धुक्यातून उलगडणारे जी ए -१

थोडेसे प्रास्ताविक:
११ डिसेंबर हा जी.ए. कुलकर्णींचा विसावा स्मृतिदिन. अशा प्रकारच्या लेखाची सुरुवात साधारणतः 'मराठी कथाविश्वावर आपल्या लिखाणाचे लालजर्द स्वस्तिकचिन्ह उमटवून अचानक अंधारात विरून गेलेल्या ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीला अनेकानेक वंदन करून..' वगैरे अशा घसाभरू वाक्याने करण्याचा शिरस्ता आहे. या सगळ्या प्रकाराचा जी. एं. ना विलक्षण तिटकारा होता. लेखक हा फक्त त्याच्या लिखाणातून बघावा, त्यापलीकडे तो एक सर्वसाधारण माणूस असतो, त्यामुळे 'Writing, Not the writer' हे वाक्य जी. एं. च्या वैयक्तिक आणि खाजगी लिखाणात अनेक वेळा येते. पण इतके वस्तुनिष्ठ राहणे विशेषतः मराठी माणसाला परवडत नाही. जरा कुणी कुठे काहीसे बरे केले की कधी एकदा आपण त्याला देव करून टाकतो, असे त्याला होऊन जाते. पण ते असो. तर या निमित्ताने जी. एं चे काही तसे अनोळखी लिखाण आणि त्यांनी केलेला उदंड पत्रव्यवहार यातून या कोड्यासारख्या माणसाची लेखक म्हणून काहीशी नवी ओळख करून घेता येते हे पाहावे हा या प्रस्तावित लेखमालिकेचा उद्देश आहे.
हे करत असताना मनात पहिली भावना आहे ती अपराधीपणाची. आपल्या लिखाणाची आणि त्यातूनही आयुष्यभर जपलेल्या आपल्या खाजगी आयुष्याची अशी चिरफाड - चिरफाडच, त्याला रसग्रहण वगैरे म्हणणे योग्य नाही - जी. एं. ना अजिबात रुचले नसते. इंग्रजी लेखकांच्या मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार प्रकाशित करण्याची पद्धत आहे. इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास - व्यासंगच- असणाऱ्या जी.एं. ना हे माहीत नसणे शक्यच नाही. तरीही त्यांनी आपण लिहिलेल्या बऱ्याच पत्रांत 'हे अगदी घरगुती आणि खाजगी आहे, चुकूनही यातला एकही शब्द बाहेर जाऊ देऊ नका' असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या काही पत्रांतले काही उल्लेख अस्वस्थ करणारे, क्वचित त्यांच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला छेद देणारेही आहेत. मग हे सगळे कशाला करायचे? आधीच असंख्य पूर्वग्रह आणि गैरसमजांच्या जाळ्यात गुरफटलेल्या या दिवंगत साहित्यिकाचे असे विच्छेदन कशासाठी?

एकतर या सगळ्या चिल्लर- खुर्दा गोष्टींपलीकडे जाऊन एक लेखक आणि एक विचार करणारा अभ्यासू माणूस म्हणून जी.एं. नी कायकाय मिळवले होते - आणि त्याचे प्रदर्शन न मांडता ते स्वतःबरोबरच संपवून टाकले होते - हे समजून घेणे त्यांच्या लिखाणाचा एक चाहता म्हणून मला अतिशय रंजक वाटते. दुसरे असे की 'चमत्कारिक, विक्षिप्त, माणूसघाणा' म्हणून बदनाम झालेला हा माणूस खरा कसा होता - किंवा तो जसा बदनाम झाला तसा असला तरी तसा तो का होता याचा काहीसा उलगडा आता होतो आहे असे वाटते. अलौकिक प्रतिभावान आणि वेडसरपणा यातली सीमा अगदी धुरकट असते असे म्हणतात. [float=font:ashlesha;color:000000;place:top;]आसपासच्या बुटक्या, खुज्या लोकांमध्ये वावरताना जी.एं. ना किती गुदमरल्यासारखे होत असेल याची कल्पना - फक्त कल्पनाच - करता येते.[/float] 'बाजीचा-ए-अतफाल' म्हणणाऱ्या गालिबसारखीच जी.एं. ची मानसिकता कशी आणि का झाली हे कळू लागते. शेवटी खांडेकरी बोधकथा ते 'माणसे- अरभाट आणि चिल्लर' पर्यंतचा जी.एं.चा लेखनप्रवास, एक जबरदस्त वाचक म्हणून त्यांच्यावर जगातील विविध भाषांतील लेखकांचा प्रभाव आणि यात आपले लिखाण कुठेतरी अगदी पायपुसण्यासारखे आहे अशी एक निराशेची, अतृप्ततेची त्यांची भावना अशी त्यांच्या प्रतिभेची विलक्षण गरुडझेप ध्यानात येते.

हा सगळा अभ्यासाचा - वैयक्तिक आवडीचा - कदाचित थोडासा कंटाळवाणा भाग झाला. याबरोबर जी.एं. चे नवीन लिखाण वाचताना परत त्यांची ती देदीप्यमान भाषाशैली, त्यांचा तिरकस पण निर्विष विनोद आणि मराठी (आणि इंग्रजीही) साहित्याच्या तथाकथित केंद्रबिंदूंपासून इतके दूर दडून बसूनही बारीकसारीक गोष्टींची नोंद घेण्याची आणि त्यांची संगती लावण्याची त्यांची क्षमता हे सगळे नव्याने ध्यानात येते.

असामान्य बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता यापुढे विनम्र होणे आता काळाशी सुसंगत आहे की नाही, कुणास ठाऊक! जी.ए. वरील लिखाणाच्या निमित्ताने समाजाच्या एका तुकड्याला हे तपासून पाहता आले, तरी या प्रस्तावित लिखाणाचा हेतू सफल होईल, असे वाटते.