पिल्लू कुरूप एक!

(गदिमा आणि हॅन्स अँडरसन ह्यांची माफी मागून)

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
त्यांच्यासवेच खेळे पिल्लू कुरूप एक ||ध्रु||

कुणि राखि बांधि, कोणी ओवाळि त्या पिलास
कुणि घास भरवि त्याला जणु आपल्या मुलास
दावून बोट त्याला म्हणती दुज्यास लोक,
"आहे पिलू बिचारे अपुल्यातलेच एक!" ||१||

करुणा, सहानुभूती हा तेथला रिवाज
दुबळ्या नि वंचिताची घे काळजी समाज
पाहून त्या तळ्याला छापून येति लेख,
"आदर्श संस्कृतीचा हा वस्तुपाठ एक!" ||२||

परि बंधुभाव, समता, मानव्य आज मेले
टाळून दृष्टि जो तो, खुनशीत हात चोळे
झिडकारु आज लागे पिल्लास का हरेक?
कुणि तज्ज्ञ काल बोले, "हा राजहंस एक! " ||३||

(कोलोरॅडो स्प्रिंग्ज १९९९)