जगन्नाथ (भाग - २)

व्यापाऱ्याची गाडी गेली आणि पुढच्या वळणावरनं दिसेनाशी होतीये ना होतीये तोच शिरगावच्या बाजूने झपझप चालत एक गोरीपान सुस्वरुप तरुणी आली. उन्हाच्या तडाक्यानं ती दमली होती आणि घामेघूम होत होती. लिंगडाळ तिठ्याच्या सावलीला तिनं आपली पिशवी झाडाखाली ठेवली आणि तशीच ओढ्यावर गेली. साडी गुडघ्यापर्यंत वर करून तिनं पाय धुतले, हात धुतले, पदर सोडला, चोळीची वरची एक दोन बटणं काढली आणि शिणलेल्या चेहरा, गळा, छातीवरनं थंडगार पाण्याचा हात फिरवला. तिला खूपच ताजंतवानं वाटलं आणि तशीच पुन्हा आंब्याखाली येऊन पिशवीतला पंचा काढून त्यानं चेहरा, गळा, छाती पुसायला लागली. इतक्यात तिचं तिथंच पलिकडे झोपलेल्या जगन्नाथाकडे लक्ष गेलं आणि ती थोडी दचकली. पण लगेचंच त्याला अगदी गाढ झोपलेलं बघून निर्धास्त झाली. तिनं पुन्हा एकदा जगन्नाथाकडे नीट बघून घेतलं आणि त्याचा रुपवान चेहरा बघून तिला क्षणिक लाजल्यासारखं झालं. अन इतक्यात एक मोठा भुंगा गुं गुं करत जगन्नाथाच्या भोवती उडताना दिसला. 'हा असला भुंगा कानात आत जाऊन चावतो... ' तरुणीच्या मनात आलं आणि पटकन जगन्नाथाच्या जवळ जात हातातल्या पंचानं तिनं भुंग्याला हाकललं, पार लांब पिटाळून लावलं. पण त्यामुळे तिला जगन्नाथाच्या चेहेऱ्याचं, पिळदार शरीराचं अगदी जवळनं दर्शन झालं. तिच्या छातीत आपोआपच धडधडल्यासारखं व्हायला लागलं, उगाचच चेहेऱ्यावर थोडसं हसू पसरलं.     

जगन्नाथा, बाबा, तू एखादं सुंदर स्वप्न बघतोयस का?  अरे मग ते सोड. कारण त्याहूनही सुंदर खरंखुरं स्वप्न इथे तुझ्या समोर साक्षात उभं आहे. अरे बाबा, हीच ती तरुणी आहे, तुझ्या कल्पनेतली आणि जिच्यासाठी रात्र रात्र तू तळमळत या कुशीवरून त्या कुशीवर वळत राह्यलायस. बघ पटकन उठ... कारण हे प्रेम क्षणा दोन क्षणातच इथून निघून जाईल आणि मग या प्रेमाला तू पारखाच राहशील.   

"किती गाढ झोपलाय बाई... " असं म्हणत तरुणीनं आपले कपडे नीटनेटके केले, पिशवी उचलली आणि पुन्हा रस्ता पकडला. पण आता पावलं मात्र आधीच्या सारखी झपझप पडत नव्हती...

तरुणीचे वडील या भागातले मोठे बागाईतदार होते आणि आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी सध्या स्थळंही शोधत होते.    जगन्नाथाची आणि तिची जर आज ओळख झाली असती तर जगन्नाथाला कदाचित हे प्रेमही मिळालं असतं आणि वारश्यानं आलेलं बागाईती ऐश्वर्य... पुन्हा एकदा नशीब, महा मोठं भाग्याचं नशीब जगन्नाथाच्या सान्निध्यात आलं आणि सान्निध्यात म्हणजे इतकं की त्या तरुणीची साडीही त्याला स्पर्शूनही गेली. पण जगन्नाथ मात्र अजूनही तसाच होता ब्रम्हानंदी टाळी लागलेल्या अवस्थेत.

तरुणी शंभर दोनशे पावलं गेली असेल नसेल तोच दहिबावच्या पाऊलवाटेनं दोन वाटसरू आले. दोघंही दिसायला राकट, काळे कभिन्न  बहुतेक भिल्ल रामोशी असे कुणीतरी असावेत. दोघांचेही डोळे तांबारलेले होते आणि दोघांनीही मळकं धोतर नेसलं होतं आणि अंगात जुना मळका सदरा घातला होता. हे दोघे भुरटे चोर होते. कुणाच्या मळ्यातलं धान्य कापून ने, कुणाच्या खळ्यात वाळत घतलेले कपडे पळव, कुणा एकट्या दुकट्याला गाठून धाकदपटशानं त्याची सगळी चीजवस्तू लुबाड हाच यांचा धंदा होता. आता आंब्याच्या सावलीला बसून दोन डाव मस्त पत्त्याचे टाकू आणि मग पुढचं काय ते ठरवू असा यांचा विचार होता.   अन आंब्याच्या सावलीला पोहोचताच दोघांचंही एकाच वेळेस जगन्नाथाकडे लक्ष गेलं.  

"त्ये बघ... आन डोक्याखालचं गठुडं दिसल का? " एकानं दुसऱ्याला कुजबुजत्या आवाजात विचारलं. दुसऱ्यानं नुसताच डोळा मारला आणि 'मंग होऊन जाउन द्या... ' अशा अर्थानं मानेला झटका दिला.  

"येवडा गच डोक्याखाली दाबून झोपलाय... म्हंजी माल हाय गठुड्यात". पहिल्यानं खात्रीशीर माहिती पुरवली. 

एवढ्यात दुसऱ्यानं एक दगड हातात घेतला. "हं...काड अल्लादच तू...मी हाये..." दुसरा.

"आरं पन त्येवड्यात चाळावला तर..?"

"तू काड. चाळावला तर टक्कुऱ्यात दगुड घालतोयच की मी... मंग पडंल गपगार... हं... " दुसऱ्यानं सांगितलं.

पहिला जगन्नाथाच्या अगदी जवळ सरकला. दुसरा शेजारीच दगड घेऊन उभा राहिला. अजिबात आवाज न होऊ देता जगन्नाथाच्या पिशवीला पहिल्यानं हात घातला अन हलकेच ओढायला सुरुवात केली. आईच्या मांडीवर जसं एखादं तान्हं बाळ शांत, गाढ निद्रिस्त व्हावं, जगन्नाथही अगदी तसाच शांत झोपला होता.  अन नेमक्या याच वेळी कुठुनतरी हुंगत हुंगत पळत पळत एका पाठोपाठ दोन कुत्री आंब्याखाली आली आणि या तिघांना बघून क्षणभर स्तब्ध झाली.   कुत्र्यांच्या अंगच्याच उपजत बुद्धीचातुर्यानं त्यांना समोरचं दृश्य काही फारसं आवडलं नाही आणि त्यांनी मारेकऱ्यांकडे  मान वाकडी करत करत गुरगुरायला सुरवात केली.

"ज्यायची... ही कुत्तरडी कुठून उपटली हितं मध्येच? " दगड हातात घेऊन उभा असलेला मारेकरी म्हणाला "हाच दगुड घालू का त्येला? "

"आरं नगं... भुकून भुकून बभाळ करतील... आन मंग साराच खेळ खल्लास. " कुत्री अजूनही गुरगुरत होती आणि ताठ होऊन सावधपणे एक एक पाऊल पुढे पुढे सरकत होती.  

"दगुड टाक आन हो गुल हितून... कुत्री बोंबलायला लागायच्या आत... "

"जाऊ दे... वड्याला उतरून पानी पिऊ आनी निगू हितून... "

हातातला दगड हलकेच खाली ठेवत आणि कुत्र्यांना चुचकारत चुचकारत दोघांनीही काढता पाय घेतला.   'धंदा म्हटल्यावर असं व्हायचंच... कुठं हार कुठं जीत' दोघांनीही असा सूज्ञ विचार केला आणि माघार घेतली. जगन्नाथ मात्र अजूनही शांत झोपलेलाच होता. त्याच्यावर झाकोळून आलेलं मृत्यूचं सावट आणि ते दूर होऊन पुन्हा प्रकाशमान झालेलं जीवन, या कशाचीच त्याला काहीच कल्पना नव्हती.  

जगन्नाथ झोपून जवळ जवळ तासभर होऊन गेला होता. पहिली दमणूक आता ओसरली होती आणि जगन्नाथ थोडी थोडी चाळवा-चाळव करायला लागला होता. एकदा त्यानं थोडं खाकरल्यासारखं केलं आणि एकदा कूसही बदलली. आणि त्याच वेळेस देवगडच्या बाजूनं मोटारचा आवाज यायला लागला. आवाज जवळ जवळ यायला लागला अन ड्रायवरनं लांबनंच कर्णाही वाजवला तशी जगन्नाथाला चांगली जाग आली. तो उठून बसला. मोटारीचा उडणारा धुरळा दिसायला लागला आणि मग आपली पिशवी वगैरे उचलून जगन्नाथ पटकन रस्त्याच्या पलिकडच्या कडेला जाऊन उभा राहिला.  

"कोल्हापूर... कोल्हापूर" मोटार जवळ आली तशी किलिंडरानं आवाज दिला.  जगन्नाथ पटकन मोटारीत चढला आणि आली तशीच धुरळा उडवीत मोटार फर्रकन निघून गेली.  

जगन्नाथ मोटारीत चढला पण सावली देणाऱ्या त्या आंब्यांकडे किंवा त्या खळाळत्या वहाळाकडे जाता जाता  त्यानं एक नजरही टाकली नाही. कारण मागच्या तासा दीड तासात त्या आंब्यांखाली काय काय नाट्य घडून गेलं होतं याची त्याला सुतरामही कल्पना नव्हती. ते त्याच्या नशीबात येऊ घातलेलं ऐश्वर्य, ती एका प्रेमळ हृदयाची हाक आणि ती मृत्यूनं जवळ येऊन दाखवलेली भयानकता - हे सारं  त्याच्या कल्पनेच्याही पलिकडचं होतं. त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं.

झोपेत किंवा जागेपणी अशाच आपल्या अवती भवती घडणाऱ्या अकल्पित घटनांचा आपण विचारही करत नाही.  किंवा मी या गोष्टीच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे काही घटना अशाही असतील की ज्या आपल्या नकळत आपल्या आयुष्याच्या अगदी नजीक येऊन ठेपतात आणि केवळ दैवगतीनंच पुन्हा त्यांची मार्गक्रमणा बदलून दूर निघून जातात. पण तरीही चावायला एक चांगला विषय म्हणून खरं सांगा अशा अनाकलनीय घटनांचा निदान ओझरता तरी चित्रपट बघण्याची संधी दैवानं आपल्याला उपलब्ध करून द्यावी असं नाही वाटत तुम्हाला?

- समाप्त.