विरक्त

अर्धमिटल्या डोळ्यानी अशी मजकडे पाहू नको.
दर्दभरा तो सूर मनीचा पुन्हा असा छेडू नको.

करपलेल्या मनास या कोंब आता फुटणार नाही.
तवप्रीतीचे अमृत ते वाया असे घालवू नको.

दिले होते सर्वस्व कोणा जिणे टाकले ओवाळून
हरलेल्या त्या जुगाराचा डाव पुन्हा लावू नको.

कांचनास पुजिती सारे हृदय पायी तुडवून
शब्दांवर नुसत्याच माझ्या तू अशी भाळू नको.

मध्यान्हीचा आगडोंब टाकी फुले कोमेजून
सुकुमार कळीत माझा जीव तू गुंतवू नको.

परतणार नाही कधी जाईन जग हे सोडून
वाट माझ्या माहेराची तू आता अडवू नको.