या शहराची वाट चालणे धोक्याचे आहे
या शहराची 'वळणे' वळणे धोक्याचे आहे...
या शहरातुन निघून जाणे धोक्याचे आहे
अन या शहरी पुन्हा परतणे धोक्याचे आहे...
कुणी म्हणाले, "गप्प राहणे धोक्याचे आहे"
कुणी म्हणाले, "सत्य बोलणे धोक्याचे आहे"...
पराभवांची सवय लागणे धोक्याचे आहे
अशा प्रकारे युद्ध जिंकणे धोक्याचे आहे...
आवेशाने पेटुन उठणे धोक्याचे आहे
शांतपणाने विझून निजणे धोक्याचे आहे...
कुणा म्हणू मी अता आपले अन कोणा परके?
कुणास काही आता म्हणणे धोक्याचे आहे...
स्वातंत्र्याचा मुखवटा किती दिसतो तकलादू!
अशा प्रकारे 'स्वतंत्र' जगणे धोक्याचे आहे...
ज्या नेत्यांनी स्वार्थासाठी शहराला विकले
त्या नेत्यांना पुन्हा निवडणे धोक्याचे आहे...
'जे होते ते बऱ्याचसाठी'..., लोकांना वाटे
नेहमी अशा भ्रमात असणे धोक्याचे आहे...