धुक्यातून उलगडणारे जी ए -४

' हे परमेश्वरा, आता माझे आयुष्य संपणार व मी तुझ्यापुढे येऊन उभा राहणार. मी फार पापी आहे, म्हणून त्या क्षणी तू मला क्षमा कर. पण तूच मला असे निर्माण करून ठेवलेस, याबद्दल त्या क्षणी मीदेखील तुला क्षमा करीन.'
-उमर खय्याम

जी.एं. चे मराठी वाचन

जी. एं. चे बरेचसे आयुष्य कर्नाटकात गेले. ते कानडी उत्तम बोलत असत. त्यांचा अभ्यासाचा आणि अध्यापनाचा विषय इंग्रजी. आणि त्यांचे लिखाण आहे ते सगळे मराठीमध्ये. मराठी भाषेबद्दल - किंवा एकंदरीतच भाषांबद्दल - त्यांना आदर वाटत असे. भाषा ही कोणत्याही लेखकापेक्षा मोठी आहे, असते असे त्यांना वाटे.एखाद्या  लेखकाने अमुक एका भाषेला काही दिले असे म्हणणे म्हणजे आपल्यासारखा मुलगा झाला म्हणून आपल्या आईचे अभिनंदन करण्यासारखे आहे, असे ते म्हणतात. मराठीच्या भवितव्याविषयी कपाळावर काही वैचारिक आठ्या चढवण्याची सध्या फॅशन आहे पण पंचवीस - सव्वीस वर्षांपूर्वी 'समजा, जर काही जण मराठीच्या विरुद्ध पचंग बांधून तयार झाले आहेत, आणि तेवढ्याने कापरे भरण्याइअतकी जर मराठी दुबळी असेल तर तिने सरळ उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी जावे हे बरे' हे जी. एंनी लिहिलेले वाक्य बरेच काही सांगून जाते.

कुलकर्णी हे आडनाव आणि इतरांना कस्पटक्षुद्र लेखण्याची वृत्ती यात काही गणित आहे का ते एकदा पाहिले पाहिजे. जी.एं चे मराठी वाचनही भरपूर असले तरी फारच कमी मराठी लेखक - कवींच्या रचना त्यांना आवडत असत. बालकवी, खानोलकर, ग्रेस ही काही चटकन आठवणारी नावे. माडखोलकरांविषयीही त्यांनी बरे लिहिले आहे. माडखोलकरांच्या लिखाणात 'प्रमाथी' , 'उर्जस्वल' असे शब्द येत असले तरी त्यांच्या लिखाणाला स्वतःची एक ऐट, एक श्रीमंती आहे असे त्यांना वाटते.  जुन्या पिढीतले लेखक विनायक लक्ष्मण बर्वे उर्फ 'कवी आनंद' यांनी केलेल्या ग्रेच्या विलापिकांचा अनुवाद आणि त्यांची 'मुचकुंददरी' ही कादंबरी आपल्याला आवडल्याचे ते लिहितात. अनिलांच्या कविता आणि कुसुमावती देशपांड्यांचे लिखाण हे जी. एंच्या आवडीचे. पण त्यांच्या प्रेमपत्रांच्या संग्रहावर ('कुसुमानिल') बाकी ते तुटून पडलेले दिसतात. खरेच आहे म्हणा! अगदी साहित्यीकांची झाली म्हणून काय झाले, प्रेमपत्रे ही काय प्रसिद्ध करण्याची गोष्ट आहे?

माधव आचवल ही जी.एंचे दूरपर्यंतचे मित्र. त्यांच्या 'किमया' या पुस्तकाविषयी लिहिताना जी.एंना शब्द पुरत नाहीत. ''आचवलांचे लेखन स्वयंप्रकाशी आहे. स्वतःचा निळसर लाल प्रकाश घेऊन ते ताजे असते' असे ते म्हणतात.किमया' कडे वाचक - टीकाकारांनी दुर्लक्षच केले, ही जाणीवही त्यांना टोचून जाते. ' समुद्रातून एखादी जलपरी सुळकी मारून वर येऊन निघून जावी, आणि कडेच्या कट्ट्यावर बसून बकाबका भेळ खाणाऱ्यांचे तिकडे लक्षही नसावे' असे काहीसे त्यांनी या पुस्तकाबाबत लिहिले आहे. (जी.एंचे वैयक्तिक आयुष्य विरोधाभासांनी आणि पूर्वगृहांनी भरलेले असले तरी आचवलांना खूष करण्यासाठी जी.एं असले काही लिहितील, असे वाटत नाही. अनंतराव कुलकर्णी हेही जी.एंचे जवळचे मित्रच. पण त्यांचे पुस्तक (जेनी) जी.एंना मुळीच आवडले नाही. तसे त्यांनी अनंतरावांना स्पष्टपणे लिहिले आहेच.)

पण अशी उदाहरणे फार कमी. याउलट शरच्चंद्र चॅटर्जी, टागोर या लोकप्रिय लेखकांविषयी जी.एं. चे मत फारसे बरे नव्हते. पतीसाठी भयंकर त्याग वगैरे करणाऱ्या शरदबाबूंच्या नायिकांची जी.एं नी भरपूर टवाळी केली आहे. टागोरांची विश्वमानव ही कल्पना तर त्यांना कधीच पटली नव्हती. 'माणूस नावाचा बेटा' या आपल्या कथेत त्यांनी या कल्पनेची खिल्ली उडवली आहे. 'कवितेत टागोरांचे काळजीपूर्वक विंचरलेले केस कधी विस्कटत नाहीत' या शब्दांत त्यांनी टागोरांना निकालात काढले आहे. उर्दू शायरीही त्यांना फारशी रुचत नसे. 'वन ऑफ माय ग्रेटेस्ट प्लेझर्स इन लाईफ वुड बी टु कॅच होल्ड ऑफ टेन फ्लॅबी उर्दू पोएटस ऍंड किक दी हेल आउट ऑफ देअर माशाल्ला- सुभानल्ला' असे ते लिहितात. कळस म्हणजे ज्या पु. ल. ,सुनीताबाई देशपांड्यांशी त्यांचे त्यातल्या त्यात बरे होते, त्या पु. लं. चा विनोदही जी.एंना फारसा आवडत नसे. 'व्यक्ती आणि वल्ली' मधले एक व्यक्तिचित्र (नंदा प्रधान?) आपल्याला आवडल्याचे त्यांनी लिहिले आहे. इतरत्र बाकी पु. लं च्या लिखाणाविषयीची त्यांची भूमिका म्हणजे ' पाच -दहा मिनिटांच्या सूचनेने गदगदून जाणारा लेखक', 'विनोद करताना आपण विनोद केलाच पाहिजे असा त्यांचा इतका जॉनीवॉकरध्यास असतो, की एखादी 'जागा' आपण चुकलो नाही ना, असा त्यांना अधीरपणा असतो. एखादा पहिलवान जसा दिसेल त्याला धोबीपछाड टाकायच्या विचारात असावा, तसे विनोदी लेखक दिसेल त्या सिच्युएशनमधून विनोद उकळण्याच्या नादात असतात' अशी आहे. (जी. एंचे हे म्हणणे  दुटप्पीपणाचे तर आहेच, पण फारसे पटणारेही नाही. फारसे एवढ्यासाठी की पु. लंनीही आपला विनोद काही वेळा सस्त्या लोकप्रियतेसाठी वापरल्यासारखे वाटते. विशेषतः त्यांनी स्वतःच्या लिखाणाच्या काढलेल्या ध्वनीमुद्रिकांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. या क्षणी आठवणारी दोन उदाहरणे अशी - 'असा मी असामी' मधील धोंडो भिकाजीच्या कपड्यांच्या खरेदीबाबत 'आपल्या नवऱ्याला मळकट रंगाचे कपडे घेतले तरच आपलं सौभाग्य अबाधित राहील अशी आमच्या हिची समजूत असावी' असे ते मूळ लिखाणात म्हणतात. ध्वनीमुद्रिकेत बाकी ते 'आमचं सगळं मळखाऊ डिपार्मेंट ना.. ' असे म्हणतात. 'राणीसाहेबांच्या चंद्रशेखर या कुत्र्याचे शेपटीवरील फोड गुरुदेव आपल्या अंगावर कुठे घेणार या चिंतेने मी प्रदक्षिणेच्या निमित्ताने गुरुदेवांच्या मागच्या अंगाला असलं काही एक्सटेन्शन आहे का हे बघून घेतलं'  असा ध्वनीमुद्रिकेत उल्लेख आहे. आता यातला एक्सटेन्शन हा शब्द मूळ लिखाणात नाही. हे बदल करावे असे पु. लंना का वाटले असावे? ही काही श्राव्य माध्यमाची गरज नाही. मला तर हे पब्लीकला खूष करण्यासाठी केलेले वाटते. ज्या काळात हे ध्वनीमुद्रण झाले त्या काळात पु. लं. मराठी साहित्यविश्वाच्या सम्राटपदी होते. तरीही ही आळवणी करणे पु. लंना गरजेचे का वाटले असावे? असो.) भास्करबुवा बखले यांचे गायन पु. लंनी प्रत्यक्षात कधी ऐकले नाही. त्यांच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकाही उपलब्ध नाहीत - पण पु. लंनि त्यांच्या गायकीवर मोठा लेख लिहिला, या उबवलेपणाचीही जी.एंनी टिंगल केली आहे. पु. लं. च्या लिखाणाविषयी सुनीताबाई देशपांड्यांना लिहिलेल्या पत्रांत बाकी जी.एंनी सतत प्रशंसेचा सूर लावला आहे. केशवराव दाते आणि भास्करबुवांची व्यक्तिचित्रे आपल्याला 'सपाट' वाटली असे त्यांनी सुनीताबाईंना लिहिले आहे खरे, पण इतरांना पु. लंविषयी लिहिताना असलेली धार त्यांनी इथे जाणीवपूर्वक बोथट केल्याचे जाणवते. हा दुटप्पीपणा जी.एंच्या इतर बऱ्याच बाबतींतही दिसून येतो, पण त्याविषयी नंतर कधीतरी.

पण एक माणूस म्हणून पु. लं विषयी जी.एंना आदर असावा असेच वाटते. पु. लंनी सामाजिक कार्याला केलेल्या मदतीविषयी आणि त्यातही स्वतः अनामिक रहण्याच्या निर्णयाविषयी जी.एं अत्यंत भारावून गेलेले दिसतात. विकास आमटेंना लिहिलेल्या पत्रात ते पु. लं. विषयी ' मला वाटते हा माणूस निघून गेल्यावर बसलेल्या जागी थोडा सूर्यप्रकाश सांडलेला आढळत असेल -आणि त्या प्रकाशाला मंद सुगंध असतो तो सौ. सुनीता देशपांडे यांच्या साहचर्याचा' ' असे लिहितात. पु. लं. च्या गप्पांची मैफल जमवण्याच्या हातोटीविषयीही जी.एंनी असेच कौतुकाने (आणि थोड्या असूयेनेही?) लिहिले आहे. इचलकरंजीच्या फाय फाउंडेशनच्या समारंभात - जी. एंनी हजेरी लावलेल्या अत्यंत मोजक्या समारंभांपैकी एक - 'पु. लं माझ्याविषयी फार मोठ्या मनाने बोलले - जुन्या काळच्या एखाद्या तालेवार स्त्रीने मोठ्या मोठ्या पशांनी ओटी भरावी त्याप्रमाणे.' असे जी. एं लिहितात तेंव्हा फक्त या शब्दांची आणि त्यामागच्या भावनांची गर्भश्रीमंती लक्षात राहते. तो दुटप्पीपणा, ती विसंगती गेली खड्ड्यात!  

जी. एंचा मराठी कवितांचा जबरदस्त अभ्यास होता. पाडगावकर आणि बोरकर हे जी.एंच्या आवडत्या कवींमधले. पण पु. शि. रेग्यांच्या कविता या आपल्या आयुष्यातला एक 'ब्लाईंड स्पॉट' राहिला आहे, असे ते म्हणतात. मर्ढेकरांच्या कवितांविषयीही जी.ए. 'इनडिफ्रंट' होते, असेच वाटते. सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे विविध संतांनी केलेल्या रचनांविषयीही जी.एंना फारशी आपुलकी वाटत नसे. याला कारण म्हणजे जी.एंचा पराकोटीचा नास्तिकवाद असावा. मर्ढेकरही नास्तिक असले, तरी ते श्रद्धाळू होते. जी.एं. कडे बाकी असल्या कसल्याही श्रद्धा सापडत नाहीत.  तरी मर्ढेकरांच्या काही कवितांचा ते आपल्या लिखाणात उल्लेख करतात.  (त्या कविताही अशा चमत्कारिकच आहेत - उदाहरणार्थ ' दाखवितील ते भोक रिकामे, जिथे असावे मांसल लिंग' या ओळींचा उल्लेख करावा - किमान दोनदा- असे जी.एंना का वाटले असावे? त्यातही जी.एं या ओळींचे स्वतःचे म्हणून जे रुप सादर करतात 'जेथ असावे मांसल लिंग, त्या ठिकाणी निव्वळ भोकच नव्हे तर वळवळणारे किडे..' जिथे असावे मांसल लिंग, तिथे दिसावा निव्वळ बुरसा..' हे सगळे काय आहे?) ग्रेसच्या कवितांना बाकी ते 'विशाल उग्र आयुष्याने मध्येच डोळा उघडून आपल्याकडे रोखून पाहावे असा अनुभव देणारी तुमची कविता' असे ते म्हणतात. खानोलकर हेही जी. एंचे आवडते लेखक - कवी. 'खानोलकरांना लाभलेला तेजस्पर्श असलेला मराठीत आज दुसरा लेखक नाही' असे त्यांचे मत होते. कवी मनमोहन यांच्याविषयी त्यांनी ' ताऱ्या - ग्रहांची बटणे लावणारा हा माणूस असल्यामुळे जो भाग बटणे लावून झाकावा, तोच उघडा पडला' असे जी.ए. लिहितात. मराठी समकालीन कथाकारांच्या थोड्या कथा मनापासून आवडल्याचे जी. एंनी  लिहिले आहे. गाडगीळांची 'तलावातले चांदणे', गोखल्यांची 'यात्रा', थोरल्या माडगूळकरांची 'वीज', दळवींची रुक्मिणी, खानोलकरांची 'सनई' आणि शंकर पाटलांची 'दसरा' या कथा आपल्याला आवडल्याचे जी. ए. लिहितात- बऱ्याच वेळा या कथा आपण न लिहिल्याबद्दलची खंतही त्यांच्या लिखाणात येते. या कथांवर एक नजर टाकली की स्वतःच्या आवडीनिवडींविषयीचे जी.एं नी वारंवार (आणि कदाचित जाणीवपूर्वक) अधोरेखित केलेले 'गावाचे एक आणि गावंढ्याचे (गावड्याचे?) एक' हे मत ध्यानात येते. ( माडगूळकरांची 'वीज' घ्या - ही खरेतर जी. एं धाटणीचीच कथा. कुरुप, अपंग मुलात जागृत होणाऱ्या लैंगिक भावना आणि त्याची घुसमट या विषयावरची की कथा. ) जी. एं. ची स्वतःची अशी विकसित झालेली शैली - आणि त्यांच्या टीकाकारांच्या मते त्यांची मर्यादाही - अशीच कुठून कुठून जमा होत गेली असली पाहिजे. मराठीतल्या काही अतिशय अपरिचित,  अनोळखी लेखक -लेखिकांचा जी.ए. मुद्दाम उल्लेख करतात. अच्युत पारसनीस,  कृष्णा जे. कुलकर्णी,  मीना दीक्षित हे त्यातले काही लेखक. वामन चोरघडे यांच्या जिवंत अनुभवाने जी.ए. प्रभावित झालेले दिसतात,  पण त्यांच्या कथांमध्ये बाकी या अनुभवांच्या वर्णनाचा खोटा,  चोरटा सूर - जसा सुधीर फडक्यांच्या काही गाण्यांत लागला आहे तसा -  लागला आहे,  असे त्यांना वाटते. मामा वरेरकरांचे 'अवघा महाराष्ट्र आपल्याला अनुल्लेखाने मारतो आहे' हे मत हाही जी. एं. च्या टवाळीचा आवडता विषय. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या खांडेकर हे जी.एंचे एके काळचे आवडते लेखक - दैवतच - होते. याच खांडेकरांची जी.एंनी ' हरीभाऊनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला' अशी थट्टाही केली आहे. नंतरनंतर बाकी खांडेकर हे लेखक म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून आपल्याला श्रेष्ठ वाटत होते असे त्यांनी म्हटले आहे, ही बाकी थोडी सारवासारव वाटते.  श्री.म. माटे यांच्या काही कथांविषयीही जी.एं भरभरून लिहितात. पण इथेही त्यांचा खवचटपणा आहेच. 'सावित्री मुक्यानेच मेली' हे कथेचे नाव आहे की एखाद्या टूथपेस्टची जाहिरात?' हा खास जी.ए. शैलीचा प्रश्न.  इतर बाजारू लेखकांना - विशेषतः स्त्री लेखकांना- त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी फक्त तळायचे शिल्लक ठेवले आहे. त्यांच्या खोट्या, उबवलेल्या शब्दांना, उपमांना जी. एंनी काटेफांजराने झोडपले आहे. नयना आचार्य यांच्या 'प्रतिभेचा स्पर्श, सूक्ष्म निरीक्षण, तरल संवेदना' अशा शब्दांवर टीका करताना ' या बाईंना, काही लोकांना सतत शिंका येतात तसे प्रतिभेचे झंकार येतात. ' असे जी. ए. लिहितात. विशेष म्हणजे जी. एंच्या स्वतःच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लिखाणातही - इतक्या तकलादू नसल्या तरी - उपमा -उत्प्रेक्षा खच्चून भरलेल्या असतात. या विरोधाभासाचे नवल वाटते.  धनी वेलणकरांच्या पुस्तकात आलेल्या असंख्य विसंगतीपूर्ण उल्लेखांचा ( दर शनिवारी मुंग्यांना साखर घालणे पण साखर संपली की मुंग्या चिरडून टाकणे -कारण मुंग्या उपद्रवी असतात! ) ते असाच टोपीउडवू उल्लेख करतात. पण अशा विक्षिप्त वृत्तीच्या लोकांविषयी आपल्याला एक सुप्त कुतूहल आहे, असे त्यांनी कबूल केले आहे. (उदाहरणार्थ, स्त्री ही आपल्या विकासातील मोठी धोंड आहे असे मानून आपल्या बायकोचा जाहीर पाणउतारा करणारा आणि नंतर अतिव वैफल्याने तिच्याशीच रत होणारा टॉलस्टॉय - त्याला म्हणे चौदा की सोळा मुले झाली! )  विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते 'सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही' असे म्हणतात. गो. नि. दांडेकरांची बरीच पुस्तके जी.एंनी वाचली होती आणि त्यांतल्या भाबडेपणावर त्यांनी सणसणीत टीकाही केली आहे. जयवंत दळवींचे लिखाण - आणि 'ठणठणपाळ' - जी.एंना आवडत असे. दळवींचे आणि जी. एंचे अनेक वर्षाचे मैत्रीचे संबंध होते, पण - आणि हा 'पण' हा जी. एंच्या आयुष्याचाच एक भाग झाला होता - पण यालाही एक विचित्र विरोधाभासाचा वास आहे. एकंदरीतच जी. एंचे साहित्यिक आयुष्य - आणि खाजगी आयुष्य तर जास्तच - विरोधाभास, विसंगती, पूर्वग्रह यांनी भरलेले एक गाठोडे होते.