सप्त-व्याहृती...३.

 (पद्मभूषण) पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकरजी, साहित्यवाचस्पती यांनी वेदांवर केलेले चिंतन विचार करावयास लावते. त्यांच्या स्वाध्याय-मंडळ, पारडी (जि. सुरत) या संस्थेने पंडितजींच्या लिखाणांचे/प्रवचनांचे प्रकाशन केलेले आहे. त्यातीलच एक व्याख्यान, जे सप्त व्याहृती या विषयावर आहे, वाचनात आले. त्यांनी वेगवेगळ्या मंत्रांचा संदर्भ घेत सप्त व्याहृतींचे फार सुंदर विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचा एक आलेख त्यांनी तयार केला आहे. त्यांच्या विवेचनाचे आपण थोडे अवलोकन करण्याचा प्रयत्न करू.
 व्याहृती हे पद वि+आ+हृ या धातूतील व्याहृ म्हणजे बोलणे, सांगणे, घोषणा करणे, जाहीरपणे सांगणे, गुप्त संकेताची भाषा सूचित करणे, प्रश्नाचे उत्तर देणे, समज देणे असा असल्याचे पंडित सांगतात. म्हणून व्याहृतीचा अर्थ कथन, भाषण, संकेताचा वा गुप्त शब्द, गूढार्थाचा शब्द असा होतो. भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम या पदांतून मनुष्यास दक्ष, सावध राहाण्यासाठी सूचना केली गेली आहे, असे पंडितजी सांगतात. यांतील पहिल्या तीन या महाव्याहृती आहेत.
भूः  या क्रियापदाचे अर्थ : होणे, जन्मणे, उत्पन्न करणे नि उत्पन्न होणे, जिवंत राहणे, अस्तित्वात येणे, (प्राणयुक्त) होणे, (श्वास) घेत राहणे, कामी आणणे, शक्य होणे, (संचालक) होणे, (सहायक) होणे, व्यवहार करणे, (अभ्युदयुक्त) होणे, (यशस्वी) होणे, (नाम असेल तर) जमीन आदी.
                       भू या क्रियापदाचे प्रयोग अनेक मंत्रात केलेले असले तरी भूः या पदाचा वापर ऋग्वेदात वेगवेगळ्या मंडलातील सोळा मंत्रातून केलेला आहे.  
                       {मा पणिर्भूः । (१. ३३. ३), ऋष्ववीरस्य बृहतः पतिर्भूः ।(१. ५२. १३), क्रतुभिः सुक्रतुर्भूः । दक्षैः सुदक्षः ।(१. ९१. २), त्वं त्राता.... वृधे भूः । (१. १७८. ५). मनवे शास्यौ भूः ।(१. १८९. ७),  त्वं त्राता तरणे चेत्यो भूः ।(६. १. ५),    त्वं दशस्यावृको वृधो भूः ।(६. १५. ३), त्वं वृध इंद्र पूर्व्यो भूः ।(६. २०. ११), सखा विश्वायुरविता वृधे भूः ।(६. ३३. ४), मंहना दर्शता भूः  ।(६. ५४. ५), शिवो भूः ।(७. १९. १०), अभी क्रत्वेंद्र भूः ।(७. २१. ६),   माकिर्देवानामप भूः ।(१०. ११. ९), प्रभूः जयंतं (१०. ४६. ५), भूर्जज्ञाः।(१०. ७२. ४), आतो भूः (१०. १४९. २)}    
                - या मंत्रांचा अर्थ पाहूं गेल्यास त्यांतून मानवास कांही विशिष्ट आदेशवत सूचना केलेल्या आहेत किंवा गुणानुवर्णन केले आहे, असे दिसून येते. या सूचना कोणत्या, तर तूं कृपण होऊं नकोस, तूं या संपूर्ण विश्वाचा अधिपती हो, तूं आपल्या शुभ कर्मांनी कर्तृत्ववान नि बलाने बलवान झाला आहेस, तूं आमचा संरक्षक नि उत्कर्ष करणारा आहेस, तूं मानवाला सुशिक्षण देतोस, तूं सर्वांचा तारक नि उत्साह वाढविणारा आहेस, तूं बल वाढविणारा आहेस, तूं सर्वांचा मित्र, संरक्षक, पूर्णायू नि उत्कर्षकर्ता आहेस, तूं धनदाता नि दिसण्यात मनोहर आहेस, तूं कल्याणकर्ता आहेस, तूं शत्रुंजय आहेस, येथून देव दूर होऊं नयेत असे कर, तूं विजयी नि सर्वांवर प्रभाव पाडणारा हो, भूमी उत्पन्न झाली, हिच्यापासून भूमी उत्पन्न झाली. यांतून भूः या पदाचा उपयोग अस्तित्व दाखविण्यासाठी तर आहेच, तो सर्वत्र उत्कर्ष, वृद्धी, अभ्युदय, तरण, बल, अधिपत्य आदी श्रेष्ठ शुभगुणांचे साहचर्य दाखविण्यासाठीही केलेला आहे. त्यात अधःपाताची सूचना नाही. ’मी कःपदार्थ, हीन, दीन, तुच्छ, क्षणभंगुर, नाशवंत आहे’, असा भाव येथे नाही. उलट येथील अस्तित्व तारक, दुःखनाशक,   उद्धारक, धनधान्य-बल वर्धक, प्रभुत्वस्थापक, विजयी अस्तित्व आहे. पंडितजी पुढे भाष्य करतात की, अस्तित्व हेच सर्व व्यवहाराचा मूळ आधार आहे. आम्ही सर्वांआधी आपल्या अस्तित्वाची सुरक्षितता राखली पाहिजे. अस्तित्व नसेल तर सारेच शून्यवत होते. वेद  शून्यवादाचे प्रतिपादन करीत नाही, तो प्रभुत्ववादाचे प्रतिपादन करणारा आहे. जर कुणी शत्रू आमच्या अस्तित्वावरच आक्रमण करेल,   तर आम्ही त्याला  नष्ट भ्रष्ट करणे, हे आमचे अवश्य कर्तव्य असले पाहिजे. म्हणून या सात सांकेतिक शब्दातील पहिला शब्द भूः असा आदेश देतो की, तुमचे अस्तित्व चिरस्थायी असू देत.
 पंडितजी पुढे सांगतात की, निरनिराळ्या उपनिषदांतून भूःविषयीची वचने पाहिल्यास भूः चे वेगवेगळे अर्थ समोर येतात, जसे भूः हाच - अग्नी, नारायण, ऋग्वेदमंत्र, प्राण, सर्वांचा आधारभूत पाया, सर्वांचा आदी, आत्मारूपी पुरुषाचे शिर, स्वाहाकारासाठी मंत्र, ऋग्वेदमंत्रांचे सार - आहे. पुढे ते सांगतात, या अर्थांच्या अनुरोधाने असे म्हणता येते की, भूः हे पद शुभ कर्मांचे अनुष्ठान सुचविणारे असून हे अनुष्ठान मानवाचे अस्तित्व अबाधित राहाण्यासाठी आचरायचे असते व अशा प्रकारे भूः चा मूळ अर्थ अस्तित्व असून बाकी सर्व अर्थ त्याचे सहायक आहेत. मनुष्याने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न केला पाहिने, हे त्याचे तात्पर्य आहे.
                                                                                                                                                                                                            ***