सप्त-व्याहृती...५.

सप्त व्याहृती:५
स्वः  ही तिसरी महाव्याहृती. स्वयंमधला स्व हा शुद्ध अहंकाराचा बोधक आहे, असे म्हणता येते. स्वः मधल्या विसर्गाचा ‘र’ होतो. स्वयं राजते इति स्वरः, अर्थात जो स्वतः राहतो, प्रकाशतो, प्रदीप्त राहतो, स्वशक्तीने राहतो, जो स्वसामर्थ्याने प्रकाशून दुसऱ्याच्या साहाय्याशिवाय आजूबाजूला प्रकाश पसरवितो, तो स्वर. म्हणून प्रथम अस्तित्व, मग ज्ञानपूर्वक शुभ कर्म व त्यानंतरची ही तिसरी व्याहृती स्वः जी आत्मसामर्थ्याचा बोध करून देणारी आहे. माणसाचे जीवन कृतार्थ होण्यासाठी त्याच्या आत्मशक्तीचा प्रकाश चोहीकडे पसरला पाहिजे. वर्णमालेतील स्वराचे एक वैशिष्ट्य आहे. तो कितीही लांबवला, तरी त्याच्या मूळ उच्चारात बदल होत नाही. 'अ' चा उच्चार कितीही लांबवा, तो अऽऽऽऽच राहातो. तो अखंड राहतो. अखंड प्रकाश, वैभव, प्रगती, ज्ञान प्राप्त झाल्यावर माणूस आनंदी राहतो. तो इतरांना प्रत्यक्षतः वा अप्रत्यक्षतः दिव्य संदेश देणारा असतो. उपनिषदातून आलेले स्वः चे वर्णन पाहाता स्व, स्वर, सुवर ही पदे एकच असल्याचे दिसते. (स्वः प्रपद्येऽमुना - ज्ञानपूर्वक कर्माने मी स्वर प्राप्त करतो, स्वरिती सामभ्यः - सामगानाने स्वर प्राप्त होतो, स्वरिती प्रविष्ठा - स्वः हा सर्वांचा आधार आहे, सुवरित्यसौ लोकः - सुवः यानंतर वरचा लोक  आहे, सुवरित्यादित्यः - जेथे सूर्य आहे तेथे स्वः आहे, सुवरिती यजूंषी - यजुर्वेदही सूर्यच आहे, सुवरिती व्यानः - व्यान नावाचा प्राणच स्वः आहे, देवान सुवर्यतः - देव स्वराला प्राप्त होतात, स्वरिती अस्याः शिरः - गायत्रीचे शिर स्वः आहे, आदी) स्वः चे उपनिषदांतील वर्णन पाहाता ही महाव्याहृती भूः तसेच भुवः पेक्षा उच्चतर आहे, श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते. या  तीन महाव्याहृतींतून होणारे तीन बोध असे :
 १) आपले अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,
 २) ज्ञान प्राप्त करून अभ्युदयासाठी शुभकर्मे केली पाहिजेत,
 ३) आत्मप्रकाश सर्वत्र पसरून त्याच्या शक्तीने सर्वांना प्रकाशित नि आनंदपूर्ण केले पाहिजे.
 पंडितजी पुढे उल्लेख करतात की वरील कर्तव्ये जशी व्यक्तिगत आहेत, तशीच ती सार्वजनिक, राष्ट्रीयही आहेत. अर्थात,
 १) आपले राष्ट्रीय अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी अवश्य कर्तव्य केले पाहिजे,
 २) सर्व राष्ट्रभर सर्वत्र ज्ञानप्रसार करून राष्ट्रीय अभ्युदयासाठी आवश्यक शुभ कर्मे केली पाहिजेत.  
 ३) आपले राष्ट्रतेज सर्वत्र पसरून सर्वांना आनंदित, प्रसन्न राहाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी झटले पाहिजे.
 भूः, भुवः, स्वः या तीनही महाव्याहृती ज्या मंत्रात एकत्र आल्या आहेत, त्या मंत्रांतील विचार पंडितजी समजावितात -
 भूर्भुवःस्वः सुप्रजाः प्रजाभिः स्यां सुवीरो वीरैः सुपोषः पोषैः ।
 नर्यं प्रजा मे पाही, शंस्य पशून मे पाही अथर्वं पितुं मे पाही ॥(वा. य. ३. ३७)
 - अस्तित्व, ज्ञान, आत्मप्रकाश असो. उत्तम प्रजेने प्रजावान व्हावे, उत्तम वीरांहून वीर व्हावे, उत्तम पोषणाने हृष्टपुष्ट व्हावे, अनुयायांचे हितकर्त्या नेत्या! माझ्या प्रजेचे रक्षण कर, स्तुत्य नेत्या! माझ्या पशूंचे रक्षण कर, हे सुस्थिर नेत्या! माझ्या अन्नाचे ( धनधान्याचे) रक्षण कर.
 भूर्भुवःस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमही धीमही धियो यो नः प्रचोदयात ।(वा. य. ३६. ३)
 - अस्तित्व, ज्ञान, आत्मप्रकाश असो. मी त्या सर्व विश्वाच्या उत्पन्नकर्त्या परमात्मा देवाच्या श्रेष्ठ ज्योतीचे ध्यान करीत आहे. त्याच्यापासून आम्हां सर्वांच्या बुद्धीला शुभ प्रेरणा मिळो.
 या तीन महाव्याहृतींचा विचार उपनिषदांतून वेगवेगळ्या अंगांनी केला गेलेला दिसतो. त्याविषयींची कांही वचने पंडितजी उद्धृत करतात : भूर्भुवः स्वः सर्वं त्वयी दधामी (भूः भुवः स्वः यांपासून जो होतो तो मी तुझ्यासाठी समर्पण करतो), भूर्भुवः स्वरोम (भूः भुवः स्वः हे ओंकारस्वरूप आहेत), भूर्भुवः स्वरन्नम (भूः भुवः स्वः अन्न आहे), भूर्भुवः स्वर्ब्रह्म (भूः भुवः स्वः ब्रह्म आहे) वगैरे. या वचनांतून भूः भुवः स्वः या तीन महाव्याहृती अन्नस्वरूप, ब्रह्मस्वरूप, अनुक्रमे पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग स्वरूप, अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद स्वरूप, प्रजापती परमात्म्याची स्थूल तनू, अनुक्रमे सूर्य, चंद्र, अग्नी स्वरूप, अनुक्रमे (विश्वदेहाचे) पाय, जानू, कटी स्वरूप, प्रत्यक्ष विराट देह स्वरूप, अनुक्रमे आदी, मध्य, शिर स्वरूप, असल्याचे वर्णन करून उपनिषदांनी या महाव्याहृती विश्वस्वरूप असल्याचे सांगितले आहे. पृथ्वीचा अर्थ घेतला की, त्यात जल, अग्नी, वनस्पती, भूमी आदी सर्व पदार्थ आले. अंतरीक्षामध्ये वायू, मेघ, विद्युत आदी आले व द्यूलोकात सूर्य, चंद्र, तारांगण आदी सर्व आले. अर्थात या भूः भुवः स्वः मध्ये विश्वातील सर्व सामावले जाते, कांही राहात नाही. मनुष्याचे अस्तित्व या पदार्थांवर अवलंबून आहे. मनुष्याचे ज्ञान याच विषयासंबंधाने आहे आणि या ज्ञानाधारेच कर्म घडते, अभ्युदयही साधता येतो. नारायण ही देवता जीवाचे अस्तित्व आणि पोषण जपणारी आहे. भूः भुवः स्वः म्हणजे नारायण हे तात्पर्य पंडितजी दाखवितात.
                                                                                                                                                                                                ***