ह्यासोबत
(नथानिअल हॉथ्रोन यांच्या डेव्हिड स्वान या कथेवर आधारित)
तुमच्या आमच्या जीवनाचा क्रम ठरवणारी, आपल्याला मार्ग दाखवणारी आणि आपल्याला आपल्या जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाकडे घेऊन जाणारी प्रत्येक घटना आपल्या लक्षात येतेच असं तुम्हाला वाटतं? यातल्या कित्येक घटना कदाचित अशाही असतील की ज्या आपल्या आयुष्याची दिशा ठरवायला कारणीभूत खरं तर ठरतात आणि आपण स्वतः मात्र अशा घटनांच्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असतो. किंवा काही घटना अशाही असतील की ज्या आपल्या नकळत आपल्या आयुष्याच्या अगदी नजीक येऊन ठेपतात आणि केवळ दैवगतीनंच पुन्हा त्यांची मार्गक्रमणा बदलून दूर निघून जातात. आपल्या आयुष्यात कळत नकळत घडत राहणारे असे बदल किंवा असे बदल घडण्याच्या शक्यता जर आपल्याला कळल्या तर आयुष्याचे सगळे रंगच पालटतील. क्षणात आकांक्षा, क्षणात भीती, क्षणात प्रचंड आनंद आणि क्षणात दुःख - असा भाव भावनांचा कल्लोळ उठेल आणि चित्ताला शांतता म्हणून क्षणभरही लाभायची नाही. पण हे सारं असं जर-तरच्या भाषेतलं बोलणं म्हणजे कोड्यात बोलल्यासारखं वाटतं ना? थांबा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला माझ्या म्हणण्याचा नीट उलगडा होईल.
ही गोष्ट खूपच जुनी आहे. म्हणजे समजा एक साठ सत्तर वर्षापूर्वींची. आमच्या गावाकडची. त्या काळी तिकडे डांबरी रस्ते, गाडी रस्ते असे फारसे नव्हतेच. आमच्या तालुक्यातला एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे नांदगाव, शिरगाव कडून येणारा आणि तालुक्याच्या गावाला देवगडला जाणारा. अर्थात हाही मातीचाच. कोल्हापूर कणकवलीकडनं येणाऱ्या कंपनीच्या सर्विसच्या मोटारी याच रस्त्यानं दिवसातनं चार पाच यायच्या आणि चार पाच जायच्या. आणि याच रस्त्यावर एक छोटासा तिठा होता. लिंगडाळ तिठा. लिंगडाळीच्या ष्टापपासून या रस्त्याला एक पाउलवाट फुटली होती, दक्षिणेकडे जाणारी. म्हणूनच हा तिठा. दहिबाव, मिठबाव, हिंदळ्यात जाणारे लोक लिंगडाळ तिठ्याच्या या ष्टापला उतरून या पाऊलवाटेनं चालत चालत आपापल्या गावी जायची.
आणि याच पाऊलवाटेनं दुपारच्या रणरणत्या उन्हात तो पाहा एक तरुण लिंगडाळ तिठ्याच्या दिशेनं चालत येतोय. उन्हानं त्याचा चेहरा रापलाय अन घामानं कपडे ओलेचिंब झालेत. बिचारा अडीच तीन तासांची पायपीट करून मिठबावीतनं इथपर्यंत आलाय. त्याचं नाव आहे जगन्नाथ. जगन्नाथच्या मामाचं कोल्हापूरात किराणा भुसाराचं दुकान आहे. मामा याला दुकानात कामाला ठेवून घेणार आहे आणि हा आता तिकडंच निघालाय. मिठबावीतनं लिंगडाळ तिठ्यापर्यंत पायी आलाय आणि इथून सर्विसच्या मोटारनं कोल्हापूरला जाणार आहे.
लिंगडाळ तिठ्यावर रस्त्याच्या कडेला आंब्याची भली मोठी जुनी पाच सात कलमं आहेत. त्यांची मस्त थंडगार सावली सभोवताल पसरलीये आणि कलमांच्या मागं आहे एक छोटासा खळाळत वाहणारा वहाळ. आपला जगन्नाथ याच कलमांच्या सावलीला येऊन दोन मिनिटं बसला, बरोबर आणलेली कपड्यांची पिशवी बाजूला ठेवली, ऊठून जाऊन वहाळावरनं थंडगार पाण्यानं चेहरा, हात पाय धुवून आला आणि मग एका बाचक्यात बांधून आणलेली चटणी भाकरी सोडली आणि न्याहारी उरकली. पुन्हा एकदा वहाळावर जाऊन हात धुतले आणि मग परत येऊन आंब्यांच्या सावलीला कपड्याची पिशवी डोक्याला घेऊन हलकेच आडवा झाला. रणरणत्या उन्हातनं एवढी मोठी मजल मारून आल्यामुळे तो पार दमून गेला होता. थंडगार सावली अन वाऱ्याच्या झुळुकेनं त्याचा लगेचच डोळा लागला. अन क्षणात तो गाढ निद्रीस्तही झाला.
जगन्नाथला झोप लागली तरी उर्वरीत जग जागंच होतं. अन त्यांची त्यांची आपापली रहाटगाडगीही चालू होती. रस्त्यानं कुणी वाटसरू जात येत होता. कुणी भराभर पाय उचलून घराकडे चालला होता, कुणी गुरं हाकत नेत होता, तर कुणी डोक्यावरनं आंब्याची पाटी घेऊन चालला होता तर मध्येच एखादी बैलगाडीही जात येत होती. जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी कुणाचं लक्ष जगन्नाथकडे जायचं तर कुणी इकडे तिकडे न बघता नाकासमोर बघून चालत रहायचा. कुणाकुणाला त्याच्या मस्त शांत झोपेचा हेवा वाटायचा तर कुणाकुणाला मत्सरही वाटायचा. एका मध्यमवयीन विधवा बाईनं चालता चालताच जगन्नाथाच्या पीळदार शरीराकडेही हळूच बघून घेतलं तर एका मास्तराला वाटलं की दारू पिऊन तो झिंगूनच पडलाय. पण जगन्नाथ मात्र या सगळ्याच्या पलिकडे होता. लोकांच्या या सगळ्या भाव भावनांशी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं.
जगन्नाथला झोप लागून पाच एक मिनिटंच झाली असतील तोच रस्त्याच्या कडेला एक बैलगाडी येऊन थांबली. बैलगाडीला छान कुडाचं बनवलेलं गोल छप्पर होतं आणि आतमध्ये देवगडातला एक धनवान व्यापारी अन त्याची बायको बसले होते. चालून चालून बैलांच्या तोंडाला फेस आला होता, म्हणून गाडीवानानं पाच एक मिनिटं विश्रांतीसाठी गाडी रस्त्याच्या कडेला आंब्यांच्या सावलीत कासरा ओढून उभी केली होती. थंडगार सावली बघून व्यापारी अन त्याची बायको गाडीतून खाली उतरले आणि सहाजिकच त्यांचं लक्ष पाठीमागच्या खळाळत्या वहाळाकडे आणि मग तिथून जवळच गाढ झोपलेल्या जगन्नाथाकडे गेलं. व्यापारी दांपत्य वयस्कर होतं आणि सहृदयीही. झोपलेल्या जगन्नाथाला बघून व्यापाऱ्यानं बायकोला फार आवाज न करण्याची खबरदारी घेण्याचा निर्देश केला अन नवरा बायको दोघंही जगन्नाथाहून थोडं अंतर सोडून बसले.
"किती शांत झोपलाय बघ तो माणूस... " व्यापारी हलक्या आवाजात बायकोला म्हणाला. "एवढ्या शांत झोपेसाठी माझी अक्षरशः काहीही करायची तयारी आहे. देवा, चार पैसे कमी दे पण मलाही अशी झोप दे. सततच्या तणावाचं कसलं हे आमचं जीवन. "
"आणि बघा की या वयातच एवढी चांगली तब्ब्येत आणि एवढं चांगलं मानसिक स्वास्थ्य... वा... " बायकोनं पुष्टी जोडली. जेवढे जास्त ते जगन्नाथाकडे बघत होते तेवढं जास्त त्या कनवाळू जोडप्याला त्याच्याबद्दल ममत्व वाटायला लागलं होतं.
"अहो, त्या मुला हाक मारुया का? " बायकोनं नवऱ्याला विचारलं.
"कशाला? "
"कशाला काय? आपल्या पोटचं पोर तर गेलं आणि मेव्हण्याच्या पोरानं काय दिवे लावलेत माहितीच आहे ना? आता कोण आहे आपल्याला? हा बघा किती बिचारा गरीब आणि साधा दिसतोय. "
"वेडी आहेस का? हा कोण, कुठला? आपल्याला त्याची काही माहिती सुद्धा नाही."
"अहो, पण त्याचा चेहराच सांगतोय की. आपल्यामुळे एखाद्या गरीबाचं भाग्य तरी उजळेल... "
व्यापाऱ्याच्या मुलाचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर स्वतःच्या मेव्हण्याच्या मुलाला त्यांनी स्वतःकडे आणून ठेवलं होतं. पण मेव्हण्याच्या मुलानं आल्या आल्याच आपले रंग उधळले होते. त्यामुळे त्याला बाहेर काढावा लागला होता. व्यापारी दांपत्याच्या अमाप संपतीला त्यामुळे आता कुणीच वारस नव्हतं. जगन्नाथाच्या डोक्यावर त्यामुळे वैभवी छत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. कुबेराचं भांडार कदाचित त्याच्यासाठी उघडणार होतं, पण जगन्नाथ मात्र या सगळ्यालाच अनभिज्ञ होता. जाणीव-नेणीवेच्या पलिकडील अवस्थेत होता.
"चला मालक. गाडी जोडलीया. " गाडीवानानं हाक मारली. जगन्नाथाला उठवायला हवं होतं का नव्हतं अशा द्विधा मनस्थितीत नवरा बायको गाडीत जाऊन बसली. गाडीनं रस्ता पकडला अन क्षणात व्यापाऱ्याचे विचार बदलले. धंद्यात बुडालेल्या लोकांना कर्जं देणारी व्यापारी संस्था काढण्याचं बऱ्याच दिवस त्याच्या मनात योजत होतं. तो आपल्या योजनेच्या विचारात बुडून गेला. आणि जगन्नाथ मात्र तसाच शांत, निद्रिस्त राहिला.
- क्रमशः