तळघर

आमची प्रेरणा जयंता५२ यांची सुरेख कविता पोटमाळा

माझ्या घराप्रमाणे
माझ्या मनातही
आहे एक तळघर..
जिथे टाकून दिल्या आहेत
कितीतरी तुटक्या-फुटक्या, वापरात नसलेल्या आठवणी..
ज्या आहेत तिथे वर्षानुवर्ष.
शक्यतो काढत नाही.
अन त्यावरची धूळ न झटकता दडपून टाकतो पुन्हा तशाच!
त्या जपून ठेवण्याचे काही कारण नाही पण
फेकून दिल्या तर त्या जात नाहीत.
मात्र कधी कधी माझं सुंदर, चकचकीत वर्तमान.. बिघडवण्यासाठी
उफाळून येतात
त्या तुटक्या-फुटक्या आठवणी
मिठाचा खडा म्हणून....
आणि काम भागतं
मॉलमध्ये जाऊन पुन्हा सुंदर, चकचकीत, नवीन वर्तमान आणेपर्यंत!