श्रीगणपती अथर्वशीर्ष.. फलश्रुती

या अथर्वशीर्षाचे अध्ययन । करिता साधेल ब्रह्मस्वरुप । विघ्नबाधा न होईल । खचित लाभेल सर्वसुख ॥ ब्रह्महत्या मद्यपान । चोरी गुरुपत्नीगमन । अपराध्यांचा संग । जाणा ही महापातके ॥ या पापांचे मोचन । करिता अथर्वशीर्षाचे अध्ययन । सायंकाली करिता पठण । दिवसाची पापे नाशती ॥ सकाळी करिता पठण । होई रात्रीच्या पापांचे क्षालन । दोन्ही समयी जपता । पूर्ण पापनिवृत्ती होतसे ॥ नित्य अथर्वशीर्षाचे अध्ययन । विघ्नांचे करी दमन । धर्म अर्थ काम मोक्ष । चारही पुरुषार्थ लाभती ॥ हे अथर्वशीर्ष उपनिषद । न द्यावे शिष्या अपात्र । मोहे लोभे जरी घडेल । ते महापाप जाणावे ॥ अथर्वशीर्षाची सहस्त्रपठणे । करिता भावभक्तीने । इच्छिलेली सर्व कामे । अनायासे सफल होती ॥ अथर्वशीर्षाच्या नादे । गणपतीस अभिषेकिता । शुद्ध वाचेचा वक्ता । भक्त खचित होतसे ॥ चतुर्थीस उपवास करोनी । नित्य जपता भाव धरोनी । सकल विद्या साधती । हे तो अथर्वण वचन ॥ अथर्वशीर्षाचे ज्ञान । दूर करी मायेचे आवरण । भय चिंता नुरे जाण । स्थळी काळी कोणत्या ॥ दूर्वा अर्पण करिता यजने । अथर्वशीर्षाच्या नादासवे । कुबेरासम सर्वसंपन्न । भक्त खचित होतसे ॥ अथर्वशीर्षाच्या नादे । करिता लाह्यांचे हवन । यश आणि बुद्धी जाण । लाभे खचित भक्तासी ॥ तैसेची केले अर्पण । सहस्त्र मोदकांचे यजन । वांछिलेले फल पूर्ण । तत्काल प्राप्त होतसे ॥ तुपासह समिधांचे हवन । अथर्वशीर्षाचे उद्गायन । गणपतीकृपे सर्व लाभ । प्राप्त होतसे जाणा॥ अथर्वशीर्षाचे पूर्ण ज्ञान । आठ ब्राह्मणा देता शिकवण । सूर्यासम तेजोपुरुष । भक्त खचित होतसे ॥ सूर्यग्रहण पर्वकाली । किंवा महानद्यांच्या तीरी । स्तोत्र जपता मूर्तीसमोरी । मंत्रसिद्धी लाभेल ।। ऐसे करिता पूजन पठण । महाविघ्नांपासोनी मुक्त । महादोष महापाप । समूळ नाश पावती ॥ तया लाभे सर्वज्ञान । तया लाभे यथार्थ ज्ञान । हेची वेदवचन । त्रिकाळ सत्य जाणावे ॥ श्रीगणेशप्राप्तीचे बीज । हे अथर्वशीर्ष उपनिषद । इथे झाले संपन्न । श्रीगणपतीकृपेने ॥
                 देववाणीची सोनकळा । आणावी मराठी बोला । संकेत गणेशाचा । प्रसाद त्याचा गोड माना । भगवंत महागणपती रक्षावे उभयतांसी । मुद्गल यशवंतासी आणिक । अथर्वशीर्ष गात्यासी ॥ ज्ञान जे उभयतास लाभले । उपयोगी सिद्ध व्हावे । खांद्यासी खांदा लावोनी । पराक्रमा आम्ही करावे ॥ उभयतांचे अध्ययन । करो आम्हा तेजोमय । मनी परस्परांचा द्वेष । नुपजो कदा श्रीगणपते ॥ इहलोकी आवश्यक । संपत्ती सुख वीर्य । ज्ञान वैराग्य परमार्थ । लाभो आम्हा गणपते ॥ नुरावा दुजाभाव । सर्वत्र असो शांतिप्रेम । तंव भक्तीचा अखंड भाव । हेची वरदान द्यावे गणपते ॥
         देवा पवित्र ते श्रवणी पडावे । ईशा पवित्र ते नेत्री दिसावे । संतुष्ट ऐसी तनू उत्तमांगी । पूर्णायू ही ईशहेतू पडावी ॥
         महाकीर्तिमान इंद्रा आमुचे कल्याण होवो । सकलज्ञानवान पूषा आमुचे कल्याण होवो । अखंड चक्रगतिमान अरुणा आमुचे कल्याण होवो । देवगुरू बृहस्पती सकल श्रेयस आम्हास देवो ॥
           हेही पूर्ण तेही पूर्ण । पूर्णातुनी निघे पूर्ण । पूर्णासी मिळे पूर्ण । उरे तेही निखळ पूर्ण ॥
            ओम शांतिः शांतिः शांतिः ॥