विष कवितेचे...!

.................................
विष कवितेचे...!
..................................

स्मरणांनी मज असेच डिवचायला हवे...!
...गतकाळाला पण मी विसरायला हवे!

हिरवेपण हे अजून तितके गडद कुठे?
अजून, थोडे अजून, झिरपायला हवे!

तुझा अबोला नवीन आहे कुठे मला?
त्यासाठी का खरेच बिनसायला हवे?

नासणार का अशीच सारी हयात ही?
क्षणाक्षणाने असेच विरजायला हवे?


असेच घडले आजवरी अन् घडो पुढे...
जमून आले न तोच बिघडायला हवे!!

पटली नाही अजून ओळख मज माझी...
किती जन्म मी स्वतःस निरखायला हवे?

खरोखरी जर तुला प्रवाही बनायचे...
दुःख जगाचे तु्झ्यात वितळायला हवे!

कल्पनाच ही मिठीत घ्यावी पुन्हा पुन्हा...
- कुणीतरी मज हळून बिलगायला हवे!

भेटण्यास मी तुला न बोलावले जरी...
तुझे न येणे किमान फिरकायला हवे!

बनू लागली सापट साऱ्या जगण्याची...
इथून आता खरेच निसटायला हवे!

अमृतमय का सुचेल काही फुकाफुकी?
विष कवितेचे मनात भिनवायला हवे!!

- प्रदीप कुलकर्णी

.................................
रचनाकाल ः १८ एप्रिल २००९
.................................