प्यार इष्क मुहोब्बत चा सुळसुळाट

एक तरूण.. एक तरूणी.. दोघेही आपापल्या जोडीदारांसमवेत नवविवाहीत.. कधी एकाच क्षेत्रात कार्यरत त्यामुळे ऑफिसातील कामाच्या म्हणा किंवा कधी समान छंदाच्या निमित्ताने म्हणा. झालेली जवळीक.. हळूवार पणे एकमेकात गुंफणे.. भेटायला काहीसा उशीर झाल्यासारखे कावून जाणे.. मग लपून छपून भेटीगाठी.. जोडीदारांचे साहजिक चिडणे रागावणे.. भविष्याचा/ मुलांचा विचार न करता घेतले जाणारे, कधी प्रत्यक्षात उतरणारे तर कधी प्राणांतिक अंत पाहणारे निर्णय... चार जीवांची राखरांगोळी.. तर कधी अभागी दोन जीव तडफडलेले.. एक तर विवाहेतर संबंध असणारे दोन जीव नाही तर बिचारे विवाहित असूनही जोडीदाराचे प्रेम मिळू न शकल्याने होरपळणारे दोन जीव..  

अमिताभ च्या "सिलसिला" पासून ते करण जोहर- शाहरूख च्या "कभी अलविदा ना केहना(कंक) " पर्यंत अनेकदा चिघळला गेलेला हा विषय असावा.. अन हल्ली तर त्याचेच पेव फुटले आहे. जिकडे तिकडे अशा विषयावरच्या प्रेमकथा दिसत आहेत. सिनेमा आणि समाज एकमेकांचे प्रतिबिंब बनले आहे आणि त्यामुळे या गोष्ऱी सिनेमात पाहून पाहून आता भारतीय समाजातही प्रतिवर्तित होउ पाहत आहेत.

"सिलसिला " मध्ये त्या वेळेच्या समाजपद्धती नुसार रेखाला चार जुन्या/ जाणत्या बायका कपाळाचं कूंकू, हलणारा पाळणा यांचे महत्त्व सांगताना दाखवले आहे आणि शेवट गोड केलेला आहे तर कंक मध्ये राणी ला अशा कोणी आज्जी/काकवा परदेशात मिळाल्या नसाव्यात   त्यामुळे आणि हटके शेवट करायच्या विचाराने असेल कदचित पण सरतेशेवटी विवाहेतर प्रेमाचा विजय दाखविलेला आहे. शाहरूख खान आपल्या मुलाला आणि बायकोला जिच्याशी म्हणे त्याने प्रेमविवाह केलेला होता तिला सोडून लंगडत लंगडत राणी कडेच गेलेला दाखविला आहे.  

लग्न झाल्यावरही अशा प्रकारचे प्रेम करत जोडीदाराला फसविणे याच्यासारखा अक्षम्य गुन्हा दुसरा नाही.  अशा लोकांनी पहिले लग्न सोडून दुसरे केले तरी त्याना अजून कोणी परत आवडणार नाही कशावरून? मग परत दुसर्या प्रेमाला सोडून ते तिसर्याच्या मागे लागणार की काय? आदीमानव आणि आजच्या मानवात मग काय फरक राहिला? लग्न झालेले स्त्री पुरूष अशा प्रकारचा एकमेकांबद्दल विचारच कसा करू शकतात? या लोकांच्या कुठल्याच प्रेमात काहीच ताकत नसावी ..वार्याची जुळूक आली की ते वादळ आल्याच्या थाटात उन्मळून पडणार ..घरदार सोडून सर्वाना दुःखी करून फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या मागे धावत राहणार ...

ज्ञानेश्वरांचे वडील गुरूच्या आज्ञेनुसार संसारात परत येउन स्वतःच्याच बायकोबरोबर सुखाने राहताना पाहून तत्कालीन भारतीय सामाजाने त्याना छळलं ..आताचा भारतीय समाज कंक सारखे चित्रपट काढतोय..  

कालाय  तस्मै नमः.. दुसरं काय?
तुम्हाला काय वाटतं?