ह्यासोबत
दुःख, हळवेपणा आणि जी ए
'धुक्यातून उलगडणारे जी ए' ही लेखमालिका लिहिताना एक लेखक आणि त्याहीपलीकडचा एक माणूस म्हणून जी. ए. कुलकर्णींचा शोध घ्यावा असे मनात होते. आता या लेखाद्वारे ही मालिका संपवताना त्यातले फारसे काही हाती लागले नाही, अशी असमाधानाचीच भावना मनात जास्त करून आहे. याचे एक कारण असे, की जी. एंचे व्यक्तिमत्व इतके गुंतागुंतीचे आणि बहुरंगी आहे, की आता केवळ त्यांचे लिखाण आणि त्यांच्या आठवणी यांवरून त्याचा धांडोळा घेणे अशक्यप्राय वाटते. ही मालिका लिहावीशी वाटली याचे प्रमुख कारण म्हणजे जी. एं. च्या निवडक पत्रांचे प्रकाशित झालेले चार खंड. या मालिकेच्या निमित्ताने हे खंड अक्षरशः अनेकदा वाचावे लागले / वाचता आले... माझ्या दृष्टीने हेच या मालिकेचे फलित आहे. पण तसे करत असताना हा अनेक मितींचा लेखक आपल्या हाती शतांशानेही लागला नाही ही अतृप्तता प्रकर्षाने जाणवते. 'माणसे अरभाट आणि चिल्लर' मधील मास्तर कुणाला तरी म्हणतात. 'याच्या डोक्याचे टोपण काढून आत काय चालले आहे, हे बघण्याची सोय असती तर.. ' जी. एं. च्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी त्यांची पुस्तके आणि त्यांची पत्रे यांतून हा माणूस आपल्याला कितपत कळाला याचा शोध घेताना, बहुदा काहीच कळाला नाही, असा अस्वस्थ करणारा विचार मनात येतो.
पण ते असो. जी. एं. च्या कथांमधील दुःख आणि जी. एं. चा वैयक्तिक जीवनातील हळवेपणा - संवेदनशीलता म्हणूया फार तर - यावर चार शब्द लिहून ही मालिका संपवावीशी वाटते. जी. एं. च्या बहुतके कथा या शोकांतिका आहेत, त्यात कुठे आशावादाचा किरण दिसत नाही, माणसाची हतबलता आणि नियतीशरणता या एकाच सूत्रावर त्यांच्या सगळ्या कथा बेतलेल्या आहेत- जी. एं. च्या लेखनावरील हा दुसरा मोठा आरोप. पहिला अर्थातच त्यांच्या लिखाणातल्या भाषेवरचा आणि त्या भाषेतील प्रतिमाप्रेमावरचा.
असे काय जगावेगळे दुःख या माणसाच्या वाट्याला आले असावे ज्यामुळे याचे सगळे आयुष्यच यातनेने गच्च गच्च होऊन गेले? याचा शोध घेऊ जाता जी. एं. ना लहान वयातच आलेले पोरकेपण आठवते. त्यांच्या (पत्र) लेखनात त्यांच्या एक सावत्र भावाचा उल्लेख येतो, पण तेही काही घट्ट माहेरनाते नसावे. इंदू, सुशी आणि जाई या तीन सख्ख्या बहिणी अगदी अकाली मरण पावल्याने त्यांच्या आयुष्यातल्या 'बहिणीचे प्रेम' या विषयावर प्रकाश पडल्यासारखा वाटतो.
जी. एंना त्यांच्या प्रकृतीने कधी चांगली साथ दिली नाही. विशेषतः पन्नाशीनंतर त्यांना कित्येक वर्षांपासून छळणारी पोटदुखी अधिकच त्रासदायक होत गेली. शेवटच्या दहा-बारा वर्षांत जी. एंनी म्हणावे असे काहीच लिहिले नाही ( सन्माननीय अपवाद म्हणजे 'माणसे अरभाट आणि चिल्लर) याचे हेही एक कारण असावेसे वाटते . कैक वर्षे असह्य पोटदुखी आणि तिच्यावर वर्षानुवर्षे केलेले विफल उपचार आणि त्यांत खर्च झालेला वेळ, पैसा आणि शेवटी हाती उरलेला फक्त मनस्ताप - यामुळे एखादा माणूस पूर्ण खचून लोळागोळा झाला असता. धारवाडला असताना जी. एंना वारंवार फ्लू आणि खोकला यांनी त्रस्त केले होते. यातून बाहेर पडले की त्यांना विलक्षण अशक्तपणा येत असे. (आपल्याला खोकल्यावर अडुळसा हे औषध सुचवणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी मिष्किलपणाने लिहिले आहे, ' तुमच्या पत्नीचा खोकला अडुळशाने गेला, करण तो साधा खोकला होता, माझा खोकला हा एक इरसाल 'हार्डंड' स्मोकरचा आहे! ). हे इतके कमी की काय, म्हणून त्यांना नंतर मोठा दृष्टीदोष झाला. त्यांच्या डोळ्यांना रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या दुर्बळ झाल्या, आणि जी. एंची दृष्टी अगदी मंद झाली. मला वाटते, या ठिकाणी जी. एंनी आपले बस्तान आवरायला सुरवात केली असावी. 'माझे वाचन संपले, की मी संपलोच' असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. तरीही ते आपल्या अधू डोळ्यांनी पुण्यात - त्यांच्या नावडत्या पुण्यात चांगल्या वाचनीय (इंग्रजी) पुस्तकांच्या शोधात भटकत राहिले. फक्त शेवटचा ल्यूकेमिया हा त्यांनाही अनपेक्षित असावा. पण या अखेरच्या पाहुण्याचे त्यांनी अगदी मनापासून स्वागत केले असले पाहिजे, यात मला तरी तिळभर शंका वाटत नाही.
आपल्या लिखाणाच्या बाबतीतही जी. ए. कायम असमाधानीच राहिले; किमान तसेच त्यांनी इतरांना लिहिले आहे. 'आपल्या कथा म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या व्यक्तींना वाहिलेली तिलांजली (जी. एं च्या भाषेत 'तर्पण') आहे' असे ते म्हणतात, पण आपल्याला जे लिहायचे होते त्यातले काहीच कागदावर आले नाही अशी एक खंत त्यांना वाटत राहिली. कदाचित उत्तमोत्तम जागतिक साहित्य वाचल्यानंतर अशी खंत प्रत्येक विचारी लेखकालाच वाटत असावी. त्यातून आपल्याला आपल्या कथांमध्ये म्हणायचे काय होते, आणि वाचकांनी, समीक्षकांनी त्यांचा अर्थ काय लावला यातली तफावत त्यांना अस्वस्थ करून जात असावी. शेवटी 'Is it worth it?' हा त्यांना पडलेला प्रश्न हेच सांगून जातो. 'प्रदक्षिणा' या त्यांच्या कथेबाबत मी पूर्वी लिहिले होतेच. तेच त्यांच्या 'पुनरपि' या कथेबाबत झाले. या कथेच्या शीर्षकातच असा ठळक संकेत ('पुनरपी जननं पुनरपी मरणं') ठेवूनही या कथेचे आकलन फारच मोजक्या लोकांना झाले, हे त्यांना या कथेचे, पर्यायाने आपल्या लिखाणाचे अपयश वाटत होते. तेच 'तळपट' बाबत, तेच 'माणसाचे काय, माकडाचे काय' बाबत... आणि शेवटी त्यांच्या रुपककथा (जी. एं चा शब्द 'दृष्टांतकथा') सामान्य वाचकाने 'पार अगम्य बुवा! ' म्हणून मोडीत काढल्यावर तर त्यांना 'Is it worth it? ' असा प्रश्न पडणे स्वाभाविकच होते. 'आपल्या कथा लिहून झाल्यावर आपण त्यांतून मुक्त होतो, आपल्या त्यांच्याशी अंघोळीपुरताही संबंध राहात नाही, आणि मग आपले वाचक, समीक्षक त्यांच्याविषयी काय म्हणतात याच्याशी आपल्याला काहीही घेणे असत नाही' हा त्यांचा पवित्रा बाकी त्यांनी घातलेल्या अनेक मुखवट्यांपैकी एक असला पाहिजे. एरवी जी. एंसारख्या कमालीच्या हळव्या, संवेदनशील माणसाला वाचन, लिखाण या त्यांच्या आयुष्याचाच एक भाग होऊन गेलेल्या बाबतीत इतके जाड कातडीचे होणे शक्य नाही
जी. एंची ही संवेदनशीलता जशी त्यांच्या अनेक कथांमधून व्यक्त झाली आहे, तशीच त्यांच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातूनही. या बाबतीत जी. एंनी लिहिलेली दोन पत्रे जशीच्या तशी उधृत करावीशी वाटतात. पैकी एक पत्र त्यांनी आपला लाडका लव्हबर्ड (बडरिजर) -नाद -गेल्यानंतर आपल्या बहिणीला लिहिले आहे. ते म्हणतातः
प्रिय नंदा,
एक वाईट बातमी.
नादचे छोटे निळे आयुष्य शुक्रवारी संपले. चार दिवसांपूर्वी अचानक त्याच्या पायातील शक्तीच गेली. दांडीखेरीज तो इतर कुठे बसत नसे. त्यामुळे खालून वर जायच्या धडपडीत तो वरचेवर खाली पडायला लागला. मला स्वतःला असल्याबाबतीत काय करायचे माहीत नाही आणि येथे पक्षांच्याबाबतीत (पुण्या-मुंबईप्रमाणे) डॉक्टर मिळत नाहीत. आम्ही शक्य होते ते केले. प्रभावतीने त्याच्यासाठी खालीच कापडाची गादी केली व ती त्याला हातात धरून दाणेपाणी देत होती. गुरवार रात्री तर तिने त्याला रात्रभर हातावरच ठेवले, पण या साऱ्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्याला हातात घेतले तेंव्हाच मी तिला सांगितले की हा दोन दिवसांपेक्षा टिकायचा नाही. तो आमच्याजवळ दहाअकरा वर्षे होता. त्या पक्षांचे वय बारा ते पंधरा वर्षे असते, असे मी वाचले होते. कदाचित वार्धक्यामुळे हे आज ना उद्या होणार होतेच, पण झाले तेंव्हा आम्हाला एकदम फार व्याकूळ वाटले हे खरे. दोन दिवसांत त्याला झालेला त्रास पाहून मला मात्र वाटले, जर तो सुधारणार नसेल, तर शक्यतो लवकर तो संपलेलाच बरा.
तो घराचा एक भागच झाला होता. दोनचार चिमूट दाणे, थोडे पाणी, आणि कोथिंबीर एवढीच त्याची अपेक्षा, व तेवढ्यासाठी तो उत्साहाने गरगर फिरत असे. मुंबईला मी अनेक पक्षी पाहिले, त्यांत उत्साहाने तो एकदम पुढे आला, म्हणून मी त्याची निवड केली होती. तो वाढला, त्याला पिलेही झाली आणि आता सगळेच संपले.
सकाळी देवपूजेच्या वेळी घंटा वाजली की तो हटकून वरून ओरडत असे. आता मला सकाळी फार चुकल्यासारखे वाटते.
सगळ्याच गोष्टींची सवय होते त्याप्रमाणे या गोष्टीचीही सवय होईल.या आधीदेखील दोनचार पक्षी गेलेच. पण नादची गोष्ट निराळी. त्याच्या आठवणीने एकदम उदास वाटते. पण मुक्कामाचे दिवस ठरलेले असतात. आता अनेकदा वाटते, पक्षी वगैरे जिवंत गोष्टींच्या भानगडीत आपण पडायला नको होते, म्हणजे आपण होऊन आणलेली ही व्यथा सहन करावी लागली नसती.
पण मग त्याचे मऊ निळे अंग, त्याचे हातावर येऊन दाणे टिपणे आठवते, व व्यथेला मऊपणा आहे हेही जाणवते.
त्याचे राहणे तेवढेच होते. ती आठवण मी आमच्या बागेत लिंबाच्या झाडाखाली झाकून टाकली.
बराय.
तुझा,
जी. ए. कुलकर्णी
असेच एक व्याकूळ पत्र जी. एंनी श्री. पु. भागवतांना लिहिले आहे - माधव आचवल गेल्यानंतर. त्यात ते म्हणतातः
माधवविषयी श्री. भटकळांचे पत्र आले. मी थोडा वेळ खिळल्यासारखा झालो. तो आजारी होता हेदेखील मला माहीत नव्हते. त्याच्या मागच्या attack विषयी माहिती होती, पण ती फार जुनी गोष्ट.
माझ्या केवळ सुदैवाने मिळालेला हा एक रसिक मित्र. त्याने पुष्कळ पत्रे लिहिली. मोठ्या त्वेषाने वादविवाद केला. हळुवारपणे पुस्तकांविषयी लिहिले. मला वाटते, रस्त्यात पोरे गोट्या खेळतात त्यावर जरी त्यीने लिहिले असते तरी ते ताजेतवाने वाटले असते. झाडांच्या बाबतीत man with a green thumb म्हणतात त्याप्रमाणे तो होता. त्याने थोडे लिहिले; पण ते सोन्याच्या नाण्याप्रमाणे झगझगीत, बिनगंज आहे. ('किमया' सारखे दुसरे पुस्तक तुमच्या व भटकळांच्या यादीत नाही)
त्याने कधी कविता लिहिल्या की नाही, हे मला माहीत नाही. पण तो कवीसारखा जगला. मला त्याने कवीप्रमाणे पत्रे लिहिली. त्यामुळे मला आज एखादे गीत संपल्यासारखे वाटते. गीत आणि गीताबरोबर तो आवाजही कायमचा!
काही लिहिले तर आता शब्द टरफलाप्रमाणेच वाटतील.
Farewell, my friend. I am sure wherever you are, you will create a small, sun-filled garden around you.
And a small bird will come, and sing, not specially for you, but only for you.
हे वाचल्यानंतर हा तथाकथित माणूसघाणा, तुसडा, एकटा राहाणारा माणूस आतून किती नाजूक, हळव्या मनाचा होता, याची कल्पना येते.
या अक्षम्य दुर्गुणाच्या - दुर्गुणाच्याच म्हणतो-जोडीला जी. एंमध्ये संकोच आणि स्वाभिमान - पराकोटीचा तीव्र स्वाभिमान- हेही दोन भीषण दुर्गुण होते. 'काजळमाया' या त्यांच्या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले, पण काही तांत्रिक बाबींवरून त्यावर वादंग निर्माण होताच जी. एंनी ते सडेतोडपणाने परत करून टाकले. या बाबतीत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, समकालीन लेखकांनी आणि शेवटी साहित्य अकादमीनेही केलेली रदबदलीचे प्रयत्न त्यांनी कठोरपणे धुडकावून लावले. कुणाच्या घरी जेवायला जाणे असो (मग ते त्यांच्या अगदी जवळच्या सुनीताबाई देशपांड्यांच्या घरी का असेना! ) की कुणाकडून कसल्या साध्या भेटी (त्यांच्या आवडीचे दुर्मिळ पुस्तक ते सिगारेटचे एखादे पाकीट! ) स्वीकारणे असो, जी. ए. अत्यंत संकोची आणि अवघडलेले राहिले. आपल्या पुस्तकांचे सगळे अधिकार प्रकाशकाला देऊन टाकणे आणि आणि पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढायलाही नकार देणे या अत्यंत अव्यवहारी गोष्टींमागेही त्यांचे हेच अवघडलेपण असावे, असे वाटते. अमोल पालेकरांनी त्यांच्या कथेवर चित्रपट काढण्यासाठी ('कैरी') त्या कथेचे अधिकार जी. एंकडून विकत घेतले आणि त्याबाबत जी. एंना काही रक्कम दिली; तर हा चित्रपट काढण्यास विलंब होत आहे असे दिसल्यावर जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले व त्यांनी ती रक्कम पालेकरांना (हातकणंगलेकरांतर्फे) परत करण्याची तयारी दाखवली, हे असेच एक दुसरे उदाहरण.
अशा या कापूसमनाच्या माणसाला व्यावहारिक जगात 'तयार' असलेल्यांनी धक्केही बरेच दिले. पैशांच्या बाबतीत त्यांची फसवणूक झाल्याचे किमान दोन पुसट उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पत्रांत (अगदी नाईलाज म्हणून) येतात. आपल्या पुस्तकांचे मुद्रण, त्याचे मुखपृष्ठ याबाबत अतिशय आग्रही काटेकोर असलेल्या जी. एंना त्यांच्या काही चित्रकार मित्रांनी ऐन वेळी दगा दिल्याचे संदर्भ वाचूनही वाईट वाटते. त्यांचे अखेरच्या काळातले प्रकाशक आणि त्यांच्या पुस्तकांवरील मुखपृष्ठाचे चित्रकार यांच्यात जी. एंच्या मृत्यूनंतर 'आपणच जी. एंच्या अधिक जवळचे कसे होतो' हे दाखवण्याची चढाओढही आपल्याला व्यथित करून जाते. दळवींसारखा जी. एंचा घट्ट मित्र शेवटच्या काही वर्षांत जी. एंची चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवत नाही (कारणे काहीही असोत! ) आणि सुनीताबाई देशपांड्यांबरोबरचेही अत्यंत दीर्घ आणि खोल मैत्रीसंबंध हळूहळू विरून जातात... जी. एंविषयी मनात करुणा भरून येते.
आणि मग मृत्यूआधी जेमतेम दोन-तीन महिने जी. एंनी हातकणंगलेकरांना लिहिलेले ते (इंग्रजी)पत्र. बहुदा जी. एंनी लिहिलेले शेवटचेच पत्र. त्यातही जी. ए. काही नवीन वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहितात, आणि शेवटी म्हणतात, (मूळ परिच्छेदाचे मराठी भाषांतर करण्याचे धाडस माझे! )
'तुम्ही म्हणता, हातकणंगलेकर, की मी आता पुण्यात हळूहळू रुळत चाललो आहे. तुमचे म्हणणे अगदी चूक आहे. पुण्यात मी कधी रुळू शकेन, असे मला वाटत नाही. फक्त आता या बाबतीत मी कुणाशीही काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे. विशेषतः प्रभावती आणि नंदाशी. त्यांना मग फार वाईट वाटते...'
या मालिकेच्या निमित्ताने या अरभाट लेखकाची लेखकापलीकडील एक अरभाट माणूस म्हणून मला ओळख झाली हेच मला पुरेसे आहे. हे लेख लिहायला सुरवात करताना माझी जशी चाचपडल्यासारखी अवस्था होती, तशीच आजही आहे; पण मी हे लिहावे म्हणून मला वरचेवर उत्तेजन देणाऱ्यांचा आणि बरेवाईट प्रतिसाद देणाऱ्यांचा मी आभारी आहे.