माझ्यातुझ्यामधे कसले - अज्ञात बंध हे जुळले

भाग पहिला

नायिका :

माझ्या तुझ्यामधे कसले
अज्ञात बंध हे जुळले
कळले ना तुजला काही,
अन मजही नाही कळले ।ध्रु।

रज्जू ओढत एक जणू
ओढून दुज्याला घेई
ऋजु धाग्याने त्या ऐसा
ओढला दुजा मग जाई
जणु वाटावे की त्याचे
भान तनमनाचे ढळले ।१।

घेईन तुझ्याचकडूनी
कंकण बांधून करी मी
उलथून माप दारीचे
येईन तुझ्याच घरी मी
अडवण्या जरी जगताने
साखळदंडहि आवळले ।२।

बोलण्या जरी मित्रांशी
जगतात किती ह्या भाषा
परि सत्य हेच आहे की
प्रेमाची एकच भाषा
बोलत जी पतंग-ज्योती
दोघे जोडीने जळले ।३।

भाग दुसरा

नायक :

माझ्या तुझ्यामधे कसले
अज्ञात बंध हे जुळले
कळले ना तुजला काही,
अन मजही नाही कळले ।ध्रु।

रज्जू ओढत एक जणू
ओढून दुज्याला घेई
ऋजू धाग्याने त्या ऐसा
ओढला दुजा मग जाई
जणू वाटावे की त्याचे
भान तनमनाचे ढळले ।१।

डोळ्यांस नीज ना येई
लाभे न स्वस्थता मजला
हे सगळे थांबवण्याचा
मी यत्न कैकदा केला
पण माझ्या स्वप्नांत तुझे
येणे जाणे ना खळले ।२।

टीपाः

१. भान ढळले का गळले असा प्रश्न येईल. पण गळले की पुन्ह नीट होणार नाही. ढळले तर पुन्हा सावरेल म्हणून ढळले वापरले आहे. (चालीत म्हणताना भा - नतनमनाचे - ढळले असे म्हणा)

चाल :  गा - गागागागा - गागा

( हे उद्धव वृत्त आहे  

उद्धवा शांतवन कर जा
त्या गोकुलवासि जनांचे

असे)

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. कडव्यांच्या शेवटचे शब्द पाहून 'ळले' ला यमक जुळवून ध्रुवपदाचे शब्दही काय असतील ते ओळखून काढा.

४. या गाण्याचा आणखी भाग आहे. वेळ मिळाला तर त्याचेही भाषांतर टाकीन (सोडीन का काय  )