मधुशाला - ५

कै. श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या मधुशाला ह्या रुबाईसंग्रहातील काही रुबायांचा भावानुवाद.

९१.
पाहत आहे समोर कधीचा माणिकवर्णाची हाला
पाहत आहे समोर माझ्या कधिचा सोन्याचा प्याला
धावत आहे त्याच्या मागे, "मिळालाच!" म्हणता म्हणता
क्षितिजासम पण दूरच असते माझ्यापासुन मधुशाला

९२.
कधी निराशेचा तम घेरे, लपतो मग मधुचा प्याला
लपते मग मदिरेची आभा, लपते मग साकीबाला
प्रकाश आशादायी पुन्हा प्याल्याला उजळुन जातो
लपाछपी माझ्याशी खेळत आहे माझी मधुशाला

९३.
म्हणुनि, "पुढे ये", हात घेतसे मागे ती साकीबाला
ओठि लावण्या सांगुन वारंवार हटवते अन्‌ प्याला
ठाउक नाही घेउन ही जाणार मला आहे कुठवर
नादी लावुन, पुढे बोलवुन मागे हटते मधुशाला

९४.
हाती येता येता अवचित निसटुनिया जातो प्याला
ओठी येता येता सांडे, हाय, अचानक ती हाला
या लोकांनो, येउन माझ्या भाग्याचे वैशिष्ट्य पहा
राहुन जाते आहे मजला मिळता मिळता मधुशाला

९५.
प्राप्य नसे जर, सांगा, तर का लुप्त होत नाही हाला
प्राप्य नसे जर, सांगा, तर का लुप्त होत नाही प्याला
दूर न इतकी, प्रयत्न सोडू; जवळ न इतकी की मिळवू
व्यर्थ वाळवंटात दौडवी मृगजळ होउन मधुशाला

९६.
का करते उद्विग्न दाखवुन मोह न मिळणरी हाला
का जीवाची तडफड करतो तृषार्त ठेवुनिया प्याला
हाय, नियतिची क्रूर लेखणी कोरून गेली भाळावर
"राहील धारा दूर मधुची जवळ असुनही मधुशाला!"

९७.
मदिरालयि बसलोय कधीचा, पिऊ न शकलो पण हाला
प्रयत्नपूर्वक भरतो मी पण उलथवतो कोणी प्याला
नशिबाहुन बलवान असे मानव-शक्ती, शाळा शिकवी
"भाग्य प्रबळ, मानव निर्बळ" हा धडा शिकवते मधुशाला

९८.
खापर होते नशिबी माझ्या, शोधत होतो मी प्याला
शोधत होतो मृगनयनी मी, मृगजिन आले भाग्याला
नशीब ओळखण्य़ात स्वत:चे फसला का मजसम कोणी
नशिबी होते स्मशान दुर्गम, शोधत होतो मधुशाला

९९.
हातापासून दूर असे जो तोच प्रिय मजला प्याला
ओठांपासुन दूर असे जी, हवीहवीशी ती हाला
प्रीति नसे प्राप्तीत, असे ती प्राप्तीच्या आशेमध्ये
मिळती जर का, नसती इतकी हवीहवीशी मधुशाला

१००.
आहे साकीजवळ जराशी सुख-संपत्तीची हाला
पुन्हा पुन्हा पीण्याला आतुर सारे भाग्याचा प्याला
धकाधकीने काही निघती, बरेच मरती घुसमटुनी
नसे लढा जगण्याचा, ही तर गजबजलेली मधुशाला

१०१.
साकी आहे तुझ्याकडे जर इतकी थोडीशी हाला
नकोस पीण्याच्या आशेने धुंद करू प्रत्येकाला
पिचून मरतो आम्ही, अन्‌ तू लपून स्मित करतेस तिथे
व्यथा-वेदनांशीच आमच्या खेळत आहे मधुशाला

१०२.
साकी, महत्प्रयासाने जर केला पुढे कुणी प्याला
दोन थेंब त्यालाही केवळ जमले पीणे तव हाला
जन्मभराच्या परिश्रमाला लुटले दोनच थेंबांनी
फसवण्यास भोळ्या जीवांना बनली आहे मधुशाला

१०३.
तृषित ठेवले जिने मला ती चिरंजीव राहो हाला
जीवनभर पळविले मला तो चिरंजीव राहो प्याला
धुंद पिणार्‍यांच्या जिभेवर शापवाणीला स्थान नसे
दु:खी केले जिने मला ती सुखी असू दे मधुशाला

१०४.
मुळी न इच्छा की दुसर्‍यांची ओढून घेऊ मी हाला
मुळी न इच्छा, धक्के देऊन दुसर्‍यांचा घेऊ प्याला
नकोस पाहू, साकी, माझ्याकडे; नसे त्याची खंत
नसे थोडके हेही की मज दिसते आहे मधुशाला

१०५.
नशा चढे ऐकूनच केवळ मद, मदिरा, मधु अन्‌ हाला
काय अवस्था होइल माझी असेल जर ओठी प्याला
समीप, साकी, नकोस येऊ, वेड मला लागेल पुरे
तहानलेला तरी मस्त मी, तुम्हास लाभो मधुशाला

१०६.
गरज काय की साकीकडुनी मागू मी पीण्या हाला
गरज काय की साकीकडुनी मागू मी भरला प्याला
मद्यधुंद होण्यात नसे हो प्रेम खरे मदिरेवरती
पिसे लागती मला ऐकुनी नावच केवळ मधुशाला

१०७.
कबूल जे केले होते ते देउ न शकली मज हाला
कबूल जे केले होते ते देउ न शकला मज प्याला
उमजुन मनुजाची दुर्बलता काही बोलत नाही मी
स्वये, परंतु, मजला पाहून लाजे आता मधुशाला

१०८.
एके काळी असायचो संतुष्ट मिळुन थोडी हाला
साकी होती भोळी माझी, छोटासा होता प्याला
छोट्याशा माझ्या विश्वाची उतरवायचा स्वर्ग नजर
अफाट जगती, हाय, हरवली माझी छोटी मधुशाला

१०९.
अनेक मदिरालये पाहिली, खूप पाहिल्या मी हाला
तर्‍हे-तर्‍हेचा आला माझ्या हाती मद्याचा प्याला
एकापेक्षा एक देखण्या साकींनी स्वागत केले
तरी भावली ना डोळ्यांना जशी जुनी ती मधुशाला

११०.
एके काळी उसळत होती माझ्या अधरांवर हाला
एके काळी डोळायाचा माझ्या हातांवर प्याला
एके काळी होते, साकी, पीणारे मारीत मिठ्या
झाली निर्जन स्मशान, होती एके काळी मधुशाला

१११.
पेटवली हृदयाची भट्टी काढाया अश्रूहाला
झुळुझुळु वाहे, ओसंडे ज्यामुळे पापण्यांचा प्याला
नयनांची झाली साकी अन्‌ गाल गुलाबी पीणारे
म्हणू नका मज विरही, मी तर आहे सजीव मधुशाला

११२.
रंग आपला बदलत जाते वेगाने चंचल हाला
झिजू लागतो वेगाने तो हाती येउनिया प्याला
जलत गतीने घटू लागते साकीचे आकर्षणही
पहाटेस ती नव्हती जैसी रात्री दिसली मधुशाला

११३.
छळेल थेंबा-थेंबासाठी कधीतरी तुजला हाला
कधीतरी काढून घेतला जाइल हा मादक प्याला
मधुरभाषिणी साकीवर तू नको विसंबूस, पिणार्‍या
असेच माझे करायची गुणगान कधी ही मधुशाला

११४.
मस्त, धुंद मी ठरलो तेव्हा त्यजले जेव्हा पंथाला
सुरा धुण्या पद आली माझे फोडल्यावरी मी प्याला
माझ्या पाठी-पाठी फिरते आता मानी मधुशाला
कारण? कारण हेच असे की मीच सोडली मधुशाला

११५.
नकोस समजू विष प्यालो मी कारण मज न मिळे हाला
हाती मी खापरी घेतली जरी मिळत होता प्याला
जाळायाचे सुचले मजला भग्न काळजाला जेव्हा
जवळ स्मशाना केले, असतो लोळत पायी मधुशाला

११६.
अनेक आल्या, प्याल्या गेल्या मदिरालयात ह्या हाला
आजपावेतो कितीक तुटल्या मादक प्याल्यांच्या माला
किती संपवुन काम आपले निघुनीया गेल्या साकी
कितीतरी पीणारे आले, तीच राहिली मधुशाला

११७.
अधरांना स्मरणात किती ठेवील तरी मादक हाला
हातांना स्मरणात किती ठेवील तरी वेडा प्याला
किती चेहरे ठेवील ती लक्षात तरी भोळी साकी
कितीतरी पीणारे आणिक एक एकटी मधुशाला

११८.
दारोदार फिरत मी असता किंचाळत, "हाला! हाला!"
सापडले ना मज मदिरालय, सापडला नाही प्याला
मीलन घडले परंतु नव्हते मीलन-सुख लिहिले नशिबी
स्थिरावुनी आता मी बसलो, फिरते आहे मधुशाला

११९.
आहे मदिरालयात मी अन्‌ आहे मम हाती प्याला
प्याल्यामध्ये मदिरालय प्रतिबिंबित करणारी हाला
व्यतीत झाले गोंधळात ह्या आयुष्यच सारे माझे
मधुशालेत मी आहे कि माझ्यात वसे ती मधुशाला

१२०.
पीण्याशी सार्‍यांचे नाते, सर्वांना भावे प्याला
तर्‍हे-तर्‍हेची ह्या जगताच्या मदिरालयि आहे हाला
इच्छेला अनुसरुन आपल्या झिंगतात येथे सारे
मादक साकी एक तयांची, एक तयांची मधुशाला

१२१.
ती हाला, जी शांतवेल ही माझ्या अंतरिची ज्वाला
क्षणोक्षणी प्रतिबिंब ज्यात मम दिसेल तो माझा प्याला
ती मधुशाला नाही जेथे मदिरेची विक्री होते
जिथे मिळे उपहार नशेचा त्यास मानतो मधुशाला

१२२.
हालेची घेउनिया धुंदी त्यजली आहे मी हाला
वेडेपण प्याल्याचे घेउन त्यजला आहे मी प्याला
एकरूप झालो साकीशी, माझा मी उरलो नाही
मधुशालेच्या मधुरतेत मिसळून विसरलो मधुशाला

१२३.
दार ठोठवी मधुशालेचे नशिबाचा खाली प्याला
घेत उसासे धुंद मद्यपी कोसत बसती भाग्याला
तारुण्याची फारच थोडी हाला मी प्राशू शकलो
बंद जाहली फारच लवकर माझी जीवन-मधुशाला

१२४.
कुठे लुप्त ती स्वर्गिय साकी, कुठे लुप्त सुरभित हाला
कुठे लुप्त स्वप्निल मदिरालय, कुठे लुप्त स्वर्णिम प्याला
तेव्हा कळले पीणार्‍यांना मोल, हाय, त्या मदिरेचे
फुटला जेव्हा मधुचा प्याला अन्‌ कोसळली मधुशाला

१२५.
अपुल्या काळि प्रत्येका अनुपम वाटे अपुली हाला
अपुल्या काळी प्रत्येका अद्भुत वाटे अपुला प्याला
तरिही विचारता वृद्धांना हेच एक उत्तर येते -
"उरले नाहीत ते पिणारे, ना उरली ती मधुशाला!"

१२६.
करुनी 'मया'ची शुद्धी आता नाव दिले त्याला हाला
'मीना'चे मधुपात्र जाहले, नाव 'सागरा'ला 'प्याला'
बघुन अचंबित का न मौलवी, टिळाधारि पंडित व्हावे
'मय-मैफल' स्वीकृत मी केली नाव देउनी 'मधुशाला'

१२७.
किती मर्म जाणवून जाते पुन्हा पुन्हा येउन हाला
सांगुन जातो किती रहस्य पुन्हा पुन्हा येउन प्याला
संकेतांतून अर्थ केव्हढे सांगुनिया जाते साकी
तरिही सार्‍या पीणार्‍यांना आहे कोडे मधुशाला

१२८.
खोल हृदय जितके आहे तितकाच खोल आहे प्याला
मनात मादकता जितकी तितकी मादक आहे हाला
उरात जितकी भावुकता तितकी सुंदर दिसते साकी
रसिक असे जो जितका तितकी त्यास रसमयी मधुशाला

१२९.
स्पर्शे ज्या अधरांस तयांना धुंद करी माझी हाला
ज्या हातांना स्पर्श करे, विक्षिप्त करे माझा प्याला
नजरभेट माझ्या साकीशी होई तो नादी लागे
वेडा हौन नाचे तो जो पाही माझी मधुशाला

१३०.
दिसेल प्रत्येकाच्या जीभेवर माझी मादक हाला
दिसेल प्रत्येकाच्या हाती माझ्या साकीचा प्याला
घराघरातून चर्चा होईल मधुविक्रेत्याची माझ्या
घमघमेल प्रत्येक अंगणी माझी सुरभित मधुशाला

१३१.
सापडली हालेत माझिया सार्‍यांना अपुली हाला
सापडला प्याल्यात माझिया सार्‍यांनाअपुला प्याला
माझ्या साकीमध्ये पाहिली सार्‍यांनी अपुली साकी
ज्याची जैसी रुची, पाहिली त्याने तैसी मधुशाला

१३२.
मद्यगृहाचे अश्रू हे तर, नाही ही मादक हाला
मद्यगृहाचे असती डोळे, नाही हा मधुचा प्याला
कधी काळची सुखद आठवण नाचे साकी हौनिया
हे नाही कविचे हृदयांगण, ही विरहाकुल मधुशाला

१३३.
किती कामना तुडवुन अपुल्या, हाय, बनवु शकलो हाल
राख किती इच्छांची करुनी बनवू शकलो मी प्याला
पिऊन जातिल पीणारे पण कळेल कोठे कोणाला
किती भंगले महाल मनिचे तेव्हा बनली मधुशाला

१३४.
जगा, विषारी जीवनात तव जर आणू शकली हाला
फार नव्हे, थोडीशीही माझी मादक साकीबाला
तुझे शून्यवत क्षण थोडेही गुंजित जर ती करु शकली
जन्म सफल समजेल आपला जगात माझी मधुशाला

१३५.
लाडाकोडाने वाढवली आहे मी साकीबाला
धरला हाती हिने नेहमी ललित कल्पनांचा प्याला
मानाने अन्‌ प्रेमाने ठेवा सुकुमारीला माझ्या 
जगा, तुझ्या हाती मी आता सोपवतो ही मधुशाला

........................................................................

'मधुशाला' कवितासंग्रहाच्या परिशिष्टातील चार रुबाया :

१.
स्वये न मी पीतो, दुसर्‍यांना पण पाजत असतो हाला
स्पर्श न करतो स्वये तरी मी दुसर्‍यांना देतो प्याला
पण उपदेश-कुशल लोकांच्याकडून आहे शिकलो मी
इतरांना पाठवतो तेथे, स्वत: टाळतो मधुशाला

२.
मी कायस्थ कुलोद्भव ज्याच्या वंशाच्या हाती प्याला
तीन चतुर्थांश शोणित माझ्या शरिराचे आहे हाला
मद्यगृहाच्या अंगणावरति हक्क वारशाने आहे
माझ्या आजा-पणजांनी ही विकत घेतली मधुशाला

३.
बहुतेकांना चार दिवस चढली व उतरलीही हाला
सांडत सांडत रिता जाहला दोनच दिवसांनी प्याला
काळासोबत प्रभाव वाढे परंतु मद्याचा म्हणुनी
जितकी माझी जुनी तेव्हढी अधिकच मादक मधुशाला

४.
नकोस घेऊ अर्घ्य करी तू, पितृपक्षी घे तू प्याला
निवांत कोठेतरी बैस तू, गंगाजळि मिसळुन हाला
भिजोत माती कुठलीही, निश्चित तृप्ती मजला लाभे
तर्पण अर्पण कर तू मजला वाचुनिया ही 'मधुशाला'

इति भावानुवाद