वाचनान्न भोग

श्यामची आई पुस्तक न वाचलेला मराठी माणूस विरळाच, नाही तर श्यामची आई हे पुस्तक घराघरात सापडायचे. पण हल्ली मुलांना वाचन म्हटले की काय होत कोण जाणे? आपल्या समाधानापुरते पुस्तक हातात धरतात आणि आपले लक्ष थोडे बाजूला गेले की दूरदर्शन केव्हा सुरू होते तेच कळत नाही. मजेची गोष्ट म्हणजे बंद करतो म्हणत आपण ही त्यात केव्हा गुरफटून जातो तेच कळत नाही.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या . मला वाटलं पोराला काही चांगल वाचायला द्यावे, पण कसल काय? आता पण वाचायच! म्हणत
नाक मुरडल हो त्याने. आमच्या शाळेत किती तरी छान पुस्तक होती. आम्हाला पुस्तक मिळावी म्हणून किती भांडायचो आम्ही, आणि आताची पिढी चक्क नाक मुरडते. एकदा तर तो मला म्हणाला काय बाबा एवढे पुस्तक वाचतात?, अहो दूरदर्शन वर तर त्याच सिरियल असतात, मग कशाला पुस्तक वाचायचे.

आता ह्यांना काय सांगणार कपाळ!. पुस्तक वाचण्यात काय गोडी आहे म्हणून. नाही तर पुस्तकाच्या एवढ्या प्रती (एडिशन्स) निघाल्या असत्या का? काय ते पुस्तक वाचण्यात सुख आहे ते . पुस्तक तुम्ही कुठेही वाचू शकता. अगदी पडल्या पडल्या , लोळत, प्रवासात, ते पुस्तक म्हणजे कागदी रद्दी नसून तुमचा खरा मित्रच आहे. पुस्तक वाचतांना फक्त दोनच गोष्टी लागतात एक पुस्तक आणि दुसरे तुम्ही बस्स! झाल! मग त्याला स्थळाचे, काळाचे भान हा नियम लागू पडत नाही. वायफळ बडबड करण्यापेक्षा वाचतांना किती तरी लोक मी पाहिले आहे.

दुसरी गोष्ट पुस्तकात बिभस्त पणा असला तरी तो शब्दात व्यक्त होतो, दृश्य स्वरूप नसल्यामुळे त्याचा तितकासा परिणाम वाचकावर होत नाही. हळुवार शब्दाने मानवी भावना उलगडून दाखविण्याची किमया फक्त पुस्तकातच असते. शब्दांनी शृंगार फुलतात ते थुई थुई नाचणाऱ्या कारंज्यांसारखे नव्हेकी सुरकन पेटणाऱ्या दिवाळीतील भुईनळ्या सारखे. करुण रसात लिहिलेले पुस्तक निश्चितच टिपे गाळायला लावीलच लावील. नाही तर एखाद्या भागात मढ बांधलं जात असत आणि दूरदर्शन समोर बसून आज जेवण मस्त झाल बर का! म्हणत आडवा हात मारण चाललेल असत.

बर पदार्थांना जशी एक गोडी असते तशीच किंबहुना थोडी जास्तच गोडी विषयानुरुप असते. नाही तर जेवण वाढलंय हो!, चला आता, गार होईल ते, असली वाक्य कानी पडलीच नसती. एक अर्धा तास पुस्तक वाचून अनिच्छेने खाली ठेवायची पाळी आली तर तोंडाला त्याची चव लगेच कळते आणि मग पटकन मिटकी मारली जाते.

त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट आवर्जून उल्लेखनीय आपण दुरदर्शनवरच्या ज्या विनोदी मालीका पाहतो, त्यात ओढून ताणून केलेले विनोद , त्यातील कलाकारांचे आचरट अंगविक्षेप करून ही हसू फुटत नाही , पण अत्र्यांच्ये शब्द वाचता वाचता कधी खसखस पिकवतात हे वाचणाऱ्याला सुद्धा कळत नाही. हि किमया दुरदर्शनवर काही मालीका सोडल्या तर  कितीश्या जणांनी साधलेली आहे ?