परीक्षा शहाणपणाची

खरंच! हे जग  काय फक्त कुरघोडी करून 'गूण' कमावण्यासाठीच असतं?  नसतंच मुळी. ते त्याहून खूप मोठ्ठं असतं. परंतु या जगात सन्मानानं जीवन जगायचं असेल तर इतरांवर आपला मान सांभाळून कुरघोडी करायच्या असतात, 'गूण' कमावायचे असतात. - हे मराठी माणसाला केव्हा समजणार?

प्रत्येक राजकीय नेता हा त्याच्या समाजातील, प्रांतांतील जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असतो. समजा, लालूप्रसाद यादव हा बिहारी समाजाच्या ठरावीक जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब मानले तर पडद्यावरच्या हीरोलाही वाकवणारे 'अँग्रीयंग मॅन' राज ठाकरे हे महाराष्ट्रातील ठरावीक जनतेच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहेत.

लालूप्रसाद हे रेल्वे मंत्री झाल्यापासून दरवर्षी रेल्वेच्या जमा-खात्यात नफ्याचा आकडा दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकलं. त्यांच्या ह्या कृत्यामुळे त्यांना जगात इतका मान-सन्मान मिळत आहे की, मोठ-मोठ्या महाविद्यालयातही त्यांना व्याख्यान देण्यास 'बोलावणं' येऊ लागली. पण त्यांना हे कुणीच विचारत नाही की रेल्वे नफ्यात आणली म्हणजे नेमके काय केले?

मी स्वतः रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या निम्न-सरकारी कंपनीत काम करतो. आमची कंपनी दरवर्षी करोडो रुपयांनी नफा कमावते. या नफ्यातील ८०%  हिस्सा आधी रेल्वेला दिला जायचा. लालू साहेब मंत्री झाल्यापासून हा हिस्सा ९०% झाला. रेल्वेच्या अखत्यारीत अनेक कंपन्या आहेत. यावरून कल्पना येऊ शकते की नफ्याचा आकडा एका वर्षातच कसा वाढला.   या सोबतच रेल्वेकडे अनेक वर्षांपासून संपूर्ण देशात करोडो किमतीचा धातूरूपातील भंगार उरला होता. (उदा. आधी धातूच्या स्लीपर रुळांच्या खाली वापरल्या जायच्या आता सीमेंटच्या असतात) हे मंत्रीमहोदय दरवर्षी हा भंगार विकत आहेत, नफ्याचा आकडा दाखवून सगळ्यांना दिमाखाने सांगत आहेत, 'हमने रेल्वेको मूनाफेमे लेके आया हूं'.  तांत्रिक पद्धतीने पाहिलं तर ते म्हणणं मान्य करायला ही हवं.

मराठी माणूस हे वाचून लगेच ह्या कृत्याला (भिकेचे डोहाळे यासारखी) नावं ठेवू लागेल. पण जरा विचार करा. आपण आपल्या घरातील अडगळ अशाच प्रकारे काढून टाकतो ना? तसेच आपल्या हाताखाली असणाऱ्याला थोडंफार पिळून काढायचं असतंच नां? पण नाही. मराठी माणूस अशा 'शहाणपणाला' नेहमीच 'लबाडपणा' समजतो. लबाडपणे जे कृत्य केले जाते ते पाप असते असं काही-बाही म्हणत राहतो.  व त्या नंतर, 'पाप केल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही. ' असं स्वतःच स्वतः साठी बेगडी तत्त्वज्ञान तयार करतो.  

सध्या राज ठाकरे प्रणीत मनसे अशापर्यंत वागताहेत की 'आता लगेच जगबुडी होणार'. परंतु अशा वागण्याने ते जगाला दाखवून देतात की आम्ही सुखाच्या लायकीचे नाहीत.

सुख हवं तर शहाणपणा हा हवाच. शहाणपणा हवा तर संयम हा हवाच. संयम असेल तरच नियतीने उपलब्ध करून दिलेले विविध पर्याय दिसू लागतात. जे नंतर समोरच्यावर कुरघोडी करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

एक गोष्ट :

एकदा 'लल्लन जादव' व 'राजू नगारे' ह्या दोन लहान मुलांमध्ये 'शहाणा कोण? ' ह्यावरून भांडण होतं. तेव्हा त्यांचे शिक्षक 'देवकर' गुरुजी त्या दोघांना एक आठवडा एका खोलीत बंद करून ठेवतात. सोबत एक मोठा लाडूचा डबा दिला जातो. व सोबत पाण्याचा माठ ही दिला जातो व सांगितलं जातं की ह्या डब्यात शंभर लाडू आहेत. एक आठवड्यानंतरही हे लाडू तेवढेच असायला हवेत.

एक आठवड्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला जातो. तेव्हा राजू अगदी 'कृश' व थकलेला दिसता असतो. याउलट लल्लन हा जसा होता तसाच हसणारा- बागडणारा दिसता असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला ही कमी झालेला नसतो. खोलीबाहेर येताच राजू देवकरांना म्हणतो, गुरुजी, मी एक ही लाडू खाल्ला नाही. आहे की नाही मी शहाणा? गुरुजी काही बोलत नाही.

दोघांकडचे लाडू मोजल्यानंतर कळते की दोघांच्या डब्यात शंभर लाडूच होते. परंतु लल्लनच्या डब्यातील लाडूचा आकार बराच कमी झालेला असतो. राजू नगारेच्या हे लक्षात येताच तो जोर-जोरात आरडा-ओरडा करू लागतो. गुरुजींना तो म्हणतो. पाहा गुरुजी ह्या लल्लनने लबाडी केली. आता तुम्ही योग्य तो निर्णय द्याच.

गुरुजी त्यावर म्हणाले, ह्या परीक्षेमध्ये लल्लनच जिंकला. लल्लनच 'शहाणा' आहे.

एवढं ऐकून राजू नगारे खूपच चिडला, म्हणाला गुरुजी तुम्हीसुद्धा असंच म्हणता? ह्यानं 'लबाडपणा' करून ही तुम्ही ह्यालाच 'शहाणा' म्हणता?

गोष्ट पुढे सांगण्यात काही अर्थ नाही. पण मराठी माणसं '=' ह्या चिन्हाला जसं 'बरोबर' म्हणतात व इंग्रजी 'टीक' लाही 'बरोबर म्हणतात. 'योग्य' ह्या शब्दाचा अर्थ ही 'बरोबर' घेतात. तसेच 'समसमान' ह्या शब्दाचा अर्थही 'बरोबर' असाच घेतात.  प्रत्येक बाबतीत अर्थांच्या अशा गफलती करण्यातच शहाणपणाचं सगळं कोडं दडलंय, नाही का?