मधुशाला - ४

कै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद.
६१.
उद्या ? उद्यावर असतो का विश्वास कधी पीणार्‍याला
जडावेल कर उद्या कदाचित, जरी आज उचले प्याला
हाती होते आज, उधळले; मी न उद्यावर विसंबलो
नसो उद्या माझी मधुशाला, कलिकालाची मधुशाला

६२.
संधी असता का न पिऊ मी आज हवी तितकी हाला
संधी असता आज का न मी रिचवू प्याल्यावर प्याला
आज का न मनसोक्त आपुल्या साकीला, सांगा, छेडू
एकदाच ही मिळते, मित्रा, आयुष्याची मधुशाला

६३.
प्रिये, आज कर सजीव अपुल्या अधरांचा अमृतप्याला
तारुण्याच्या मधुर रसाची त्यात भरुनि तू घे हाला
लाव त्यास ओठांना माझ्या, नकोस मग हटवू त्याला
अखंड प्राशिन उघडताच, साकी, प्रणयाची मधुशाला

६४.
तुझा चेहरा सुंदर, सुमुखी, मला कांचनाचा प्याला
ज्यातुन सांडत आहे माणिक-रूप-मधुर-मादक हाला
मी माझा बनतो साकी अन् पीणाराही मी बनतो
जिथे जिथे भेटलोत आपण बनली तेथे मधुशाला

६५.
दोन दिवस मज मधू पाजुनी कंटाळे साकीबाला
ठेवुनी जाते हल्ली माझ्या समोर ती भरुनी प्याला
लाडिक नखरे, मोहक विभ्रम करित पाजणे ते सरले
कर्तव्याचे केवळ पालन करते आता मधुशाला

६६.
छोट्याशा जीवनी प्रेम मी किती करू, प्राशू हाला
जन्मताच ठरतो 'जाणारा' जगात ह्या जो जो आला
साथ स्वागताच्याच तयारी निरोप देण्याची दिसली
मिटू लागली उघडताक्षणी माझी जीवन-मधुशाला

६७.
कसले पीणे, विनाद्वंद्व वाजे ना जर प्याला-प्याला
कसले जगणे चिंतेविण सोबत नसता साकीबाला
प्राप्तिसुखाला लिंपुन आहे भीती संचित जाण्याची
भेटीचा आनंद न देई भेटुनसुद्धा मधुशाला

६८.
मला पाजण्या आणलीत ही इतकी थोडीशी हाला !
दाखवण्या आणलात मजला इवलासा एकच प्याला !
इतकीशी पीण्याहुन बरवे सागरतृष्णेने मरणे
कुणी सिंधुची दिली तृषा बनवून थेंबभर मधुशाला ?

६९.
काय सांगता, उरली नाही सुरइत थोडीही हाला ?
काय सांगता, संपुन गेली मादक प्याल्यांची माला ?
तृषा वाढता पिऊन थोडी शेष न उरली पीण्याला
तृषा शमवण्यासाठी बोलवुन तृषा वाढवी मधुशाला

७०.
असेल जितकी नशिबी लिहिली मिळेल, बस, तितकी हाला 
असेल जैसा नशिबी लिहिला मिळेल तुज तैसा प्याला
लाख मार तू हात-पाय पण त्याने ना होणे काही
असे तुझ्या भाग्यात लिखित जी तीच लाभणे मधुशाला

७१.
करून घे ग, करून घे तू कंजूषी देता हाला
दे ग, दे तू मजला आता हा असला फुटका प्याला
सहन करत आहे आशेवर, होइल पश्चाताप तुला
नसेन मी जेव्हा त्या काळी स्मरेल मजला मधुशाला

७२.
त्यजले मानापमान सारे प्यालो जेव्हा मी हाला
भुललो गौरव, हाती आला जेव्हा मातीचा प्याला
साकीच्या नखरेल नकारातून कुठे अपमान घडे ?
खाउनिया दुनियेच्या थपडा मला लाभली मधुशाला

७३.
क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर, दुर्बळ मानव मातीचा प्याला
ज्यात जीवनाची भरलेली कडू-गोड आहे हाला
पसरून निर्दय हात शेकडो मृत्यु जणु झाला साकी
प्रबळ काळ आहे पीणारा, जन्म-मरण ही मधुशाला

७४.
बनवुन आम्हा प्याल्यासम भरली आहे जीवनहाला
नशा न आवडली त्याची, प्यालो म्हणुनी मधुचा प्याला
आयुष्याच्या दु:खांना दाबून टाकतो प्याल्याने
जगातल्या पहिल्या साकीशी लढते आहे मधुशाला

७५.
द्राक्षासम शरिरात घेतली भरूनिया आम्ही हाला
काय सांगता, पंडित, नरकी आम्हाला जाळिल ज्वाला ?
निघेल मदिरा बरीच तेव्हा, प्राशिलहि ती कोणीतरी
नरकाच्या ज्वाळांमध्येही दिसेल आम्हा मधुशाला

७६.
नेण्या मज यम येईल जेव्हा, खूप पिउन जाइन हाला
कशा कळाव्या नरकयातना नशेत जो आहे त्याला ?
क्रूर, कठोर, कुटिल, कुविचारी अन्यायी यमराजांच्या
लाठ्या जेव्हा पडतिल तेव्हा आश्रय देइल मधुशाला

७७.
करते प्रेमाने गुजगोष्टी जर ह्या अधरांशी हाला
घटकाभर जर रित्या करांचे रिझवत आहे मन प्याला
जगा, तुझा तोटा का होतो; नकोस मज बदनाम करू
भग्न काळजापाशी उरले एक खेळणे, मधुशाला

७८.
दु:खद आयुष्याला माझ्या विसराया पीतो हाला
मुक्त जगाच्या चिंतांपासुन राहण्यास घेतो प्याला
षौकासाठी, स्वादासाठी पीते ही दुनिया सारी
परंतु मी तो रोगी ज्याचे औषध केवळ मधुशाला

७९.
घटत, प्रेमिके, रोज चालली आहे प्राणांची हाला
भग्न होत चालला, सुंदरी, रोजच देहाचा प्याला
रुसत चालली आहे, सुभगे, रोज यौवनाची साकी
रोज, चारुते, सुकते आहे माझी जीवन-मधुशाला

८०.
यम येइल हो‍उनिया साकी घेउनिया काळी हाला
पुन्हा न शुद्धीवर येइल जो धुंद तिला प्राशुन झाला
ही अंतिम बेहोशी, अंतिम साकी, अंतिम प्यालाही
पथिका, पी प्रेमाने ही तू, पुन्हा न मिळणे मधुशाला

८१.
तनूघटातुन, सखे, लागता सांडाया जीवनहाला
साकी जेव्हा घेउन येई गरळाचा अंतिम प्याला
कर विसरे प्याल्याचा स्पर्श, स्वाद सुरेचा अन् जिह्वा
कानी बोलत रहा सतत तू मधुकण, प्याला, मधुशाला

८२.
माझ्या ओठी नको अखेरी तुळस, हवा आहे प्याला
गंगाजळही नको शेवटी, असो जिभेवरती हाला
शवामागुनी येणार्‍यांनो, ठेवा हे लक्षात जरा
"राम नाम सत्" नका म्हणू हो, बोला "सच्ची मधुशाला"

८३.तोच रडो माझ्या प्रेतावर आसवांत ज्याच्या हाला
तोच हुंदके देवो गंध सुरेचा ज्याच्या श्वासाला
खांदा देवो तोच मला जो नशेत लटपटतो आहे
तिथे मला द्या अग्नी जेथे होती पूर्वी मधुशाला

८४.
आणि चितेवर कर उपडा तू दुधाऐवजी मधुप्याला
द्राक्षवेलीवर बांध घटाला, नकोत अश्रू, भर हाला
प्राणप्रिये, केलेस श्राद्ध जर माझे तर ते ऐसे कर
पीणार्‍यांना करी निमंत्रण, उघड, सखे, तू मधुशाला

८५.
नाव कुणीही विचारता म्हण पीणारा म्हणती त्याला
स्वत: बरोबर इतरांचाही भरणारा मदिरा-प्याला
जात कुणी जर विचारली तर सांग असे ही वेड्यांची
धर्म सांग तू, प्याल्यांची घेउन माळा जप मधुशाला

८६.
जवळ ठाकला जेव्हा घेऊन यम त्याची काळी हाला
पंडित विसरुन गेला पोथी, साधू अपुली जपमाला
ज्ञानी सारे ज्ञान विसरला, स्मरे पुजार्‍या ना पूजा
मरूनही विस्मरला नाही पण पीणारा मधुशाला

८७.
यमा, नेत असशील मला तर सोबत घेऊ दे हाला
सोबत येऊ दे साकीला घेउनिया हाती प्याला
मनात येईल तेथे ने तू, स्वर्ग, नरक, वा कोठेही
एकसारखी सर्व ठिकाणे सोबत असता मधुशाला

८८.
पाप असे जर पीणे, दोषी तिघे, एक साकीबाला
दुजा नित्य जो पाजे प्याला अन् तिसरी आहे हाला
ह्यांनाही घे सोबत माझ्या, न्याय हेच सांगे तुजला
कैद जिथे मी असेन तेथे कैद असावी मधुशाला

८९.
पिउन शांत झाली का, साकी, कुणा उरीचीही ज्वाला ?
"अजून दे"ची हाळी घालत जात पिणारा धामाला
अनेक इच्छा सोडून जातो अपुल्या मागे जाणारा
कबर किती आशांची हो‍उन उभी असे ही मधुशाला

९०.
ज्या हालेची इच्छा होती ती न मिळाली मज हाला
जो प्याला मी मागत होतो तो न मिळाला मज प्याला
ज्या साकीने वेड लावले ती न मिळाली मज साकी
वेडा झालो जिच्यासाठि मी ती न मिळाली मधुशाला