मसीहा

हादरला हा देश असा की देशप्रेम चालले उतू
ज्वर थोडा ओसरता होइल पुन्हा सुरू 'मी,मी तू, तू'

देश युद्धभूमी अन आम्ही बिनगणवेषाचे सैनिक
शहीद होणे सोप्पे आता समोरून झाडा बंदुक

शिरा ताणुनी म्हणते गर्दी 'भारत माता की जय हो'
पुन्हा जगे मुर्दाडपणाने रक्त किती ताजे वाहो

दहशत देई थाप न जोवर दरवाज्यावरती माझ्या
गुंगुन बघतो टीव्हीवरती न्यूज विनाशाच्या ताज्या

प्राणपणाने लढता लढता मरणारे मरतात व्रुथा
हस्तीदंती मनोऱ्यात त्या बेपर्वाईच्याच कथा

दोन मिनिट श्रद्धांजलीत या सरली कर्तव्ये सारी
चैन,स्वार्थ, द्वेषात नव्याने आपसात मारामारी

कुणी म्हणे 'सीमेवर धाडा पुढाऱ्यांस बंदुकीविना'
कुणी मसीहा येइल का पण? पुन्हा नको त्या रक्तखुणा