घालते घायाळ हरणी आण आहे!
का तरीही रोखलेला बाण आहे?
चंद्र कोठे गावतो काव्यास माझ्या?
कल्पनेचे तोकडे उड्डाण आहे!
"आज कोणाचा गळा देवा नशीबी?"
हाय! दोरांनाच ह्याचा ताण आहे!
मी तसा आहे सुखी ह्या राऊळी पण,
एक नाम्या अन तुक्याची वाण आहे
चूर झाला त्यास का हे ठाव नव्हते?
हे नसे काळीज, हा पाषाण आहे?!
दुर्दशा झाली अशी ह्या छप्पराची!
पाहुनी आभाळही हैराण आहे!
कैसच्या जपशील मुद्रा पावलांच्या? (कैस=मजनूचे खरे नाव)
वाळवंटा! तीच माझी खाण आहे!
-मानस६