धुक्यातून उलगडणारे जी ए - ६ - जी. एं. च्या कथांचा अर्थ - (अ)

जी. एं. च्या कथांची एकंदरीत वाटचाल पाहिली तर सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कथांवर असलेला पाश्चिमात्य लेखकांचा ( चेकॉव्ह वगैरे) प्रभाव स्पष्ट दिसतो. गूढकथा, भयकथा अशा कथाप्रकारांबद्दलही जी. एं. ना आकर्षण होते. या सगळ्याशी अगदी विसंगत अशा खांडेकरी आदर्शवादी बोधकथांचाही त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कथांवर प्रभाव दिसतो. अर्थात यात विस्मय वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक लेखकाला आपली वाट सापडण्याआधी अशी आंधळी धडपड करावी लागतेच. नंतर बाकी जी. एं. ना आपल्या या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथा अजिबात आवडत नसत. 'सोनपावले' या जी. एं. च्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या गोळाबेरीज कथासंग्रहात अशा बऱ्याच बाळबोध कथा आहेत, हे मी आधी लिहिले आहेच. यातील काही कथा सुखांतिक स्वरुपाच्याही आहेत, आणि काही तर विनोदीही. आपले वळण गाठल्यानंतर बाकी जी. एं. नि असले काही लिहिल्याचे दिसत नाही. अपवाद म्हणजे जी. एं. ची (बहुदा एकमेव अशी सुखांतिका) 'कवठे' ही कथा आणि अर्थातच 'माणसे अरभाट आणि चिल्लर' हे पुस्तक. यातील 'माणसे.. ' मध्ये खास जी. एं. चा विखारी विनोद असला तरी या पुस्तकाचा शेवट विलक्षण गंभीर आणि चटका लावणारा आहे. जणू जी. एं. नि स्वतःसाठी लिहिलेला 'एपिटाफ'च. आणि 'कवठे' ही कथा म्हणजे तर जी. एं. च्या हातून लिहिला गेलेला 'नंदा प्रधान' सारखा अजब प्रकार आहे. पण हे सगळे अगदी अपवादाने.

एरवी बाकी जी. एं. च्या कथा सरधोपट असत नाहीत. त्यांची 'माणसाचे काय, माकडाचे काय' अशा नावाची एक कथा आहे. सकृतदर्शनी ती कथेतल्या सुब्राव या व्यक्तीच्या एकाकीपणाची कथा वाटते. मंदाकिनी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात जी. एं. नि या कथेमागचा त्यांचा विचार स्पष्ट केला आहे. (जी. एं. नि हे असे अगदी क्वचितच केले आहे) हा विचारही कळायला अवघडच आहे. ते म्हणतात, ' किड्याच्या डोळ्यापासून आभाळातील अतिभव्य तारकापुंजापर्यंतच्या पटात माणसाचे स्थान किती याविषयी ती कथा आहे. एकाकीपणा ही भावना शेवटी खरे तर राहू नये, कारण सगळीच लहान - मोठी शून्ये समजल्यावर उलट इतरांशी असलेल्या नात्याचीच जाणीव होईल. पण लहान मोठ्या शून्याशी आपणही शून्य असल्याने होणाऱ्या जवळिकीमुळे शून्याला काहीच अर्थ नाही, ही अर्थहीनतेची भावना त्या कथेत दिसावी. '

हे असेच काहीसे त्यांच्या 'प्रदक्षिणा' या गाजलेल्या कथेबाबतही झाले आहे. या कथेचे रसिकांनी स्वागत केले ते सामाजिक जीवनातील एका व्यक्तीचे - दादासाहेबांचे -खरे श्वापदासारखे जिवंत चित्रण म्हणून. त्यातही नियतीचे वेडेवाकडे पिळे आणि त्यामुळे शांताक्कांच्या वाट्याला शेवटी आलेलेले रिकामे, भंगलेले नशीब - हे सगळेही रसिकांच्या पसंतीला उतरले. पण जी. एं. ना खरोखर हे असे आणि एवढेच म्हणायचे होते काय? त्यांनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या पत्रात लोकांना या कथेमागचे सूत्र कळालेच नाही, याविषयी असमाधान व्यक्त केले आहे. या कथेत शांताकांप्रमाणेच ससेहोलपट झालेल्या आबाजींचे एक पात्र आहे. "पण माझं ऐकणार कोण? " हे पालुपद आबाजींच्या तोंडी असते. आबाजी घरातून कायमचे निघून गेल्यावर त्यांची नक्कल करणाऱ्या नोकराच्या तोंडचे ते शब्द दादासाहेबांच्या अर्धपुतळ्यावरून येतात, अशी एक अस्पष्ट सूचना जी. एं नि ठेवली आहे. दादासाहेबांच्या या सगळ्या स्वार्थी, आपमतलबी, ढोंगी चित्रात त्यांची स्वतःची काहीतरी बाजू असेल, पण ती ऐकणार कोण असे आपल्याला सुचवायचे आहे, पण ते काही वाचकांच्या ध्यानात आले नाही, आणि ही कथा म्हणजे केवळ एक 'सटायर' होऊन बसली आहे, म्हणूनच ती आपली एक अयशस्वी कथा आहे, असे जी. एं. ना वाटत असे.

त्यांच्या या कथेवर कुणीतरी एक एकांकिका लिहिली आणि तिच्यात तर शेवटी शांताक्का दादासाहेबांचा पुतळा फोडतात असला बटबटीत शेवट दाखवला तेंव्हा जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले होते. असेच काहीसे त्यांच्या 'कैरी' या कथेबाबत अमोल पालेकरांनी काढलेल्या चित्रपटाबाबत झाले आहे, झाले आहे असे विजय पाडळकर जी. एं. च्या पत्रसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. 'मन लावून एखादी नाजूक सुंदर रांगोळी काढावी आणि उठून जाता जाता आपणच तिच्यावर पाय द्यावा असे काहीसे पालेकरांनी या चित्रपटात केले आहे. ' असे ते म्हणतात. मी 'कैरी' पाहिलेला नाही, पण अगदी पालेकरांसारखा तालेवार दिग्दर्शक असला तरी त्याला कैरीसारखी जातीवंत, डोक्यावर पदर घेतलेली कथा चित्रपट या माध्यमातून पुढे आणणे अवघड आहे, असे मला वाटते. पूर्वी जी. एं. च्या 'पराभव' आणि 'चैत्र' या कथांचे दूरदर्शनने केलेले नाट्य/ चित्र रुपांतर मी पाहिले होते, आणि ते त्यावेळी अगदी बघवले नव्हते.

आता इथे एक दुष्ट, वाकडी शंका मनात येते. 'जे जे लोकप्रिय, ते ते हिणकस' हे जी. एं. चे मत प्रसिद्धच आहे. त्याच न्यायाने अगदी आपली कथा का असेना, ती लोकप्रिय झाली, लोकांना तिचा एक अर्थ लागला, की ते तसे आपल्याला म्हणायचेच नव्हते असे म्हणावे असे जी. एं. ना वाटले असेल का? (जी. एं. चाच 'वडारकांगावा' हा शब्द येथे आठवतो) त्यांच्या 'पुनरपी' या कथेत मांजरीने पिलांना जन्म देणे आणि त्याचवेळी दादासाहेबांचा झालेला मृत्यू एवढी सांकेतिकता वाचकांना समजली, पण यापुढे दारात उभी असलेली एक नवी मांजरी, तिच्या पोटाचा भरदार, गोलसर आकार आणि त्यातून माईंना स्वतःच्या मृत्यूची लागलेली चाहूल, हे बाकी जी. एं. नि स्वतः (कदाचित हतबल, हताश होऊन) सांगेपर्यंत वाचकांना कळाले नाही. या अर्थाने आपल्या कथा अयशस्वी आहेत, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. तरीही जे जनतेला कळाले, आवडले नाही ते श्रेष्ठ, या त्यांच्या मतानुसार या अपयशी कथा यशस्वीच आहेत, असे जी. एं. ना जाताजाता सुचवायचे होते काय? जी. ए. हे कमालीचे बुद्धीवान होते. त्यामुळे एकाच कथेचे दोन-तीन अर्थ तयार ठेवून लोकांना जो अर्थ लागेल, ते आपल्याला म्हणायचेच नव्हते असेही त्यांनी जाणीवपूर्वक केले असावे काय? जी. एं. च्या कथा आवडणाऱ्यांनाही ('भक्त' वगैरे शाळकरी शब्द बाजूला ठेवून) अस्वस्थ करायला लावणारा हा विचार आहे.