धुक्यातून उलगडणारे जी ए - ७ - तुती

' आपल्या कथा या आपण आपल्या स्मरणातील व्यक्तींना, प्रसंगांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे' या अर्थाचे (अर्थाचेच - जी. ए. 'श्रद्धांजली' वगैरे शब्द वापरणाऱ्यांतले नव्हते!) जी. एं नि बऱ्याच वेळा, बऱ्याच लोकांना लिहिले आहे. आपल्या कथांमधील बहुतेक व्यक्ती आणि  प्रसंग आपल्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्यावर आधारलेले आहेत असेही ते लिहितात. बहिणीचे प्रेम  ( आणि गाय) या गोष्टीचा जी. एंच्या कथांमध्ये अगदी तो टवाळीचा विषय होईपर्यंत उल्लेख होतो. सुशी आणि जाई या जी. एंच्या अकाली निधन पावलेल्या बहिणी हा त्यांच्या आयुष्यातील एक फार खाजगी, हळवा कोपरा होता. जी. एंसारख्या उग्र राखुंडी प्रतिमा असलेल्या व्यक्तीचा हळवेपणा हा विरोधाभास वाटेल, पण जी. ए. वैयक्तिक आयुष्यात अतिशय संवेदनशील, हळवे असले पाहिजेत असे मला वाटते. हा हळवेपणा आपला कमकुवतपणा म्हणून लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी माणूसघाणेपणाचे, तुसडेपणाचे वस्त्र पांघरले असावे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

जी. एंच्या 'तुती' या कथेतला निवेदक हा एक लहान मुलगा आहे. अगदी भोंगळ विधान करायचे तर हे लहानपणीचे जी. एच.  हा 'मी' आणि त्याचे बालपण यावर आधारीत जी. एंच्या काही फार सुंदर कथा आहेत. 'तुती','कैरी', 'राधी' (आणि जी. एं ना लिहायची असलेली पण (दुर्दैवाने) त्यांनी न लिहिलेली 'केळी' ) अशी काही चटकन आठवणारी उदाहरणे. गावाकडचे सर्वसामान्य घर. दुबळे, अशक्त पण मिस्कील वडील नाना ('राधी' मधले आबा) , करारी, फटकळ आई, तापट, चटकन डोक्यात राख घालणारा दादा आणि निरागस, मायाळू मोठी बहीण सुम्मी. या बहिणीविषयी 'कैरी' मध्ये फार सुरेख वर्णन आहे. तानीमावशी या सुम्मीविषयी बोलताना म्हणते,' आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्या वेळी कमळी (कथानायकाची आई) ताम्हण घासून लालभडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकाने काढत असे. आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुम्मी झाली तीदेखील असल्याच श्रीसारखी - कोवळी शांत वासाची!'  पण असल्या घरगुती, उबदार गोधडीसारख्या कुटुंबावर सतत पडत असलेली अठराविश्वे दारिद्र्याची छाया - तिचे काय? त्या गरीबीच्या तडाख्यांने ते कुटुंब बघताबघता विस्कटल्यासारखे होते. देवघरातल्या शांत समईसारख्या बहिणीचे म्हाताऱ्या बिजवराशी लग्न लावून देण्याशिवाय नानांना काही पर्याय राहत नाही. त्या उर्मट, रानवट घरात सुम्मी विझून, करपून जाते. आणि शेवटी माजघरात, हातपाय बांधून, तोंडात बोळा घालून सासरच्यांकडून मारहाण सहन करुन, अंगावरचे चटके सहन करून शेवटी आड जवळ करणाऱ्या असंख्य सुम्मींसारखी ती संपून जाते.
आणि या सगळ्याचा साक्षीदार असणारा तो कथानायक - त्याला काही धड समजतच नाही. आठवड्यात चारदा वांग्याची भाजी झाली असली तरी नाना परत धोतरात बांधून जांभळी, गुळगुळीत वांगी का आणतात आणि' वा! आज काय सुरेख वांगी मिळाली! आता भरल्या वांग्याची भाजी कर, फार दिवस झाले खाऊन!' असे का म्हणतात , ज्या मल्लाप्पा कासाराच्या घरी आपण भाड्याने राहतो, तो मल्लापा हल्ली नानांना तडतडा का बोलतो आणि त्यावर नाना काही बोलत का नाहीत, आईच्या हातातल्या बांगड्या ओरबाडून करकरीत तिन्हीसांजेला नाना का बाहेर पडले आणि त्या रात्री कुणी कुणाशी बोलले का नाही, सुम्मीच्या लग्नात इतके सगळे जिवापाड करुनही तिच्या सासरच्या मंडळींचे वाट्टेल ते बोलणे नानांना का ऐकून घ्यावे लागले, 'तिच्या सासरी जाते आणि त्यांच्या मोलकरणीपर्यंत सगळ्यांच्या पाया पडते' असे म्हणून आई रडू का लागली, सुम्मीच्या हातावर डागल्याचा जांभळा डाग का पडला आणि ती सुम्मी... सुम्मी विहिरीत पडून गेल्याचे कार्ड येताच खूप भूक लागलेली असतानाही आपल्याला जेवण नको, काही नको, कोपऱ्यात जाऊन एकीकडे बसावे आणि रडावे असे का वाटले.... यातले काही त्या लहान पोराला समजत नाही.
असली ही खास जी. ए. शैलीची कथा तुती. जुन्या घरातल्या परसात तुतीचे झाड होते. तुतीचे गुपीत फक्त सुम्मी, दादाला माहीत होते. तुती थोडी कच्चीच असावी. म्हणजे अगदी कच्ची नव्हे तर थोडी पिकलेली, अगदी पिकलेली नव्हे तर थोडी कच्ची - म्हणजे गोडही लागते आणि आंबटही लागते. जीभ रवरवते, आणि गोडही लागते. मग तुती बराच वेळ ध्यानात राहते. हे सुम्मी- दादाला माहीत होते, पण ते तर आता इथे नाहीत....
आणि सुम्मी? ती तर आता कुठेच नाही. हसली की देव्हाऱ्यावरच्या पितळी तोरणाचे घुंगरू वाजल्यासारखे वाटत ती आईच्या चेहऱ्याची सुम्मी, 'अहा बघा भागुबाई! विहिरीला घाबरतोय. ती काय गिळतेय की काय तुला? ' म्हणून हसणारी सुम्मी, सुट्टीत दादाशी सारखी भांडणारी, पण सुट्टीनंतर दादा कॉलेजला जायला निघाला की लहान मुलीसारखी रडणारी सुम्मी,  वयाने आपल्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या  बिजवराशी आपल्याला कुणी न विचारता लग्न ठवल्यावर गुढग्यावर हनुवटी ठेवून गप्प बसणारी सुम्मी आणि लग्नात धाकट्या भावाने निरागसपणे ' सुम्मी, तू आता आमच्याकडे कधी येणार? ' असे विचारताच समजूतदारपणाने 'तुम्ही बोलवाल ना भाऊसाहेब, त्या वेळी! ' असे म्हणणारी आणि त्याला जवळ घेऊन 'मला विसरायचं नाही हं, आणि दादा भेटला तर सांग त्यालाही.. ' असे हळूच म्हणणारी सुम्मी...  
सुम्मी तर आता कुठेच नाही. तिच्या आवडीचे रायआवळे, तुती आता जुन्या घरात राहिले. कृष्णी गाय नव्या घरात आली खरी, पण सुम्मी गेल्यावर नानांनी जे अंथरुण धरले, ते तिला समजले की काय कुणास ठाऊक! तिच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहू लागले. ती का रडते? तिला कसल्या आठवणी येतात? हे सगळे समजायच्या आतच तीही संपून गेली. दोघातिघांनी तिला उचलून बाहेर आणले, दर चौकटीला तिची शिंगे खटखट बडवली आणि तीही निघून गेली....
आणि या नव्या, खुराड्यासारख्या घरात आता अंथरुणाला खिळलेले नाना, आता अगदी चेपल्यासारखी झालेली, हाडे वर आलेली आई आणि या सगळ्याचा साक्षीदार असलेला श्रीपूमामा....
आणि मग पहिलीत पास झालेल्या या कथानायकाला ती विझून गेलेली आई म्हणते, 'कारट्या, तू बी. ए. हो अगर होऊ नको, पण आतून बाहेरून अगदी दगड हो, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ!' 
 हे असले घट्टे पडलेले, धोंड्यासारखे होणे बाकी जी. एंना जमले नसावे.
पण 'तुती' म्हणजे केवळ अशी दारिद्र्यात पिचलेल्या कुटुंबाची आणि आपल्या पित्याच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालून हसत हसत चितेवर चढणाऱ्या समंजस वगैरे भारतीय मुलीची हाय हाय कथा नाही. 'तुती' मध्ये जी. एंनी त्यांच्या इतर अनेक कथांप्रमाणे आयुष्याचे वरचे विरविरीत पापुद्रे सोलून आतला लसलशीत गाभा उघडा केला आहे. शब्दांचे कोणतेही खेळ, विभ्रम न करता साध्या अक्षरांतून आता कालौघात नष्ट झालेल्या, पण कोणे एके काळी अस्तित्वात होता या कल्पनेने अस्वस्थ करणाऱ्या समाजाचे चित्रण केले आहे. चित्रण हा शब्दही आता गुंडगोळा झाला आहे खरा, पण तो वापरावा वाटतो याचे कारण असे की ही आणि अशा कथा वाचताना जणू आपण एखाद्या चित्रपटाची पटकथा वाचतो आहोत असे वाटते. ही सगळी माणसे, प्रसंग फक्त कागदावरील अक्षरे राहत नाहीत, ती आपल्या आसपास वावरू लागतात. काहीसा असाच अनुभव माडगूळकरांचे लेखन वाचताना येतो. खानोलकरांचेही. पानवलकरांचेही.
जी. एंच्या लिखाणात हे सातत्याने दिसते, हे त्यांचे वैशिष्ट्य. 'तुती' मधील अशी चित्रदर्शी भाषेची आणि प्रसंगांची असंख्य उदाहरणे इथे देण्याचा मोह टाळतो. कारण एकचः ज्यांनी आजवर 'तुती' वाचली नाही, त्यांना ती मुळातून वाचावी, असे वाटावे.

'तुती', 'साधनाः दिवाळी १९६१, 'हिरवे रावे' मध्ये समाविष्ट