गजनी पाहिलात? अरेरे.....

गजनी हे विचित्र नाव, आमीर खान या अत्यंत चोखंदळ अभिनेत्याचा सह्भाग, 'त्या' विवक्षित केशभूषेची आणि आमीरने रोज तीन तीन तास मेहनत घेऊन कमावलेल्या शरीरयष्टीची एकंदरीतच झालेली हवा आणि 'मेमेंटो' या चित्रपटाची नक्कल असाही (कदाचित मुद्दामहून पसरवलेला) समज या सगळ्याचे पारडे एकंदरीत नवीन हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या अनुभवापेक्षा जड ठरले आणि घसघशीत रक्कम भरून मी 'गजनी' चे तिकिट काढले.
'जे जे फसण्याचे शक्यता आहे, ते ते फसेल' मर्फीचा नियम सांगतो. 'प्रतिकूल तेच घडेल' सावरकर म्हणाले होते. असेच काहीसे झाले. 'गोर ऍंड बोर' असे मिडडेने गजनीच्या परीक्षणात म्हटले होते, ते तंतोतंत खरे आहे. आमीरचा आक्रोश विनोदी वाटतो असेही मिड्डेत म्हटले होते, तेंव्हा त्यावर विश्वास बसला नव्हता. आता बाकी ते पटले आहे. आणि वयाने आपल्यापेक्षा निम्म्या असलेल्या नायिकांबरोबर काम करण्याची हौस बाळगल्याबद्दल देवानंद आणि शम्मी कपूरलाच कशाला बोल लावा? आमीर (आणि शाहरुखनेही) तेच केले आहे. शर्टाची जितकी बटणे उघडी टाकणे शक्य आहे तितकी उघडी टाकून आणि पँट शक्य तितकी खाली नेसून ( का तर परत तेच ते सुप्रसिद्ध 'एट पॅक ऍब्ज' वगैरे) नायिकेबरोबर विचित्र चालीची गाणीबिणी म्हणणारा आमीर कोणत्याही क्षणी 'अक्षतांची वेळ जवळ आली आहे, मुलीच्या मामाने मुलीला मांडवात आणण्याचे करावे' हे ऐकून नायिकेचा हात धरून उपरणे सावरत मांडवाकडे चालू लागेल असे वाटावे इतका थोराड दिसतो. आणि ही नायिका तर सर्व स्त्रीसुलभ विभ्रमांचा अतिरेक म्हणजेच अभिनय या ठाम विश्वासासकट मैदानात उतरली आहे. त्यामुळे पापण्या फडफडवणे, पक्की रंगीत तालीम केलेले हावभाव करणे यापलीकडे काही करावे लागते हे तिला माहितीच नाही, तर ती तर बिचारी काय करणार? खलनायकांची हिंदी चित्रपटसृष्टीत इतकी वानवा आहे याची बाकी मला खरेच कल्पना नव्हती. एकंदरीत काय, तर 'हातभर दाढी, आत बुवाच नाही' अस्ले काहीतरी 'गजनी' च्या बाबतीत झाले आहे. इतके की नायकाची स्मरणशक्ती फक्त पंधरा मिनिटांची आहे हा या चित्रपटाचा 'यू एस पी' या चित्रपटात नसता तरी काही बिघडले नसते असे वाटते. 'रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल.... बिवेअर, हीअर कम्स आमीर'  ... वेल सेड, मिडडे!
संजय सिंघानिया या नायकाला पंधरा मिनिटांआधीचे काही आठवत नसते. गजनी बघून आपल्याला तसे का झाले नाही याचे मला दुःख झाले. याउपरही ज्यांना  गजनी पहायचाच असेल त्यांनी तो जरुर पाहावा. आमीर खानचा सर्वात निकृष्ट चित्रपट कोणता या प्रश्नाचे एक समाधानकारक उत्तर नक्की मिळेल. मला ते नुकतेच मिळाले आहे!