मधुशाला - २

कै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे.

११.
जलतरंग वाजतो चुंबी जेव्हा प्याल्याला प्याला
वीणा झंकारे, पैंजणे वाजवीता साकीबाला
मदिरा-विक्रेत्याचे आहे ओरडणे पखवाजासम
संगीताने मद्याला करि अजून मादक मधुशाला

१२.
मेंदी-चर्चित मृदुल करी माणिक शोभे मधुचा प्याला
द्राक्षवर्ण अवगुंठन ल्याली हेमवर्ण साकीबाला
बैंगणी पगड्य़ा, निळ्या विजारी घालुन बसले पीणारे
इंद्रधनुष्याला लाजविते रंगबिरंगी मधुशाला

१३.
करेल थोडे नखरे हाती येण्याच्या आधी प्याला
ओठांना भिडण्याच्यापूर्वी करील नखरे अन्‌ हाला
नकार देईल हजारदा ती साकी येण्याच्या आधी
नको घाबरुस, पथिका, आधी गर्व दाखविल मधुशाला

१४.
लाल सुरेची धार पाहुनी म्हणू नको तिजला ज्वाला
नको उराचे फोड म्हणू, हा मधुचा फसफसता प्याला
ह्या मदिरेची नशा, वेदना; स्मृती जुन्या बनल्या साकी
दु:खातच आनंद ज्यास त्यासाठी माझी मधुशाला

१५.
जगताच्या शीतल मद्यासम, पथिका, ना माझी हाला
पथिका, नाही थंड जगाच्या प्याल्यासम माझा प्याला
सुरारूप ज्वाला प्याल्यातुन दग्ध काळजाची कविता
जळण्याचे भय नसेल त्याच्यासाठी माझी मधुशाला

१६.
मद्य वाहते पाहुन झाले, पहा अता त्याच्या ज्वाला
अधरांना एका स्पर्शाने पहा पोळणारा प्याला
"ओठ काय, सर्वांग जळो, पण दोन थेंब पीण्यास मिळो"
मदिरेच्या असल्या वेड्यांना आज बोलवी मधुशाला

१७.
धर्मग्रंथ जाळून बैसली ज्याच्या अंतरिची ज्वाला
मंदिर, मशीद, गिरजाघर साऱ्यांना जो तोडुन आला
पंडित, मोमिन, पाद्री ह्यांच्या जाळ्यांना आला फाडुन
आज फक्त त्याचेच कराया स्वागत राजी मधुशाला

१८.
नाही ओल्या अधरांनी चुंबिली कधी ज्याने हाला
आनंदाने थरथरणाऱ्या करात ना धरला प्याला
हात धरुन साकीस लाजऱ्या जवळ ओढले ना ज्याने
व्यर्थ सुकवली आयुष्याची त्याने मधुमय मधुशाला

१९.
बनो पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला
अविरत हाती फिरवत राहो मदिरा-प्याल्यांची माला
"अजून घे तू, अजून पी तू" ह्या मंत्राचा जाप करो
चित्र शंकराचे मी व्हावे, मंदिर व्हावी मधुशाला

२०.
मंदिरात वाजली न घंटा, हार न चढला देवाला
घरी मुअझ्झिन बसला लावुन कुलुप मशिदिच्या दाराला
लुटले खजिने नराधिपांचे, किल्ल्यांच्या भिंती पडल्या
असो सुरक्षित पीणारे अन्‌ खुली असो ही मधुशाला