दृष्टिने गणले तुझ्या रे, प्रीतिच्या जोगे मला

दृष्टिने गणले तुझ्या रे प्रीतिच्या जोगे मला
स्पंदना तू थांब आता, आसरा लाभे मला ।ध्रु।

प्रीतिचा प्रस्ताव मी - हा तुझा स्वीकारते
आज देवाची दया - मज दिसे, पाहू तिथे
हसुन सामावून घेसी जीवनी संगे मला ।१।
दृष्टिने गणले तुझ्या रे ...

मी असे तुज आसरा - आसरा अन् तू मला
वादळाला का भिऊ - तीर असता तू मला
जा म्हणावे वादळाला तीर हा लाभे मला ।२।
दृष्टिने गणले तुझ्या रे ...

ज्या क्षणी हृदयावरी - रे तुझी छाया पडे
वाटले झंकारल्या - शत सतारी चहुकडे
सौख्य हे जन्मांतरीचे आजला भेटे मला ।३।
दृष्टिने गणले तुझ्या रे ...


पाठभेदः

१. प्रस्तुती ही प्रीतिची - मी तुझी स्वीकारते. (असे म्हटले म्हणज वरील ओळीत प्रऽऽऽस्ताव असे म्हणण्याचा त्रास वाचेल! )

किंवा अधिक शब्दशः भाषांतर :

हा तुझा निर्णय मला - मान्य आहे सर्वथा
दिसत देवाची कृपा - दृष्टिदृष्टीला अता

२. सनइचे स्वर वाटले - गुंजती चोहीकडे .... हे जास्त शब्दशः भाषांतर होईल. (आपले आवडते वाद्य वाजवावे. सनई लग्नात बरी)

३. 'जन्मांतरीचे' ऐवजी 'दोन्ही जगांचे' किंवा 'त्रैलोक्यभरचे' .. असे वापरून पाहता येईल.

४. सर्व कडव्यांत ह्या ऐवजी भेटे, लाभे, गवसे, आहे ... असे निरनिराळे पर्याय वापरून पाहता येतील.

५. स्पंदना तू थांब. मी जे इच्छिले, लाभे मला


चाल :
मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

ध्रुवपद आणि कडव्याची शेवटची ओळ - गालगागा गालगागा गालगागा गालगा
कडव्याच्या पहिल्या दोन ओळी - गालगागा गालगा - गालगागा गालगा

(भाषांतर चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. तुम्हाला सुचवयला आवडले तर ध्रुवपदाचे भाषांतरही लिहून कळवा.