मंत्रपुष्पांजली...३

'मंत्रपुष्पांजली'मध्ये 'कुबेर' आणि 'वैश्रवण' यांचा उल्लेख आलेला आहे. यांतील कुबेर हा पुलस्त्यपुत्र विश्रवा व इडविड यांचा पुत्र. रावण व कुंभकर्ण हे याचे सावत्र भाऊ. याचे पुत्र मणिग्रीव आणि नलकुबेर. हा उत्तर दिशेचा अधिपती असून यक्षांचा राजा आहे. मेरू पर्वताच्या उत्तरेला 'विभावरी' व कैलास पर्वतावर 'अलका' अशा याच्या दोन नगरी आहेत. ध्रुवाचे यक्षांशी युद्ध झाल्यावर कुबेर त्याला उपदेश करतो.  (२) चालू मन्वंतरातील पुलस्त्यपुत्र विश्रवा व भरद्वाज-कन्या देववर्णिनी यांचा हा पुत्र. यास रुद्रप्रसादाने लंकानगरी व पुष्पक विमान मिळाले होते. रावणाने लंका नगरी व पुष्पक विमान दोन्हीही कुबेराकडून हस्तगत केल्यावर हा कैलास पर्वतावर राहू लागला. याचा मंत्री प्रहास नांवाचा असून गौ, पुष्पर, शुक, प्रौष्ठपद इत्यादी त्याचे अनुचर होते. 
        [ कुबेराचा आजोबा पुलस्त्य ऋषी हा स्वायंभुव मन्वंतरात ब्रह्मदेवाच्या कर्णापासून उत्पन्न झालेला मानसपुत्र. कर्दम-कन्या हविर्भूती याची पत्नी. याला अगस्त्य आणि विश्रवा असे दोन पुत्र होते. (२) स्वायंभुव मन्वंतरात ब्रह्मदेवाने केलेल्या यज्ञात अग्रीच्या पिंगट केशांपासून उत्पन्न झाला. याच मन्वंतराच्या अकराव्या पर्ययाच्या सत्ययुगात हा मेरूपर्वताच्या पार्श्वभागी तप करीत असता तेथे गंधर्वकन्या येऊन गायन करीत. त्यामुळे याला त्रास होत असे. म्हणून याने असा शाप दिला की, जी कन्या माझ्यासमोर येईल ती गर्भवती होईल. हा शाप तृणविंदूची कन्या गौ हिला माहित नव्हती. ती याच्यापुढे आली व गर्भवती झाली. म्हणून राजाने ती कन्या पुलस्त्याला दिली. तिने याची उत्तम सेवा करून वेदाध्ययन केले, म्हणून तिला जो पुत्र झाला, त्याचे नांव विश्रवा असे ठेवले. ]

          'वैश्रवण' हे कुबेराचे दुसरे नांव. विश्रवाचा पुत्र म्हणून कुबेराला या नांवानेही ओळखले जाते. तो देवांचा निधिपती मानला जातो. लक्ष्मीबरोबरच्या विवाहासाठी याने विष्णूला दिलेले कर्ज अजून फिटलेले नाही, अशी आख्यायिका तिरुपती बालाजीच्या विषयी सांगितली जाते. कुबेराचे जे नवनिधी असल्याचे म्हणतात, ते असे : पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, नंद, नील आणि खर्व.
           एकंदरीत पाहाता मंत्रपुष्पांजली ही राष्ट्राच्या संपन्नतेसाठी केली गेलेली प्रार्थना असल्याचे दिसून येते. त्याचे (भाषांतर पुढील लेखात).
                                                                                                                                                              (क्रमशः)