ही 'कविताच' आहे हे कशावरून ठरते?

श्री. जयंता ५२ यांचे 'तो पावसाळा' या शीर्षकाखालील लिखाण वाचून माझ्या मनात एक कुतुहल जागृत झाले आहे. त्याचा उल्लेख मी इथे मनापासून, प्रामाणिकपणे व कुणावरही व्यक्तिगत रोख न ठेवता करत आहे. ते कुतुहल असेः

'कविता' या सदरावर जेव्हा आपण क्लिक करायला जातो तेव्हा क्षणभर कर्सर 'कविता' या शब्दावर असताना एका छोट्या खिडकीत 'पद्यस्वरुपाचे लेखन' असे दिसते. या सदरात एखाद्या रचनेचा समावेश करताना ती रचना 'एक कविता' आहे हे कशावरून ठरवले जाते याचे मला कुतुहल आहे.

कृपया वाचकांनी आपापली मते द्यावीत.

( यात 'ते लिखाण' प्रतिभेने युक्त नसते असे मला म्हणायचे नाही. फक्त ते 'कविता' आहे हे कशावरून ठरते इतकेच विचारायचे आहे. )

माझे वैयक्तिक मतही देत आहेः

ज्युलियनांनी गद्याची व्याख्या 'अनियमित आवर्तनांनी युक्त असे भाषेचे रुप' अशी तर पद्याची व्याख्या 'नियमित आवर्तनांनी युक्त असे भाषेचे रूप' अशी केली. श्रीमती शुभांगी पातुरकरांनी त्यात एक महत्त्वाची ऍडिशन केली ती म्हणजे, गद्य व पद्य यात फक्त एक म्हणजे एकच तांत्रिक फरक असतो, तो म्हणजे 'नियमीत यती'!

मला हे मत समजलेही आहे व मान्यही आहे.

'मुक्तछंद' नावाचा जो एक प्रकार गौरवला जातो त्यात मात्रा / अक्षरे / यती यांचा नियम फक्त 'किंचितच' शिथिल केला जावा असे तज्ञांचे मत आहे.

मात्र, मुक्तछंद आज ज्या स्वरुपात दिसतो तो गद्याच्या पुर्णपणे जवळचा किंवा 'कर्ता, कर्म, क्रियापद' यांना फाटा देऊन व कुठल्याच प्रकारचे ' अनियमीत सुद्धा नसलेले' आवर्तन पाळणारा भाषेचा प्रकार आहे.

मुक्तछंद नावाचे एक वेगळे सदर केले जावे असे वाटते. कारण ते 'पद्यस्वरुपातले लेखन' होऊ शकत नाही.

( कविता / गजल कशी असावी / नसावी या चर्चा प्रस्तावात कृपया हे विचार ऍड केले जाऊ नयेत अशी विनंती! कारण कोणत्या लिखाणाला कविता म्हणायचे असा हा प्रस्ताव असून 'कविता कशी असावी' असा हा प्रस्ताव नाही. )

धन्यवाद!