सप्त-व्याहृती...२.

     पहिले सहस्त्रक संपताना म्हणजे डिसेंबर नव्व्याण्णवच्या अखेरीस मी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मुंबई सोडून टिटवाळ्यात आलो. कांही महिन्यात मित्रमंडळी गोळा झाली आणि जोशी-कट्टा तयार झाला. कट्टयाने एक नाटक तयार केले. ते रंगमंचावर आणताना जोशी-कट्टयाचे नांव ज्येष्ठ-राज झाले. दोन हजार चारच्या मे महिन्यात कमीत कमी खर्चातली चार-धाम यात्रा ज्येष्ठ-राज ने केली. मित्रांमधले एक श्री. झाजम यांचा यात मोठा पुढाकार होता. माझी स्वतःची प्रकृती त्यावेळी बेभरवशाची होती. त्यामुळे मनात काचकुच होत होती, त्याचबरोबर मित्रांचा आग्रह आणि त्यांनी दिलेली उमेद  यांच्या जोरावर मी सामील झालो होतो. हिमालयाचे आकर्षण मनात पहिल्यापासून होतेच. हरिद्वार सोडून ऋषिकेशला पोहोचलो की, हिमालयाची साथ सुरू होते.
      हरिद्वारला आम्ही एकत्तीस जण होतो. तेथे पुढील प्रवासासाठी बस ठरवली ती मोठी होती. रिकाम्या जागांवर, पांच जण अलाहाबादचे, तीन जण कोलकोत्याचे आणि तीन जण डोंबिवलीचे होते, ते आमच्यात सामील झाले. प्रथम यमनोत्रीला जायचे ठरले होते. संध्याकाळी अंधार पडू लागला, तेव्हा ब्रह्मखालला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लौकरच पुढील प्रवासास सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास गाडीच्या पुढील कांचेतून एका बर्फाच्छादित शिखराचे दर्शन घडले. तिकडे सर्वांचे लक्ष वेधले. हिमाच्छादित शिखराचे ते प्रथम दर्शन झाल्याचा आनंद शब्दातीत होता. 

      त्या शिखरावरून नजर हटेना. गाडीच्या उजवी-डावीकडे वळण्यामुळे ते शिखर कधी नजरेआड होई तर कांही क्षणात पुन्हा समोर दिसे. हनुमानचट्टी येईपर्यंत ही मजा आम्ही लुटत होतो. डोंगरांच्या रांगा एकामागोमग एक समोर दिसत होत्या.
 इथे पुन्हा एकदा सप्तव्याहृती मनाच्या पटलावर अचानक अवतरल्या. आमच्याबरोबर त्यावेळी डॉ. रामपूरकर होते. ते कीर्तनकार आहेत. त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांचे लक्ष समोर दिसणाऱ्या त्या पर्वत-रांगांकडे वेधले. उंचीनुसार एकामागोमाग एक हिरवट-निळसर रंगाच्या छटा लेऊन त्या सात रांगा शेवटी हिमाच्छादित शिखरांच्या रांगेत संपत होत्या. डॉक्टरांना विचारले, ’वेद हिमालयाच्या कुशीत जन्मले असावेत असे मला, कां कुणास ठाऊक, वाटत राहते. विश्वामित्रांनी तपःश्चर्येवेळी या डोंगर-रांगांमागील हिमाच्छादित शिखरांवरून वर येणारा शेंदरी रंगाचा सूर्य पाहिला असेल. त्याचे वर्णन करण्यासाठी या सात रांगांचा संदर्भ घेत त्यांनी गायत्रीमंत्र बांधला असेल कां हो डॉक्टर? ’ डॉक्टर हंसले, म्हणाले, ’असेलही कदाचित... या रांगांकडे पाहात असताना मन अचंबित, विशाल होत जाते, हे मात्र खरे!

      ’माणूस जेव्हा स्वतःला लहान समजू लागतो तेव्हा, त्या माणसाचे मन विशाल होत असल्याचे ते लक्षण असते... ’ झाजमांनी शेरा मारला आणि माझ्याकडे पाहात डोळा मारला!!
             ***