श्रीगणपती अथर्वशीर्ष..

र्रगणेशोत्सव सुरू आहे. १९८७ च्या गणेशोत्सवावेळी मुलाची मुंज झाली होती. आमच्या घरच्या प्रथेप्रमाणे त्याला श्रीगणपती अथर्वशीर्ष मला शिकवायचे होते. त्याला ते समजावे, या हेतुने त्या स्तोत्राचे मराठी रूपांतर केले होते. 'मनोगत'चा गणेशोत्सव परापूजेसह या मराठी अथर्वशीर्षाने साजरा करू या.

॥परापूजा॥
पूर्णाचे आवाहन कसले अन सर्वाधाराचे आसन ।
स्वच्छाचे पाद्य-अर्घ्य कसले शुद्धाचे आचमन ।
निर्मलाचे स्नान कसले अन विश्वोदराचे वसनही ।
विश्वाधाराचे जानवे कसले अन अगंधासी पुष्पे ती ।
निर्लेपाची कसली उटी सुरम्य त्याची आभरणेही ।
सदातृप्ताचा नैवेद्य कसला अन विडामुखशुद्धी ती ।
अनंताची प्रदक्षिणा कसली अन अद्व्याचा नमस्कार प्रभो ।
वेदांसी अगम्य त्याची स्तुतिस्तवने कसची ।
स्वयंप्रकाशमानाची नीरांजने कुठली विभो ।
अंतर्बाह्य पूर्ण जो त्याचे विसर्जन कसचे॥

ओम  देवा पवित्र ते श्रवणी पडावे । ईशा पवित्र ते नेत्री दिसावे ।
संतुष्ट ऐसी तनू उत्तमांगी । पूर्णायू ही ईशहेतू पडावी ॥
महाकीर्तीमान इंद्रा आमुचे कल्याण होवो ।
सकलज्ञानवान पूषा आमुचे कल्याण होवो ।
अखंडचक्रगतिमान अरुणा आमुचे कल्याण होवो।
देवगुरू बृहस्पती सकल श्रेयस आम्हास देवो ॥
हेही पूर्ण तेही पूर्ण पूर्णातुनी निघे पूर्ण ।
पूर्णासी मिळे पूर्ण उरे तेही निखळ पूर्ण ॥

ओम ॥ नमो तुज गणपते । प्रत्यक्ष तूं तत्त्व तें । कर्ता धर्ता हर्ता सारे । तूंच केवळ अससी रे ॥ तूंच सकल ब्रह्म खरोखर । तूंच साक्षात आत्मा निरंतर । नित्य वास्तव सत्य वदे मी । देवाधिदेवा श्री गणपते ॥ सांभाळी म्या भक्तासी । तैसाची बोलित्यासी । रक्षावे श्रोत्यासी । आणि ज्ञानदातारासी ॥ रक्षावे ज्ञानधारकासी । तैसेची वेदजाणत्यासी । रक्षरक्षावे शिष्यासी । कृपाळू श्रीगणपते॥ समोरूनी रक्षावे । मागोनी मज रक्षावे । उजवीकडोनी सांभाळावे । सांभाळी डावीकडोनी ॥ खालोनी मज रक्षावे । वरूनी मज रक्षावे । आसमंतातुनी मजवरी । नजर ठेवी श्रीगणपते ॥ वाणीमया चैतन्यरूपा । आनंदमया ब्रह्मरूपा । ज्ञानमया विज्ञानरूपा । अजोड सच्चिदानंदा श्रीगणपते ॥ तूंची प्रत्यक्ष ब्रह्म । तूंची विश्वजननलय । तूंची जगत अचळ । विश्वसाक्षात्कार तूंची तूं ॥ तूंची भूमी जळ । वायू तेज आकाश । पंचमहाभूते ही केवळ । तूंच महागणपते ॥ वैखरी मध्यमा पश्यंती परा । चारही वाणी तूंची खरा । सत्त्व रज तम त्रिगुणा । धारण केले परमेश्वरा ॥ जागृती स्वप्न सुषुप्ती । तीन अवस्थी तुझी प्राप्ती । स्थूल सूक्ष्म कारणादी । तिन्ही देह तूं गणपते ॥ भूत वर्तमान भविष्य । तुझिया ठायी स्थिर होय । तूं महाकालची प्रत्यक्ष । एकदंत श्रीगणपते ॥
मूलाधारी राहोनी नित्य । करिसी उत्पत्ती स्थिती लय । तुझेच नित्य ध्यानधारण । करिती योगी श्रीगणपते ।। तूं ब्रह्मा सृष्टिकर्ता । तूं विष्णू सृष्टिधर्ता । तूं रुद्रही सृष्टिहर्ता । त्रिभुवनपती इंद्र तूं ॥ हवी घेणारा अग्नी तूं । जीवांचा प्राणवायू तूं । सकलप्रकाशक सूर्य तूं । वनस्पतिसंजीवक चंद्र तूं ॥ तूं चराचरधारक धरणी । अंतरिक्ष तूं राखणी । तूं स्वर्ग मंगलमयी । केवळ ब्रह्म तूं गणपते ॥ श्रीगणेशविद्या ऐसी । सर्वतारक महासुखराशी । जाणता मोक्षप्राप्ती । सहजी होतसे ॥ गणातिल प्रथमाक्षर । उच्चारावे प्रथम । आदिअक्षर अकार । त्यात मेळवावा नंतर ॥ अनुस्वार त्यापरता । अर्धचंद्री मेळवावा । ओंकाराने युक्त करोनी । ओम गं उच्चरवे गावा ॥ चैतन्य संजीवक । विश्वारंभीचा गंभीर नाद । जपता साकारे मनुस्वरूप । आदिदेव श्रीगणपते ॥ किंवा गकार हे पूर्वरूप । अकार ते मध्यमरूप । अनुस्वार अंत्यरूप । बिंदू उत्तररूप जाणावे ॥ चार रूपे एकनादी । दीर्घस्वरे सांधावी । ओंकारासह संधी करावी । हीच ईश्वरी गणेशविद्या ॥ इयेचा ऋषी गणक स्मरावा । निचृद गायत्री छंद लक्षावा । देवता गणपती ध्यावा । ओम गं गणेश नमावा ॥ ओम गं गणेशास नमितो । एकदंतास जाणतो । वक्रतुंडास ध्याताना । देवो प्रेरणा तो श्रीदंती ॥ एकदंत चतुर्हस्त । पाश अंकुश दंतखंड । तीन हाती धरोनी । उजवा उभा वरदहस्त ॥ मूषक्ध्वज निर्भय देई । रक्तवर्ण लंबोदर अंगी । सुपासारिखे कान दोन्ही । वसन शोभे लाल रंगी ॥ अंगी रक्तचंदन लेपलेले । लाल फुलांनी पूजिलेले । अनुकंपेने ओथंबलेले । ध्यान तुझे गणपते ॥ अखिल जगताच्या संभवाचे  । आदिकारण तूं साचे । आदी अंती नित्य राहे । म्हणोनी तूं अच्युत ॥ सृष्टिपूर्वी प्रकट अससी । प्रकृतिपुरुषावेगळा अससी । अशा तुला जो नित्य ध्यायी ।  योगियांतही तो परमयोगी ॥ नमन विघ्नविनाशका । नमितो तुज शिवसुता । नमन हे वरदायका । त्रिवार मी वंदितो तुला ॥

           (पुढील फलप्राप्तीचे रूपांतर दुसऱ्या भागात)