मंत्रपुष्पांजली...२

भोज्य : ज्या राज्यात जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा-संरक्षण याची काळजी राजा घेत असे, ते भोज्य राज्य असे. वृद्ध, अपंग, असहाय्य अशा साऱ्यांची काळजी व्यवस्थित घेतली जात असे. अशा राज्याची उभारणी ही ऋषिंची इच्छा असे.

स्वाराज्य : अनेक जनपदातील जनतेने निवडलेल्या प्रतिनिधिद्वारे राज्यशासन चालविले जात असे. त्यासाठी राज्यसभा (मंत्री/दरबार) असे. सर्वांच्या संमतीने राज्य चालविले जाई.

वैराज्य : अशा व्यवस्थेत एक शासक नव्हता. प्रदेश लहान असे. त्यात सर्वजण एकत्र येऊन निर्णय घेत व कारभार पाहात. राज्याला राजा नसे तेव्हा अशी व्यवस्था असे. दुसऱ्या अर्थाने विशेष प्रकारे चालविलेला राज्यकारभार असाही निर्देश वैराज्य या शब्दाने होतो.

पारमेष्ठ्य _ परमेष्ठी म्हणजे प्रजापती. प्रजापालनाच्या श्रेष्ठ कार्यासाठी नेमलेला शासक. हा प्रजाजनांद्वारे नियुक्त होत असे.  तो जर कर्तव्यात कमी पडला तर त्याला तर प्रजानन पदभ्रष्ट करीत.

राज्य :  अशी व्यवस्था ज्यात प्रदेश ही राजाची वैयक्तिक मालमत्ता समजली जाई. तो स्वयंशासक असे. तो राजा स्वतःच्या कर्तृत्वाने प्रजाजनांना सुखी ठेवीत असे.

महाराज्य : मोठे राज्य. विलीन झालेल्या कोणत्याही राज्याची स्वतंत्र सत्ता शिल्लक राहात नसे.   (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील सहाशे संस्थाने विलीन करण्यात आली. संस्थानिकांचे शासनविषयक अधिकार संपविले गेले. अर्थात् भारत हे महाराज्य झाले. )

आधिपत्यमय : अधिकारी वर्गाद्वारे राज्यशासन चालविले जाई. यात प्रजेच्या मताल महत्त्व दिले जात नाही. तथापि, शासनकर्ता हा प्रजेच्या यथार्थ सुखासाठी झटत असे.

सामंतपर्यायी : एका राज्यातील अनेक छोट्या राज्यांची व्यवस्था मांडलिक (सामंत) राजाद्वारे पाहिली जात असे (संघराज्यात्मक व्यवस्था). यातही प्रजाजनांच्या मताला प्राधान्य नसायचे.

(याशिवाय जानराज्य - पंचायत व्यवस्था; विप्रराज्य - ब्राम्हण, धर्मगुरूंची सत्ता. याचाच अर्थ पुढे यज्ञ असाही झाला; समर्य राज्य - समर्य अर्थात् धनपती किंवा वैश्य, उच्च कुळात जन्मलेला, मोठे जमीनदार यांची सत्ता (सध्याचे निजीकरण? ); अधिराज्य - छोट्या छोट्या निर्बल राज्यांवर बलाढ्य शासक असणारी व्यवस्था. यात सत्तेचे तुकडे विखुरले जातात व प्रजाजनांच्या दुःखाला पारावार राहात नाही. )

            सत्तेमुळे मग्रुरी, घमेण्ड मूळ धरते व त्यातूनच पुढे युद्धे होत असतात. आदर्श सम्राटाविषयीच्या दोन ऋचा ऋग्वेदात आहेत :
        ता सम्राजा घृतासुती आदित्या दानुनस्पती । सचेते अनवह्वरम् ॥ - ते दोन्ही सम्राट दानुनस्पती म्हण्जे दानशूर आहेत आणि अननह्वरम् सचेते म्हणजे कुटिल व्यवहार करण्याऱ्यांबरोबर प्रसन्न राहात नाहीत. म्हणजेच ते दोन सम्राट सज्जनांचा आदर, सन्मान करतात, दान देतात, रक्षण करतात.
        ता सम्राजा घृतासुती यज्ञेयज्ञ उपस्तुता अथैनोः क्षत्रं न कुतश्चनाघृषे । देवत्वं नू चिद्राघृषे ॥ - त्या दोन्ही सम्राटांची प्रशंसा प्रत्येक यज्ञात (सुराज्यात) होते. त्यामुळे त्याचे क्षात्रबल किंचितही कमी होत नाही. त्यांचे देवत्व खरोखर सुस्थित राहाते. 
         यातूनच पुरुष (समाजरूपी व्यक्ती) कल्पना पुढे आली.