मधुशाला - ३

कै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे.
२१.

बडी घराणी जरी संपली, कुणी न उरला रुदनाला
जरी सुने ते महाल झाले जिथे नाचल्या सुरबाला
राज्य उलथली, रुसून बसली भाग्यलक्ष्मी राजांवर
पीणारे पण मुळी न हटतील, जागी राहिल मधुशाला

२२.

सर्व संपले तरी राहतील यम आणिक साकीबाला
सुकोत बाकी रस पण उरतिल तरी हलाहल अन्‌ हाला
गजबजलेली अन्‌ फुललेली सर्व ठिकाणे सुनी जरी
अविरत जागे स्मशान राहिल, जागी राहिल मधुशाला

२३.

वाईट ठरला सदा जगी हा चंचल मद्याचा प्याला
पीणारा छाकटा, बिलंदर, लाडिक ती साकीबाला
मधुशालेशी कसे जगाचे पटेल, जोडी विजोड ही
क्षणोक्षणी जग जर्जर होते, नितनूतन पण मधुशाला

२४.

नशेत आहे प्याल्याविण म्हणतो वाइट जो मधुशाला
प्याल्यानंतर कुलुप खात्रिने पडेल त्याच्या तोंडाला
दास-द्रोही ह्या दोघांवरति जीत सुरेची, प्याल्याची
विश्वविजयिनी हो‍उन जगती आली माझी मधुशाला

२५.

हिरवेगार असे मदिरालय, बर्फ पांघरो जगताला
मुहर्रमाचा तिथे तम असे, इथे होलिकेची ज्वाला
स्वर्गातुन आली वसुधेवर, दु:ख तिला ठाऊक नसे
दुखवट्यात दुनियेच्या करते ईद साजरी मधुशाला

२६.

वर्षाकाठी एकदाच ती जळते होळीची ज्वाला
फक्त एकदा लागे बाजी, जळते दीपांची माला
परंतु, मद्यालयी, लोकहो, कधीतरी येऊन पहा
दिवसा होळी, निशा दिवाळी रोज पाळते मधुशाला

२७.

नाही ठाऊक काय, मनुज जो बनून पीणारा आला ?
स्तन्य देउनि जिने पोसले अपरिचित ती साकीबाला ?
जन्म घेउनी पिऊन मानव मस्त राहतो कारण की
सर्वप्रथम येताच जगी मिळते त्याला ही मधुशाला

२८.

अशाच राहो द्राक्षवेलि ज्यांच्यातुन मिळते ही हाला
अशीच राहो ती माती बनतो ज्यातुन मधुचा प्याला
अशीच राहो मदिरा-तृष्णा जिला नसे ठाऊक तृप्ती
चिरंजीव राहो पीणारे, चिरंजीव ही मधुशाला

२९.

क्षेमकुशल मी आहे, असता क्षेमकुशल साकीबाला
मंगल आणि अमंगल कळते नशेत, सांगा, कोणाला ?
क्षेम नका माझे, मित्रांनो, पुसू, पुसा मधुशालेचे
नका भेटता 'राम राम' बोलू, म्हणा परि 'जय मधुशाला'

३०.

सूर्य बने मधुचा विक्रेता, सिंधु बने घट, जळ हाला,
साकी हो‍उन जलद येउ दे, वसुंधरा होवो प्याला
सरींमागुनी सरी वर्षू दे मदिरेच्या रिमझिम रिमझिम
प्राशिन वेल, झुडुप, तृण हो‍ऊन, वर्षा होता मधुशाला

३१.

मणी तारकांचे ल्यालेले नभ होवो मधुचा प्याला
सरळ करुनिया भरा त्यात सिंधूच्या पाण्याची हाला
धुंद वात हो‍उनिया साकी सांडो तिजला अधरांवर
बिलगलेत जे सिंधुतिरासम; विश्व बनो ही मधुशाला

३२.

असो कोणताही रस अधरी, हवि जिभेवरती हाला
असो कोणतेही भांडे पण वाटे करि आहे प्याला
दिसू लागती सर्व चेहरे साकीच्या चेहऱ्यासम अन्‌
असो पुढे डोळ्यांच्या काही, आहे नयनी मधुशाला

३३.

झाडे साकी आज जाहली सुमनांचा घेउन प्याला
अंतरात ज्यांच्या भरलेली मधा-सुगंधाची हाला
मागमागुनी भ्रमरदले प्राशन करिती रस मदिरेचे
धुंद हो‍उनी झिंगु लागती; बाग नव्हे, ही मधुशाला

३४.

रसाळ तरु प्रत्येक साकी-सा, हर मंजिरी आहे प्याला
जिच्यातुनी बाहेर ठिबकते सौरभाचि मादक हाला
टिपुन जिला हो‍ऊन धुंद कोकिळ कूजन करि फांद्यांवर
मधुर ऋतु येताच जागते आमराईतुन मधुशाला

३५.

मंद झुळुकिच्या प्याल्यामध्ये मधुऋतु सौरभ ही हाला
अनिल पाजतो इतरां भरुनी, धुंद स्वत: ही तो झाला
नविन पल्लवी हिरवी, तरुगण, नूतन वल्लरि अन्‌ वेली
सर्व डोलती मत्त हो‍ऊनि, मधुवनि आहे मधुशाला

३६.

पहाटेस होते जेव्हा साकी अरुणा ऊषा-बाला
तारे-मंडित चादर देउन मोल, धरा घेते हाला
सहस्ररश्मीच्या किरणांना पिऊन खग जेव्हा गाती
प्रभातीत त्या, निसर्गात त्या प्रतीत होते मधुशाला

३७.

तिची नशा जेव्हा उतरे, येते तेव्हा संध्या-बाला
खूप पुरातन आणिक मादक, नित्य तीत मिसळे हाला
हिला प्राशुनी मिटती सारे राग, शोक आयुष्याचे
नशेत निजती मद्यप्रेमी अन्‌ जागत असते मधुशाला

३८.

मधुविक्रेता तम आहे अ‍न्‌ सुंदर साकी शशीबाला
किरणा-किरणातुनि देई जी उच्च प्रतीचा मधुप्याला
सुटू चेतनेचा कर लागे, घेऊ लागती डुलक्या ते
ताऱ्यांसम सारे पीणारे; रात नसे ही, मधुशाला

३९.

जिथे जिथे मी पाहू, मजला तिथे तिथे दिसते हाला
जिथे जिथे मी पाहू, मजला तिथे तिथे दिसतो प्याला
दिशेस ज्या ज्या बघतो मी, मज तिथे तिथे दिसते साकी
जिथे जिथे मी पाहू, मजला दिसू लागते मधुशाला

४०.

साकी हो‍उन मुरली आली, हाती घेउनिया प्याला
ज्यात भरुनिया घेउन आली अधरसुधेची ती हाला
जिच्या संगतीने योगेश्वर मुरलीधर कान्हा झाला
भल्या-भल्यांना अपुल्या तालावर नाचवते मधुशाला

४१.

वादक हो‍उन मधुविक्रेता आणित-सुर-सुमधुर हाला
राग-रागिण्या साकी झाल्या भरून तारांचा प्याला
विक्रेत्याच्या संकेतांवर, लयीतुनी, आलापातुन
झंकारुन रसपान करवते श्रोतृगणाला मधुशाला

४२.

चित्रकार साकी हो‍उनिया कुंचल्यास करतो प्याला
ज्यात भरुनिया पाजत आहे रस-रंगांची तो हाला
पिऊन ज्याला रंग-बिरंगी होती मनातली चित्रे
चित्रपट्टीवर नाचत आहे एक मनोहर मधुशाला

४३.

श्यामवर्ण द्राक्षांतुन निघते पिचल्यावरती ही हाला
सुर्यमुखी कोवळ्या कळ्या अन्‌ सुमनांचा होतो प्याला
ज्यात हो‍उनी साकी लाटा माणिक मद्याचे भरती
हंस मत्त होतात प्राशुनी, मानसरोवर मधुशाला

४४.

पर्वतराजी हिमालयाची, द्राक्षवेलि; हिमजल हाला
चंचल सरिता साकी हो‍उन भरुनि तरंगांचा प्याला
सांडत जाती रोज आपल्या कोमल हस्त-किनाऱ्यांनी
पिऊन शेते डोलु लागती, भारत पावन मधुशाला

४५.

शूर सुतांच्या हृद्रक्ताची आज करुन रक्तिम हाला
वीर सुतांच्या शिरकमलांचा हाती घेउनिया प्याला
दानशूर, अति उदार साकी, पहा, बने भारतमाता
स्वतंत्रता ही तृषित कालिका, बलिवेदी ही मधुशाला

४६.

दूर लोटुनी मशिद म्हणाली, "स्थान नसे पिणाऱ्याला"
मंदिरही घेईना मजला पाहुनिया हाती प्याला
स्थान न मिळते कोठे जगती दुर्दैवी पाखंड्याला
मला आसरा देउन करती जवळ न जर का मधुशाला

४७.

फिरतो आहे यात्री हो‍उन, मिळे कुठेही मज हाला
सर्व ठिकाणी मिळते साकी, सर्व ठिकाणी अन्‌ प्याला
त्रास नसे मजला कुठलाही, दोस्तांनो, वास्तव्याचा
मशीद वा मंदिर न सापडो, सापडते मज मधुशाला

४८.

वर्ज्य नमाज़ी-मशिदींना सजणे, सांगे अल्लाताला
सजून येती पण पीणारे, नटुनथटुन साकीबाला
मदिरालय अन्‌ मशिदीची हो‍ईल, शेख, तुलना कैसी
मशीद तव आहे चिरविधवा, अहेव कायम मधुशाला

४९.

जरा वाजता सनई विसरे, पहा, नमाज़ी अल्लाला
वीज पडो, अविचल पीणारा बसे सुरेच्या ध्यानाला
स्पष्ट सांगतो, शेख, तुला, तू नकोस ऐकुन रागावू
युगे युगे शिकवील मशिदिला ध्यान लावणे मधुशाला

५०.

जरी वेगळे मुस्लिमऱ्हिंदू, एक परि त्यांचा प्याला
एक, परी, त्यांचे मदिरालय, एक परी त्यांची हाला
वेगवेगळे असती जोवर मंदिर-मशिदीला जाती
वैर वाढवी मशीद-मंदीर, जवळ आणते मधुशाला

५१.

असो कुणीही शेख, मौलवी, पंडित जपणारा माला
आणि कितीही वैर मनोमन असो शांभवीशी त्याला
मधुशालेच्या समोरुनी तो फक्त एकदा जाऊ दे
मीही बघतो कशी न करते जवळ तयाला मधुशाला

५२.

तोवर रुचकर बाकीचे रस दूर असे जोवर हाला
मिरवू दे साऱ्या पात्रांना समोर ना जोवर प्याला
करोत पूजा शेख, पुजारी मशीद अन् मंदिरातुनी
पदर न जोवर मुखावरीचा करी दूर ही मधुशाला

५३.

निषिद्ध माने आज जरी जग, उद्या भाग पीणे हाला
नकार देते आज जरी जग, उद्या भाग पीणे प्याला
जन्म घेऊ दे कुणी नशेचा चक्रवर्ती सम्राट जगी
मशीद-मंदिर ह्यांच्या जागी बनेल तेव्हा मधुशाला

५४.

यज्ञ-अग्निसम धगधगते ही मधुच्या भट्टीची ज्वाला
ध्यान लावुनी बसला ऋषिसम पीणारा घेउन प्याला
मुनिकन्यांसम मधुघट घेऊन फिरणाऱ्या साकीबाला
तपोवनासम भासत आहे माझी पावन मधुशाला

५५.

म्हणीत पूर्वज सोम-सुरा, म्हणतो आपण ज्याला हाला
म्हणीत होते द्रोण-कलश जो, आज तोच मधुघट झाला
वेदांच्या ठेकेदारांनो, वैदिक रीती सोडू नका
युगांमागुनी युगे पूज्य ही, नवी नसे ही मधुशाला

५६.

तीच वारूणी सिंधुमंथने बनुनिया आली हाला
जगात रंभेच्या तनयांना नाव पडे साकीबाला
सुरासुरांनी जिला आणली, संत नष्ट करण्या उठले
किती कुणाची शक्ती आहे, पूर्ण जाणते मधुशाला

५७.

कधी न येते कानी, 'त्याने स्पर्शियली माझी हाला'
बोलत नाही कुणी कधी, 'उष्टा केला त्याने प्याला'
सर्व जातिचे लोक इथे पीतात बैसुनी शेजारी
काम एकटी करते शंभर सुधारकांचे मधुशाला

५८.

श्रम, संकट, संताप अशांचा विसर पडे पीता हाला
शीक हेच तात्पर्य, रहा तू धुंद प्राशुनी मद्याला
उगाच हरिजन नकोस होऊ, मधुजन तू आहेस बरा
बंद तुला मंदिरे हरीची, वाट पाहते मधुशाला

५९.

समानतेने सर्वांचे स्वागत करते सकीबाला
फरक अज्ञ-विज्ञातिल दिसला नशेत, सांगा, कोणाला
रंक-राव हा भेदभाव ना कधीच मदिरालयी दिसे
आद्य प्रचारक साम्यवादाचि आहे माझी मधुशाला

६०.

पुन्हा पुन्हा येऊन पुढे मी आज न मागितली हाला
नकोस तू यावरून समजू साधा ह्या पीणाऱ्याला
होउ तरी दे आधी साकी कमी जरा संकोचांना
त्यानंतर माझ्याच स्वरांनी दुमदुमेल ही मधुशाला