फॉरमेशन इन केऑस

१३ डिसेंबर २००८, मुंबई.

मुंबई विमानतळावर विमानातून बाहेर शिरतानाच हवा जड झाल्याचं जाणवतं. प्रदूषण. हा प्रदूषणाचाच परिणाम. विमानतळातून बाहेर पडता पडता समोर पसरलेली अस्ताव्यस्त गर्दी दिसते. केवळ समोर लावलेल्या बॅरिकेडसमुळेच त्या गर्दीला काहीसा आकार आलेला. विस्कटलेल्या गर्दीतून आपली माणसं शोधताना डोळ्यांची दमछाक होते. पॉप्युलेशन एक्स्प्लोजन.

दुपारच्या उन्हात रापलेली धूळ आकाशात अस्ताव्यस्त उडत असतानाच आमची टॅक्सी आम्हाला दिसते. आडवा झालेला टॅक्सीवाला उठून सामान टपावर चढवतो आणि आम्ही मार्गस्थ होतो. केवळ वाहनं जातायत म्हणून त्याला रस्ता म्हणायचं. शिस्त नाही. लेन आखूनही पाळायच्या नाहीत. भरपूर हॉर्न वाजवायचा. ड्रायव्हिंग मॅनर्स अजिबात पाळायचे नाहीत. लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचतात हेच आश्चर्य आहे.

गल्लीत पोचतो तर तिथे सार्वत्रिक गोंधळ. रस्त्यावर एक माणूस बेंबीच्या देठापासून ओरडून बोलतोय. मुलं दंगा करतायत. त्यांची मारामारी चाललेय, एक भाजीवाला गाडी लावून रस्ता अडवतोय.

व्हॉट अ केऑस.

२ जानेवारी, २००९, मुंबई.

विमानतळावर जाण्यासाठी मी घर सोडतो. सुट्टी संपल्याचं दुःख आणि प्रियजनांपासून दूर जाण्याचं दुःख.

गल्लीत नेहमीची दुपारची शांतता पसरलेय. भाजीवाला आपली गाडी तशीच सोडून कुणाचीतरी भाजी पोचवायला बिल्डिंगमध्ये शिरलाय. रस्त्याच्या तोकड्या जागेत मध्ये नेट लावून मुलं बॅडमिंटन खेळतायत. तिसऱ्या मजल्यावरच्या लिमयांच्या मुलाशी त्याचा मित्र रस्त्यावरून अभ्यासाबद्दल बोलतोय.

त्या गडबडीतच मी गाडीत बसतो गाडी चालवायला लागतो. गल्लीच्या तोंडापर्यंत पोचायलाच चार पाच हॉर्न्स होतात. रस्त्यावर गाड्यांची गर्दी ओसंडून वाहतेय. प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी पोचायचंय. रस्ते थोडे वाहनं फार झालेयत. पण सगळं कसं शिस्तीत चाललंय. लोकं लेन बदलतायत रेटारेटी करतायत मध्येच गाड्या घुसवतायत आणि मीही.

मजल दरमजल करत आम्ही एअरपोर्टला पोचतो. गर्दी ओसंडून वाहतेय. आपापल्या लोकांना निरोप देऊन लोकं चालू पडतायत. आणि मीही.

४ जानेवारी २००९, मेलबर्न.

जगाच्या कुठल्यातरी भोकात जाऊन मी वर्षभर बसलो की परत भारतात आल्यावर सार्वत्रिक गोंधळ असल्यासारखं वाटतं खरं, पण दिवस जातात आणि त्या गोंधळाच्या पडद्याआड लपलेली एक संघटना दिसायला लागते.

India is a beautiful formation in the midst of chaos.