मधुशाला - १

कै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे.

१.

आज आणली मृदु भावांच्या द्राक्षांची बनवुन हाला
प्रिये, स्वतःच्या हातांनी मी आज तुला पाजिन प्याला
प्रसाद नंतर जगास; आधी अर्पू दे नैवेद्य तुला
सर्वांआधी तुझेच स्वागत करेल माझी मधुशाला


२.

तृषार्त जर तू, विश्व तापवुन काढिन त्यातुन मी हाला
साकी होउन नाचिन एका पायावर घेउन प्याला
आयुष्याची गोडी सारी कधीच तुज देउन बसलो
ओवाळिन मी आज तुझ्यावर, सखे, जगाची मधुशाला


३.

प्राणप्रिये, माझी हाला तू, तृषित तुझा अन् मी प्याला
झालिस पिणारा तू भरुनी माझ्यामध्ये अपुल्याला
मस्त मला होतीस पिउनि तू, मी तुजला सांडत होतो
परस्परांसाठी झालो, बघ, आपण दोघे मधुशाला


४.

काढून भावुकतेच्या द्राक्षांतून कल्पनेची हाला
साकी होऊन कवी घेउनि आला कवितेचा प्याला
एक थेंबही कमी न होइल, लाखोंनी रसपान करो
वाचक गण पीणारे आणिक पुस्तक माझे मधुशाला


५.

मधुर भावनांपासून सुमधुर नित्य बनवतो मी हाला
ह्या गोडीने अंतरातला तृषाक्रांत भरतो प्याला
हातांनी उचलून कल्पनेच्या त्याला जातो पिउनी
स्वतःच आहे मी साकी, मी पीणारा, मी मधुशाला


६.

जाण्या मद्यालयी घरातुन पिणारा बाहेर आला
कुठल्या रस्त्याने जावे हे समजेना काही त्याला
वेगवेगळे रस्ते सारे सांगत असता मी म्हटले
"कुठल्याही रस्त्याने जा तू, मिळेल तुजला मधुशाला"


७.

चालत चालत किती भाग हा खर्च जीवनाचा झाला
"अजून थोडे दूर", बोलला, मी रस्ता पुसला ज्याला
नाही पुढे जाण्याची हिंमत, साहस मागे फिरण्याचे
दिङ्मूढ करुनी मजला आहे दूर उभी ती मधुशाला


८.

करी सुखाने जप तू अविरत 'मधु, मदिरा, मादक हाला'
हातामध्ये मनोमनी धर एक ललित कल्पित प्याला
ध्यान मनी कर सुखदायी त्या सुमधुर, सुंदर साकीचे
पहा, न मग वाटेल तुला ती दूर फारशी मधुशाला


९.

होइल जेव्हा मदिरापानाची इच्छाच स्वये हाला
अधरांच्या आतुरतेमध्ये आभासित होता प्याला
साकी साकारेल जेधवा ध्यान तिचे करता करता
नुरेल हाला, प्याला, साकी; मिळेल तुजला मधुशाला


१०.

प्याल्यामध्ये, ऐक, पडतसे सुरईतुन खळखळ हाला
रुणझुण रुणझुण, ऐक, चालते वितरित मधु साकीबाला
निकट पोचलो, दूर न आता, चार पावले, बस, उरली
ऐक गीत तू पीणाऱ्यांचे; गंधाळे, बघ, मधुशाला