डॅनी बॉयलचं जगप्रसिद्ध त्रिकूट...!

झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत हे तीन शब्द कधी कुणी एकत्र म्हटले असते का? पण डॅनी अंकलनी ते तसे म्हटले. या तीन गोष्टींचा आपापसांत संबंध जोडायचाच झाला तर असा जोडावा लागेल की झोपडपट्टीच्या आसपास कुत्री असतात आणि गर्भश्रीमंतांकडेही (षौक म्हणून) कुत्री असतात. आता, ‘अ’ चा ‘ब’ शी संबंध असेल आणि ‘ब’ चा ‘क’ शी असेल तर ‘अ’ चा ‘क’ शी ही संबंध असतो असा बीजगणिताचा नियम आहे. आधीच गणित आणि त्यात वर बीजगणित - मग त्या नियमाला कोण आव्हान देणार? त्यापेक्षा तो नियम मुकाटपणे पाळलेला बरा. त्यामुळे ‘झो’, ‘कु’ आणि ‘ग’ यांना अ, ब, क च्या जागी (मुकाटपणे) सब्स्टिट्यूट करून (सब्स्टिट्यूशन शिवाय बीजगणित म्हणजे भांडणांविना संसार, निवडणुकांविना भारत देश, आरत्यांविना गणेशोत्सव आणि कुत्र्यांविना - पुन्हा कुत्री! - दत्ताची तसबीर) - तर तसं सब्स्टिट्यूट करून हे सिद्ध होतं की झोपडपट्टी, कुत्रा आणि गर्भश्रीमंत यांचा आपापसांत (बीजगणिती) घनिष्ठ संबंध आहे.
बीजगणिताच्याच अजून एका नियमानुसार कधी कधी अ, ब, क च्या जागी ३-३ गोष्टींचे अनेक गट चपखल बसू शकतात. उदाहरणार्थ मॅकडॉनल्डस, बर्गर आणि राजकीय पक्ष. मॅकडॉनल्डसचा बर्गर जगप्रसिद्ध आहे आणि आपले राजकीय पक्ष बर्गरच्या मराठी भावंडाला जगप्रसिद्ध करायच्या प्रयत्नात असतात. म्हणजे मॅकडॉनल्डस आणि राजकीय पक्ष यांचा संबंध प्रस्थापित होतो... अजून एक उदाहरण - महेंद्रसिंग धोणी, क्रिकेट आणि व्याकरणातले काळ! धोणी क्रिकेट खेळतो, क्रिकेटचे ३ प्रकार असतात आणि व्याकरणातल्या काळाचेही भूत, भविष्य आणि वर्तमान असे ३ मुख्य प्रकार असतात. कसोटी क्रिकेट हे भूत, एक दिवसीय क्रिकेट म्हणजे वर्तमान आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट म्हणजे भविष्य! म्हणजेच धोणीचा आणि व्याकरणाचा संबंध प्रस्थापित झाला... अशी अनेक त्रिकुटं पैदा करता येतील. (असेल पायथागोरस श्रेष्ठ भूमितीतज्ज्ञ, म्हणून इतरांनी आपापली तऱ्हेतऱ्हेची ट्रिप्लेट्स काढूच नयेत की काय! )
जर अशी अनेक त्रिकुटं उपलब्ध होती तर मग डॅनी अंकलनी झो-कु-ग हेच त्रिकूट का बरं निवडलं असेल? त्यांनी मॅकग्रिल पोलिटिकल फार्स किंवा धोनीज क्रिकेट (टे/से)न्स असा सिनेमा का नाही काढला? क्रिकेटवरचा सिनेमा तर भारतात धो-धो चालला असता. ‘झो-कु-ग’ला म्हणे निवडक प्रेक्षकवर्गच लाभला आणि त्यांतल्या निम्म्यांना तो गरिबीचा बाजार वगैरे वाटला. त्यापेक्षा धोणीचा क्रिकेट सेन्स ऊर्फ टेन्स पहायला लोकांना जास्त आवडलं असतं. धोणीला क्रिकेट सेन्स आहे आणि तोच भारतीय क्रिकेटचा फ्यूचर टेन्स आहे असं त्या सिनेमात दाखवलं असतं म्हणजे ‘वास्तववादी दृष्टीकोन’ वगैरे पण सांभाळला गेला असता. ऑस्कर तर काय डॅनी अंकलच्या नशीबात होतंच, ते कुठे पळून जाणार होतं? शिवाय क्रिकेटवरच्या सिनेमाला ऑस्कर म्हणजे जाता-जाता ‘लगान’ला खुन्नस देता आली असती... अशी खरं म्हणजे एका दगडात अनेक कुत्री केकाटली असती, पण...

... पण, गरीबी आणि गर्भश्रीमंतीला एकत्र आणणारा कुत्रा ही (मध्यवर्ती) कल्पना अंकलना इतकी म्हणजे इतकी आवडली की त्यांनी त्याला पर्याय म्हणून दुसऱ्या कशाचा विचारच केला नाही आणि ‘झो-कु-ग’ काढायचं नक्की केलं!
संपूर्ण जगात झो-कु-ग या तीन गोष्टी फक्त भारतातच एकत्र नांदतात हे त्यांच्यातल्या चाणाक्ष दिग्दर्शकानं लगेच ताडलं. युरोप-अमेरिकेत कुत्री आहेत, श्रीमंती आहे पण बकाल गरीबी नाही. (म्हणजे आपल्याला तरी तसंच दर्शवलं जातं - जसं भारतात फक्त गरीबी आहे हे तिकडच्या लोकांना दाखवलं जातं); आफ्रिकेत कुत्री आहेत, बकाल गरीबी आहे पण गर्भश्रीमंत शोधावे लागतील; रशिया-चीनमध्ये झो-कु-ग पैकी काय काय आहे आणि काय काय नाही याचा बाहेर कुणाला पत्ताच लागू दिला जात नाही; दक्षिण अमेरिकेत जायचा डॅनी अंकलनाच कंटाळा आला होता. राहता राहिला भारतीय उपखंड आणि त्यातही आपला भारत देश...!!

परदेशात सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं आपलं शहर म्हणजे मुंबई! आर्थिक राजधानी वगैरे सगळं आपल्यासाठी... ‘मुंबाऽऽय’ म्हटलं की परदेशी लोकांना आठवतं ते हॉलीवूडशी ओढूनताणून यमक जुळवलेलं बॉलीवूड! (पूर्वी बॉम्बे होतं तेव्हा बॉलीवूड म्हणणं एक वेळ ठीक आहे. पण आता ‘मुंबाऽऽय’मुळे त्याला मॉलीवूडच म्हटलं पाहीजे. )
मुंबईत येऊन सिनेमा काढायचा तर बॉलीवूडची सोबत पाहिजेच आणि हॉलीवूड आपली सोबत-मदत मागतंय म्हटल्यावर मग काय... इथे त्यांच्यासाठी (नेहेमीप्रमाणे) पायघड्या अंथरल्या गेल्या तर त्यात नवल ते काय!
‘बाँबे ड्रीम्स’मुळे ए. आर. रेहमान त्या लोकांना आधीपासूनच माहिती होता. दक्षिण भारतीय चित्रपट आणि त्यांतलं संगीत जसंच्या तसं हिंदीत येत असल्यामुळे रेहमानलाही फारसं काम नव्हतंच! त्यामुळे तो ही ‘झो-कु-ग’ला संगीत द्यायला तयार झाला. गुलजार तर काय ऑल टाइम फेवरिट आहेच. लोकेशन आणि इतर कलाकार धारावीत आयते तयार होतेच... अशी ‘झो-कु-ग’ची सगळी भट्टी जमली. (म्हणजे, आता ‘जमली’ म्हटलं पाहिजे. तेव्हा कुठे कुणाला स्वप्न पडलं होतं की या सिनेमाचं पुढे हे असं होणार आहे ते! )

॥ जमली अशी सगळी भट्टी, त्यातच होता रसूल पुकुट्टी ॥
॥ रेहमानची दोन-पुकुट्टीचं एक, डॅनी काकांना उरलेली पाच-एक॥
॥ खूष होऊन अनिल कपूर नाचला, धारावीत शूटींग-जो तो धावला॥
॥ सगळा देश गातोय ’जय हो’, पण त्या धारावीतल्या मुलांचं काय हो? ॥