला सारखे रडावेसे वाटते
आजोबा सांगू लागले, अस्सेच माझे होते

पण सगळ्यात वाईट म्हणजे, सांगे छोट्या
माझ्याकडे दुर्लक्ष करतात सगळे मोठे

छोटे हात उबेत घेत सुरकुतलेल्या हातात
समजू शकतो हेही दुःख, सांगे वृद्ध येई थरथर स्वरात

आणि दुसरे

साम्य

साधा माणूस म्हणे महात्मा, माझे फार चुकले
चुका करणे म्हणे महात्मा, मला कुठे चुकले

साधा म्हणे माझे दुःख रडवी मला अपार
म्हणे महात्मा तुझे दुःख मला बोचते फार

एक म्हणे साधेपणे जगणे अवघड झाले आहे
सांगे दुसरा मोठेपण, मला अवजड झाले आहे

सर्वांहुनही वाईट म्हणजे, माझ्या नावावरती
आमचे नेते, म्हणतो साधा, मलाच नागवती

म्हणे महात्मा, तुझी आजही दुःखे मज कळती
तुझी न माझी नाळ इथेही पाहा कशी जुळती

अशा गमतीजमती करणारे हे पुस्तक आहे.

अमेरिका या देशाविषयी स्वतःची अशी बरीवाईट मते असणारे किमान दोन प्रकारचे लोक आहेत. एक प्रकार म्हणजे अमेरिकेने सरसकट भारावून जाऊन अमेरिकेचे जे जे आहे ते ते सगळे थोर असे नतमस्तक लोक. दुसरे म्हणजे अमेरिकेचा घाऊक तिटकारा करणारे लोक. पहिल्या जमातीविषयी प्रश्नच नाही. ती बहुमतात असलेली आणि सतत वाढत राहणारी जमात आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना अमेरिका आणि अमेरिकन लोक यांच्याविषयी काही वेगळी - म्हणजे चांगली माहिती मिळाली तर - त्यांचा अमेरिकेविषयीचा तिटकारा - कमी होईल असे नाही -पण जास्त वस्तुनिष्ठ होईल - असे काहीसे या पुस्तकाने साध्य होईलसे वाटते.

संतोष हा मनोगतावरचा अनियमित लेखक आहे, हे या पुस्तकाचा परिचय करून द्यावासा वाटला याचे दुसरे कारण. संतोष आणि जयंत हे माझे फार जुने आणि फार घट्ट मित्र आहेत हे पहिले.