चकोल्या

  • तुरीची डाळ १ वाटी
  • गव्हाचे पीठ दीड वाटी
  • धनेजीरे पूड दीड चमचा, लाल तिखट दीड चमचा
  • गोडा/काळा/गरम मसाला दीड चमचा
  • चिंचगुळाचे दाट पाणी अर्धा ते पाऊण वाटी
  • मोहरी, हिंग, हळद, मीठ चवीपुरते
  • फोडणीसाठी तेल
  • गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा
  • १ चमचा जिरे
४५ मिनिटे
२ जण

तुरीची डाळ कुकरामध्ये शिजवून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये थोडे लाल तिखट, हळद, मीठ व थोडे तेल घालून नेहमीप्रमाणेच पोळीला पाहिजे तशी कणीक भिजवा.

तुरीची डाळ थंड झाली की मध्यम आचेवर एका कढईत/पातेल्यात पुरेसे तेल घालून फोडणी करा व त्यामध्ये शिजलेली डाळ एकसारखी करून घाला. त्यात थोडे पाणी घालून लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम/गोडा/काळा मसाला घाला. चवीपुरते मीठ घालून आमटी ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये चिंचगुळाचे दाट पाणी घाला. गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घ्या. खूप काळा होईतोवर भाजा. थंड झाला की त्यात थोडे जिरे घालून मिक्सर ग्राइंडर वर बारीक करा व उकळत्या आमटीत घाला. अशी ही मसालेदार आमटी थोडावेळ उकळा. अजून थोडे पाणी घाला. खूप पातळ आमटी नको.

आता गॅस बारीक करा. भिजवलेल्या कणकेचा एक मोठा गोळा घेऊन एक मोठी पोळी लाटा. खूप जाड नको, व खूप पातळ नको. पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने चौकोनी काप करा. आता हे काप पटापट आमटीत सोडा व ढवळा. अशा प्रकारे कणकेच्या पोळ्या लाटून व काप करून सर्व काप आमटीमध्ये सोडा. एकीकडे ढवळत राहावे. आता आच थोडी वाढवा. म्हणजे आमटी उकळताना शंकरपाळ्यासारखे जे काप करून आमटीमध्ये सोडलेले आहेत ते शिजतील. ५ मिनिटांनी परत गॅस मंद ठेवा. आता थोडे कच्चे तेल वरून घाला व कढईवर/पातेल्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर या चकोल्या चांगल्या शिजतील. थोड्यावेळाने झाकण काढा. एक चकोली बाहेर काढून ती हाताने शिजली आहे का नाही ते पाहा. चकोल्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. चकोल्या खूप दाट आहेत असे वाटल्यास थोडे पाणी घालून ढवळा.

आता या चकोल्या गरम गरम असतानाच खा. आणि त्यावर भरपूर साजूक तूप घाला. सोबत कुरडई, सांडगी मिरची अथवा पोह्याचा पापड तळून घ्या. भरपूर पोटभर खा म्हणजे अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. हा एक अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे.

हा माझा एक अत्यंत आवडता खाद्यपदार्थ आहे. यालाच डाळ ढोकळी किंवा वरणफळे असेही नाव आहे.

शु. चि वापरला आहे.

नाहीत.

सौ आई