पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरीक्षा: काही प्रश्न व सूचना

अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपापल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सूचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत.
प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सूचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सूचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सूचना यदाकदाचित योग्य व्यक्तींनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे.
***[संगणकाद्वारे वर्गीकरण करून प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सूचना व प्रश्न लागू पडतील]***
प्रश्न:
१. दहावीच्या निकालानंतर प्रत्येक महाविद्यालय किती दिवस अधिकृतपणे प्रवेशप्रक्रिया चालू ठेवते?
१.१ एखाद्या महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया संपली हे कसे कळते? त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातच चौकशी करावी लागते का?
१.२ कोणत्या शाखेत प्रवेश मिळाला हे कधी कळते? त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातच चौकशी करावी लागते का?
२. प्रत्येक महाविद्यालयाचा अर्ज विकत घेण्यासाठी किती वेळ रांगेत सरासरी तास घालवावे लागतात?
३. प्रत्येक महाविद्यालयात अर्ज देण्यासाठी किती वेळ रांगेत सरासरी तास घालवावे लागतात?
४. एका महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया संपूर्णपणे पार पाडण्यासाठी एंड-२-एंड किती वेळ जातो?
५. एखाद्या महाविद्यालयाचा प्रवेश रद्द करायला काय करावे लागते? त्यासाठी किती वेळ जातो? किती चकरा माराव्या लागतात?
६. प्रत्येक महाविद्यालयात ४ चाकीची पार्किंग व्यवस्था असते का?
७. किती दिवस सुटी पालकांनी घ्यावी लागते?
८. पुण्यात/मुंबईत किती महाविद्यालये अकरावीसाठी व शाखेसाठी आहेत हे कुठे कळते? त्यांचे पत्ते कुठे मिळतील?
९. प्रत्येक महाविद्यालयात मागील वर्षी कोणत्या शाखेत किती टक्क्यांना प्रवेश दिला गेला हे कुठे कळते?
१०. प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश क्षमता किती आहे हे कुठे कळते?
सूचना:
१. कोणत्यातरी तर्कशुद्ध वर्गवारीने काही-काही महाविद्यालये एकत्र (गट) येऊन एक-खिडकी योजना शहराच्या काही भागात चालू करू शकतील का? पालक पैसे, कागदपत्रे, फोटो सगळे घेऊन एका खिडकीतून सगळ्या गटाचे प्रवेश अर्ज घेऊन, दुसऱ्या खिडकीत सगळ्या महाविद्यालयाचे अर्ज देऊ शकले तर फार वेळ, पेट्रोल, सुट्या [ह्या सुट्या विकल्यातर मिळणारे पैसे हजारात असतात त्यामुळे त्याही प्रवेश खर्चात धराव्या लागतात], मनस्ताप वाचेल.
२. प्रत्येक महाविद्यालयाने प्रवेश अर्ज घेण्यासाठी [व नंतर भरण्यासाठी] क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांना बोलवावे- क्रम ठरवण्याचे हे मार्ग असू शकतात- अल्फाबेटिकली, शाखेप्रमाणे इतर. ह्यात सगळ्या महाविद्यालयांचा समन्वय असावा.
ह्याचे फायदे-
२.१ शहरातील सगळ्या महाविद्यालयांनी निकालाच्या आदल्या दिवशी पेपर मध्ये एकाच ठिकाणी हे प्रसिद्ध करावे. त्यामुळे पालकांना कोणत्या दिवशी कुठे जायचे आहे ते कळेल.
२.२ महाविद्यालयांना प्रत्येक दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा अंदाज येईल. ह्यासाठी दहावी बोर्डाची मदत होऊ शकेल व त्या-त्या शहरातील विद्यार्थ्यांची नावे कळतील. शक्यतो विद्यार्थी काय निकष लावून प्रवेश घेतात हे संख्याशास्त्राचे नियम वापरून माहीत होऊ शकते. त्याप्रमाणे त्यांनी सोय करून दिल्यास कमीतकमी वेळेमध्ये प्रत्येक प्रवेशप्रक्रिया पार पडू शकेल
२.३ ज्यांना अमुक एक शाखा नकोच आहे असे विद्यार्थी त्या दिवशी गर्दी करणारच नाहीत
३. ज्या ठिकाणी याद्या - नावे लिहिली जातात ते एका फळ्यावर चिटकवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. भारतीय पुरुष सरासरी ५.५ फुटांचा व स्त्री ५.० फुटांची असते. यादी पाहण्यासाठी ते फळे ह्या उंचीचा अंदाज घेऊन वर लावावेत. अक्षर मोठे असावे. म्हणजे फळ्याजवळ रेटारेटी करत याद्या पाहाव्या लागणार नाहीत; ह्यात महिलांची फार कुचंबणा होते.