धुक्यातून उलगडणारे जी. ए. -५

जी. ए -  पूर्वग्रह - विसंगतींचे गाठोडे

'आपले पूर्वग्रह पूर्ण गाठी मारल्याप्रमाणे असंस्कृत आणि गावठी आहेत' या मताची जी. एं. नि आपल्या खाजगी लिखाणात मुक्तहस्ताने उधळण केली आहे. इतकी, की ते या मताचे आणि या मतातून निर्माण होणाऱ्या आपल्या प्रतिमेचे उदात्तीकरण करताहेत की काय अशी शंका यावी. मूकपणे, फार दुरून,   स्वतः झिजत भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या शरदचंद्रांच्या नायिका त्यांना हास्यास्पद वाटत असत. पु. लं. च्या लिखाणाविषयी लिहिताना जी. एं. नि सुनीताबाई देशपांड्यांना एक आणि इतरांना भलतेच असे लिहिले आहे. यामागे 'सुनीताबाईंची निखळ, तीव्र वैचारिक मैत्री गमावू नये' असा एक रोख विचार असल्याचे काही लोकांचे मत आहे. पु. लं. च्या लिखाणाबाबत ' ते इतका गुलाल फेकतात की तो डोळ्यांत जातो' या मताशी आपण सहमत नाही असे ते लिहितात. इतरत्र बाकी त्यांनी पु. लं. चे लोकप्रिय होण्यासाठीचे लिहिणे, इन्स्टंट भारावून जाणे याविषयी असेच लिहिले आहे.

आपली मते, पूर्वग्रह जुनाट, प्राचीन आहेत याही गोष्टीचा जी. एं. नि वारंवार उल्लेख केला आहे. पूर्णपणे नास्तिक वृत्तीच्या जी. एं. ना संध्याकाळी घरात मुलांनी 'शुभं करोती' म्हणणे फार आवडत असे. तसेच घरासमोर घातलेली रांगोळी. याउलट (स्त्रियांबाबत त्यांच्या मनात एकंदरच तिटकारा असला  तरी त्यातल्या त्यात) 'तीन चतुर्थांश अंग पूर्णपणे उघडे व उरलेले अर्धवट उघडे टाकून हिंडणाऱ्या हल्लीच्या पुष्कळ नायलॉन निर्लज्ज बायका पाहिल्या की मला मस्तकतिडीक उठते' असे ते लिहितात. स्वतःला धूम्रपानाचे जबरदस्त व्यसन असलेल्या   जी. एं. ना स्त्रियांनी सिगारेट ओढलेली अजिबात आवडत नसे, या विरोधाभासाला काय म्हणावे? पिवळा टाय बांधणारी, चहा न पिणारी, ओठाची कुंची करून तंबाखू चघळत बोलणारी, अमिताभला नट समजणारी व हेमामालिनीला सौंदर्यवती समजणारी माणसे आपल्याला आवडत नाहीत असे जी. ए. म्हणत. अमिताभचा एकही चित्रपट न बघता त्याच्या अभिनयाचा घाऊक तिटकारा करावा असे  जी. एं. ना का वाटले असावे?

पुणे हे जी. एं. चे नावडते गाव. दुर्दैवाने त्यांना आयुष्यातली शेवटची काही वर्षे पुण्यातच काढावी लागली. 'मुंबईला किमान समुद्र तरी आहे. पुणे हे शहर जास्त ऍक्टिव्ह माणसांसाठी आहे. व्यापार आहे, चळवळी, व्याख्याने, चर्चा, गच्चीवरच्या गप्पा, तळघरातील मसलती सतत काहीतरी घडत आहे. जर येथे एखादा माणूस कुठे, शांतपणे काही न करता बसलेला दिसला तर त्याला उचलून सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील की काय अशी मला भीती वाटते' असे ते लिहितात. एकंदरीत बिनचेहऱ्याच्या, बिनओळखीच्या शांत गावात राहणे जी. एं. ना आवडत होते. धारवाडात ते इतकी वर्षे राहिले, पण थोर मराठी साहित्यिक या अर्थाने त्यांना ओळखणारे धारवाडातही फारसे लोक नव्हतेच. हिंदी चित्रपटांविषयीचे त्यांचे मत तर जगजाहीरच आहे. हिंदी चित्रपटात उद्या या गोष्टी दिसल्या तर त्यांवर बाकी विश्वास ठेवणे मला जमणार नाही म्हणून जी. ए. जी यादी देतात ती वाचून हसू  येते : वेळेवर कपडे देणारा शिंपी, रात्री ताणून झोप न काढणारा नाईट वॉचमन, शोकेसमध्ये साड्या मांडलेल्या असता तिकडे पाठ करून फूटपाथवर उभी असलेली स्त्री, वेणीफणी करताना तोंडात हेअरपिना न धरणारी बाई, साहेबावर आपले किती वजन आहे हे न सांगणारा पुरुष, आपणाला किती आजार आहेत हे न सांगणारा म्हातारा, एखाद्या जुन्या, मेलेल्या उंदराकडे पाहावे त्याप्रमाणे आपल्याकडे न पाहणारा बँकेतील बाजीराव कारकून, इंग्रजी चित्रपट पाहताना "काय म्हणाला हो ती? काय म्हणाली हो ती? " असे सतत न विचारणारी शेजारी बसलेल्या जोडप्यांपैकी नवपरिणिता, पेपर उघडतो न उघडतो तोच "झाला का पेपर? " म्हणत समोर ठिय्या न मांडणारा निगरगट्ट फुकटा वाचक शेजारी...   किती बारीक, खोल निरीक्षण आहे हे!

  व्यवस्थितपणाविषयी त्यांनी चहा -साखरेचे डबे जेथल्या तेथे ठेवण्याचा गावठी गुण असे म्हटले आहे. व्यवस्थितपणा हा जणूकाही अक्षम्य दोषच असावा असाच त्यांचा रोख दिसतो.   व्यवस्थितपणाला नावे ठेवणाऱ्या जी. एं. नि सुनीताबाई देशपांडे, माधव आचवल अशांची पत्रे व्यवस्थित जपून ठेवली होती; एवढेच काय, पण आपले शालेय जीवनापासून लिहिलेले प्रकाशित / अप्रकाशित साहित्यही सांभाळून ठेवले होते. म्हणजे स्वतःला सोयिस्कर इतका व्यवस्थितपणा चालेल, इतरांबाबत मात्र उपहास असे जी. एं. चे धोरण असावेसे वाटते.

प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर राहण्याचा जी. एंचा हव्यास एका व्यक्तीचा खाजगी निर्णय म्हणून पटण्यासारखा आहे. पण एकंदरीतच आपण किती जुनाट, शेवाळलेले आहोत, हे त्यांना वारंवार अधोरेखित करण्याची गरज का वाटली असावी याचे नवल वाटते. पण तसे असतानाच मधूनमधून खाजगी आयुष्यात होणाऱ्या उलथापालथींनी ते काहीसे डचमळलेले दिसतात. बऱ्याच गोष्टींमध्ये जी. एंना 'गर्भवती स्त्रीचा खुळचट हळवेपणा ' दिसतो. पण अशी कडूजहर टीका करताना  आपल्या आयुष्यातही अशा   'हळवेपणाच्या खुळचट' जागा आहेत या कल्पनेने ते अस्वस्थ होतात. त्यांच्या कथांमधील गाय व बहिणीचे प्रेम ही अशीच एक जागा. त्यांवरची टीका  मात्र जी. एंच्या जिव्हारी लागते आणि ते विषय 'टॅबू' असल्याने त्यांवर बिलकूल भाष्य करणार नाही असा ते पवित्रा घेतात.   त्यांचे वरवरचे माणूसघाणेपण, लोकांना टाळण्याची वृत्ती हे त्यांनी या हळव्या जागा लपवण्यासाठी घेतलेले कवच आहे असे बऱ्याच लोकांनी व्यक्त केलेले मत पटू लागते. आपल्या लहानपणी घरी गाय असे, त्यामुळे आपल्या लिखाणात गायीचे उल्लेख हे अपरिहार्य आहेत हे त्यांचे म्हणणेही पटत नाही. मधू मंगेश कर्णिकांचे 'लागेबांधे' हे पुस्तक हळवे आहे, फारच हळवे आहे असे म्हणून एकंदरीतच साहित्यातील भाबडेपणावर आणि हळवेपणावर टीका करणारे जी. ए. त्याच पत्रात, त्याच परिच्छेदात ' वडिलांविषयी, आईबहिणींविषयी, घराविषयी (गाईविषयी? ) हळवे व्हायचे नाही, तर कोणाविषयी? ' असे विचारतात, तेव्हा त्यांची भूमिका समजेनाशी होते.

गांधीवादाविषयी (स्वतःचा फारसा अभ्यास नसतानाही) जी. एंची तीव्र मते वाचून नवल वाटते. ऐंद्रिय सुखांना नाकारण्याचा गांधीवादातला हट्ट त्यांना पोरकट वाटतो. 'आत्मा चिरंतन आहे, आणि काळ अनंत आहे. ते आपले एकमेकांना सांभाळून घेतील! इंद्रिये माझे साथी आहेत, शत्रू नव्हे. काळाने माझ्यासमोर कापडाचा जो एक तुकडा टाकला आहे, त्यावर मी कीही गिजबिज करीन. भाग्य असेल तर त्याचे एक चित्रदेखील होईल, पण त्याची भगवी लंगोटी मात्र करण्याचा खुळचटपणा मी करणार नाही, ' हे त्यांचे शब्द! मार्क्सवादाविषयीही जी. ए. लिहितात, ' इतके अनाकर्षक, कोडगे, वैराण, हमाली तत्त्वज्ञान मला कोठे आढळले नाही. मार्क्सवादी तत्त्वज्ञान घर बांधायला मदत करते, पण त्या घरात राहावे कसे हे शिकायला अन्यत्र गेले पाहिजे'. संतसाहित्याविषयीही त्यांचे असेच जबरदस्त पूर्वग्रह आहेत. संतांचा मानवी स्वभावाशी अत्यंत कमी परिचय होता, म्हणून सगळे संतसाहित्य अत्यंत मर्यादित, कोते आणि ज्या त्या संताच्या व्यवसायाशी निगडित झाले आहे असे जवळजवळ 'स्वीपिंग स्टेटमेंट' ते करतात. 'माळी विठ्ठलाला कांदामुळेवांगी समजतो; चांभार स्वतःला वाहण समजतो - 'हे विठ्ठला, माझ्या आयुष्यावर तुझ्या पावलांचा रंधा मार' असे एखाद्या सुताराने लिहिले आहे की काय हे शोधून पाहिले पाहिजे'  - असे लिहिणाऱ्या माणसाचा संतसाहित्याचा अभ्यास असेल तर त्याला काही महत्त्व देता येईल. पण तसा तो आपला नाही हे अनेकदा सांगणाऱ्या जी. एंना संतसाहित्यावर अशी चिखलफेक करावीशी का वाटली असावी?    

दळवी हे जी. एं. चे अनेक वर्षांचे (पत्र) मित्र. जी. एं. चा आणि त्यांचा पत्रव्यवहार जी. एं. चा अखेरच्या एकदोन वर्षांतच थांबला होता. हा पत्रव्यवहार, विशेषतः त्यातली जी. एं. ची पत्रे वाचली की हे किती घट्ट मित्र होते, असेच एखाद्याला वाटेल. पण जी. एं. च्या मृत्यूनंतर दळवींनी लिहिलेल्या लेखातून ('परममित्र') जी. एं. चे एक वेगळेच, धक्कादायक चित्र समोर येते. जी. एं. ना दळवी स्वतःची प्रतिमा तयार करण्यात गढून गेलेला खोटारडा माणूस म्हणतात. जी. एं. च्या 'बुवाबाजी' चे काही किस्सेही दळवींनी सांगितले आहेत. जी. ए. धारवाडला असताना दळवींना एकदा त्यांना भेटायला जायचे होते, तर त्यांनी येऊ नये म्हणून जी. एं. नि कशी खोटीनाटी कारणे सांगितली आणि त्यातून दळवी धारवाडला गेलेच, तेव्हा आता यांना टाळणे अशक्य आहे हे ध्यानात आल्यावर बाकी जी. एं. नि त्यांचे हसूनखेळून कसे स्वागत केले हे दळवी त्यांच्या नेहमीच्या औपरोधिक शैलीत लिहितात. साहित्य संमेलने, साहित्यिकांचा मेळावा अशा गोष्टींच्या वाटेलाही न फिरकलेल्या जी. एं. ना पुण्या-मुंबईतील सर्व लेखकांची हालहवाल (आणि त्यांना मिळणारे पैसे, त्यांच्या भानगडी वगैरे) याबाबत खडानखडा माहिती होती असे दळवी लिहितात (आणि तसे ते आपल्याला जी. एं. ची पत्रे वाचून जाणवतेही), तेव्हा मात्र जी. एं. ची आपल्या मनातील प्रतिमा वितळू लागते. लोकांना स्वतः लिहायचे नाही, किंबहुना आपण लिहिले असे दाखवायचे नाही असे ठरवून जी. एं. नि  'देवदत्त जोशी' नावाचा एक काल्पनिक 'सेक्रेटरी' नेमला होता आणि काही पत्रांवर ते स्वतःच 'देवदत्त जोशी' अशी सही करत असत ('वर्षाकाठी दोन कथा लिहिणार आणि त्यासाठी सेक्रेटरी? ' इति दळवी) असेही दळवी सांगतात.

जी. एं. ची आणि दळवींची भांडणेही खूप झाली. त्यांची एकमेकांना लिहिलेली बरीच पत्रेही चावट, क्वचित अश्लील - अनप्रिंटेबल भाषेत आहेत. खते तर या दोन्ही थोर लोकांच्या मृत्यूनंतर असे काही चव्हाट्यावर आणणे योग्य नव्हे, पण दळवींनी स्वतःच लिहिलेला एक किस्सा येथे सांगावासा वाटतो. जी. एं. च्या एका कथेच्या भाषांतराच्या संदर्भात काहीसा गैरसमज झाला आणि जी. एं. नि दळवींना चक्क नोटीस पाठवली. मागोमाग नोटीस मिळाली की नाही ही विचारणा करणारे पत्र. दळवीही खमकेच. त्यांनी त्या नोटिशीचे तुकडे केले आणि जी. एं. ना परत पाठवले. सोबत पत्र की 'तुमच्या नोटिशीचे तुकडे पाठवत आहे, त्याच्या सुरळ्या करा आणि  ***  घाला. तुमच्या, आणि उरल्या तर माझ्या. ' यावर जी. एं. नि संपूर्ण शरणागती पत्करली आणि दळवींना उत्तर लिहिले, ' दळवीसाहेब, एक जरा स्पष्ट सांगा - आपल्या असल्या पत्रात त्या लाडिक लाजऱ्या फुल्यांचा संकोच आहे, तो कशासाठी? एखाद्या पूर्ण नग्न बाईने मोठ्या विनयाने खांद्यावर पदर म्हणून फडक्याचा तुकडा टाकावा त्याप्रमाणे त्या तीन फुल्या वाटल्या. तुम्हाला संकोच वाटला, म्हणजे गोमटेश्वर आपल्या नागडेपणाने संकोचल्यासारखाच आहे! यापुढे, गडे, असा बुरसट संकोच नको बरं! ' 

जी. एं. च्या पत्रातील भाषेविषयीही दळवी असेच लिहितात. जी. एं. च्या कथांमधील भाषा अत्यंत बोजड आणि उपमा - उत्प्रेक्षांनी (वाजवीपेक्षा जरा जास्तच) सजलेली असते हा त्यांच्यावरचा सार्वजनिक आरोप आहे. जी. एं. च्या खाजगी पत्रांमधील भाषाही अशीच अघळपघळ आणि खऱ्याखोट्या अलंकारांनी भरलेली असते असे दळवींना वाटते. त्यांच्या कथांमधील आणि पत्रांमधील उष्ण, लाल रक्त, उसवलेली जखम, मांसाचे लचके, ताज्या, लसलशीत जखमेतून दिसणारे हाड, रक्तामासांचा वास या आणि अशा शब्दांचे प्रयोजन काय हा प्रश्न दळवींना पडलेला दिसतो. हा प्रश्न जी. एं. च्या वाचकाला, अगदी जी. एं. ना ज्यांचा तिटकारा होता त्या भक्तांनाही पडणे शक्य आहे. खुद्द दळवींच्या 'चक्र' या कादंबरीविषयी लिहिताना त्या कादंबरीचा विषय म्हणजे आयुष्याचा एक भीषण भाग, ठसठसणारी वेदना किंवा वाहती जखम असे नाटकी शब्द जी. ए. वापरतात. का?

सामान्यतः आपण वाचकाला केंद्रस्थानी ठेवून लिहीत नाही, वाचकाला आपली कथा आवडते आहे की नाही याच्याशी आपला सुतराम संबंध नाही, किंबहुना एखादी कथा लिहून झाल्यानंतर ती आपण वाचतही नाही, आपल्याजवळ आपल्या कथासंग्रहाच्या प्रतीही नसतात असे जी. एं. नि पत्रांत लिहिले आहे. सामान्यतः आपण लिहिलेल्या लेखनाविषयी इतके कोरडे, अलिप्त राहणे कुणालाही शक्य नाही; मग अगदी ते जी. ए. का असेनात! आपल्याला आपल्या कथांच्या समीक्षेत काहीही रस नाही असे म्हणणाऱ्या जी. एं. ना त्यांच्या रूपक / दृष्टांत कथा लोकांना आवडल्या नाहीत ही गोष्ट जिव्हारी लागलेली दिसते. तरीही कुणी दुपारची झोप यावी म्हणून डोळ्यासमोर चार ओळी धराव्यात तशी आपली कथा वाचावी हे त्यांना मंजूर नव्हते. बरोबरच आहे. लेखक  इतके कष्ट घेऊन लिहितो, ते निदान नीट वाचण्याचे कष्ट वाचकाने घ्यावेत, नाहीतर वाचूच नये, किमान इतका आत्मसन्मान प्रत्येक लेखकाने बाळगावा. जी. एं. सारख्या श्रेष्ठ लेखकाने तर जरुर बाळगावा. पण असे व्हावे म्हणून आपली पुस्तके सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत हे बघणे, त्यांच्या दुसऱ्या आवृत्त्याही न काढू देणे हे चमत्कारिक आहे. ते जी. ए. च करू जाणोत.

आपण जे लिहितो, ते वाचकाला समजते / आवडते की नाही याबाबत आपण बेफिकीर आहोत म्हणणाऱ्या जी. एं ना आपल्या कथांमधील सूचकता वाचकाच्या डोक्यावरून जाते याचे काहीसे असमाधानही असावे असे वाटते. त्यामुळे कुणीही गणा गणपाने आपली कथा वाचावी आणि त्यावर आपापल्या मताची एक पिंक टाकून पुढे जावे यापेक्षा चारच पण जाणकार लोकांनी ती वाचावी असा त्यांचा प्रयत्न दिसतो. पण जी. एंना आपल्या लेखनात नेमके काय म्हणायचे होते हे तरी किती लोकांना कळाले आहे?