मंत्रपुष्पांजली...४

॥ओम्॥
सारे बुद्धिमंत एकत्रित । वृंदासि त्या नाम यज्ञ ।
सारा समाज एक ईश । तोचि परमेष्ठी यज्ञपुरुष ॥
यज्ञाने यज्ञपुरुषाचे । यजन केले कल्पनेने ।
त्याग सामूहिक भावनेने । तोचि प्रथम धर्म जाहला॥
ऐसे काल्पनिक यजन । करणारे प्रजापति महान ।
लाभले तया सुलभ साधन । प्राप्त करण्या देवभुवन ॥
॥ओम्॥
वंदितो तुज राजाधिराजा । कृपावंता बलवंता ।
नित्य धर्मकार्याच्या काजा । धनसंपन्न करी आम्हा ॥
अधिन आम्ही कर्माच्या । लागती साधने नाना ।
परमेष्ठी कामेश्वरा । दातारा सदिच्छा पुरवी ॥
धनपति तूं कुबेर । सर्वसंपन्न तूं उदार ।
धनेश्वर तूं वैश्रवण । वंदन तुजला आमुचे ॥
॥ओम्॥
पृथ्वी ही विशाला । सागर तिच्या सीमेला ।
जनपदातुनि वेगळाल्या । समाजपुरुष विखुरला ॥
कुठे साम्राज्य कुठे भोज्य । कुठे स्वाराज्य कुठे वैराज्य ।
कुठे पारमेष्ठ्य कुठे राज्य । कुठे अधिपतिमय महाराज्य ॥
कुठे समंतपर्यायी राज्य । कुठे सार्वभौम लोकराज्य ।
खंडित जरि पृथ्वि वंद्य । नांदे आद्य विराट् पुरुष ॥
शतशतकोटि वर्षांचे । जीवित या पृथ्वीचे ।
युगायुगामागुनी युग सरे । असो जन सारे एकात्म ॥
तंव चरणी विनत । पुरवी अमुचे इच्छित ।
अखंड तंव कृपाछत्र । सर्व जना लाभो अव्याहत ॥
जीवन वर्षणारे मरुत् गण । पृथ्वीवरि तयांचे आवरण ।
अन्न ओषधींचे सृजन । तयांचे दान महान आम्हा ॥
हे महाराजाधिराजन् । इच्छितो आम्ही तुजकडोन ।
मरुत् गण हे तंव अधीन । ते संपन्न करोत घर अमुचे ॥
धर्म अर्थ कामाची । कामना याजक सभासदांची ।
तूं घनकारुण्यमूर्ती । सकल इच्छापूर्ती करी अमुची ॥
आम्हा जनांचे हे निवेदन । देई अमृताचे अमृतदान ।
लाभो साऱ्यांसि अविच्छिन्न । दीर्घायु सुमति कीर्ति उदार मन ॥
ओम् मनशांती असो  ॥ ओम् जनशांती असो ॥  ओम् विश्वशांती असो ॥