सप्त-व्याहृती...१.

आम्हां भारतीयांच्याबाबत पूर्वापार एक गोष्ट मनावर बिंबवली जात असते. काय म्हणे तर, या भारतभूमीत जन्म लाभण्यासाठी जन्मोजन्मींचे पुण्य गांठी असावे लागते. यावर श्रद्धा ठेवणारी जी पिढी होती, त्या पिढीतील माझे काका होते. गळ्यात जानवे नसले, तर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. घरात कांदा दिसला तरी मग माझ्या आई-वडिलांचा उद्धार होत असे. एक बरे होते, नोकरीनिमित्ताने मी बहुधा दूर असे. त्यामुळे काकांची नि माझी तोंडा-तोंडी क्वचितच होई. तरीपण या काकांबद्दल आम्हां भावंडांच्या मनात एक प्रकारचा धाकयुक्त आदर नेहमीच राहिला. त्यांची साधना, त्यांची जीवनाविषयीची तत्त्वे निदान मला तरी विचार करायला लावीत.

माझी मुंज माझ्या वयाच्या सातव्या वर्षीच झाली. मुंज झाल्यानंतर संध्येची संथा काकांनीच दिली. संध्येतील गायत्री-मंत्र म्हणजे 'हृदयासाठी अमृत' असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्याचा अर्थ कळण्याचे त्यावेळी माझे वय नव्हते, हे खरे. पण, ते शब्द मात्र मनात कोरले गेले.

 ’भू’ शब्दाची पहिली ओळख करून दिली जाते, ती बालकाला एका अंगावर वळताही येत नसते, त्या वयात. पुढे ’भू’ म्हणजे कुत्रे हे कळू लागते. गायत्रीमंत्राची सुरुवात या ’भू’ उच्चाराने होते, ते पाहून या मंत्राचा आणि त्या भू-चा संबंध काय? हा प्रश्न मनात डोकवायचा. कुणाला विचारायची सोय नव्हती; मुकाटपणे जसे सांगितले ते म्हणावे-करावे लागे. पण, पुढे माध्यमिक शाळेत गेल्यावर या ’भू’ला दुसराही अर्थ असतो, हे कळले. मग ’भू’ म्हणजे कुत्रे हा अर्थ मनातून जाऊन ’भू’ म्हणजे जमीन हा अर्थ मनात ठाम झाला. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी गायत्रीमंत्रातल्या ’भूर्भुवःस्वः’ विषयी विचारले तेव्हा तिने मला भूः, भुवः, स्वः यांना व्याहृती म्हणतात, असे सांगितले. मग व्याहृती म्हणजे काय, मी विचारले, तेव्हा तिने पृथ्वी म्हणजे भू, हवा म्हणजे भुवः आणि स्वः म्हणजे हवेच्यावरची पोकळी असे समजाविले. गायत्रीमंत्राचा अर्थ तेव्हा आईकडून मला समजला. सूर्य आकाशात अशा ठिकाणी असतो की, तो खाली पृथ्वीवर, पृथ्वीच्या अंवतीभंवती नि त्यावर असलेल्या आकाशाला आणि आकाशाच्यावर असलेल्या पोकळीलाही सारखाच प्रकाश देत असतो. त्याने आमच्या मनातही प्रकाश द्यावा, आमची बुद्धी प्रकाशित करावी, अशी प्रार्थना गायत्रीमंत्र म्हणून आपण करीत असतो, हे आईने मला त्यावेळी समजाविले होते. त्यानंतर गायत्रीमंत्र म्हणताना सूर्य माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागला.

नोकरी निमित्ताने मला आई-वडिलांपासून दूर राहावे लागले. एकटा राहात असताना वाचन हा एक विरंगुळा होता. मुंबईत आल्यानंतर कार्यालयातील वाते नांवाच्या सहकाऱ्याची ओळख झाली. ते नागपूरचे. योगासनांचा अभ्यास ते करीत. त्यांच्याशी बोलताना गायत्रीमंत्राचा एकदा विषय निघाला. त्यांच्याकडून बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यातील एक अशी की, जर्मनीमध्ये एक संशोधन हाती घेतले गेले होते. जगभरातील निरनिराळ्या धार्मिक ग्रंथांतून निर्देशित असलेल्या वेगवेगळ्या मंत्रांचा अभ्यास केला गेला. त्यातून हे पाहाण्यात आले की, प्रत्येक मंत्राची कंपनक्षमता वेगवेगळी असून गायत्रीमंत्राची कंपनक्षमता इतर मंत्रांच्या कंपनक्षमतेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. याचाच अर्थ असा होतो की गायत्रीमंत्र जपताना जी कंपने निर्माण होतात, त्यांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम हा अनेक पटींने जास्त असतो.

पंच्याहत्तर साली विवाह झाला. वर्षभरात मुलीचा जन्म झाला. अठ्ठ्याहत्तर साली पत्नीने बी. एड्. ला प्रवेश घेतला. सोयीसाठी मुलीला सासऱ्यांकडे पुण्याला ठेवावे लागले. पत्नीचे कॉलेज सकाळीच असे. ती गेल्यानंतर माझा वेळ रिकामा असे. मग मी व्हरांड्यात उभा राहून उगवता सूर्य पाहात असे. त्यावेळी मनात आले की, गायत्रीमंत्राचा जप सुरू करावा. त्याप्रमाणे सुरुवात केली. जसजसे दिवस उलटू लागले तसा मला अधिकाधिक रस मिळू लागला. फार वेगळ्या प्रकारचे अनुभव येऊ लागले. वेळेचे भान राहीना. मग मात्र जप बंद केला. यातून एक खातरजमा  मात्र झाली की, गायत्रीमंत्रात विलक्षण बळ आहे.

श्री. वाते यांच्या संगतीचा आणखी एक परिणाम म्हणजे अध्यात्मातला माझा प्रवेश. त्यांच्याशी बोलत असताना गायत्रीमंत्रात येणाऱ्या तीन व्याहृतींशिवाय अजून चार व्याहृती असतात आणि त्या म्हणजे महः, जनः, तपः व सत्यम हे समजले. या व्याहृती जशा अवकाशात पसरलेल्या आहेत, त्या तशाच माणसाच्या अंतःकरणातही असतात. त्याच आधारावर मानवी शरीरात सात चक्रांची संकल्पना केलेली असून त्यावर आधारित योगसाधना मानवी मनाला अत्युच्च अवस्थेचा लाभ करून देते, हे वाते यांनी एकदा सांगितले होते. अधिक खोलात जाऊन मी याविषयी समजावून घेण्याच्या भानगडीत तेव्हा पडलो नाही. हो, जाता जाता एक गोष्ट सांगायला हवी. श्री. वाते एकदा म्हणाले होते, ’तुम्ही रोज संध्या केली नाही तरी चालेल, पण कुठेही असा, सूर्याला अर्घ्य मात्र दिवसातून तीन वेळा जरूर देत जा. अर्घ्य म्हणजे ते हातात पाणी घ्यायचे, गायत्रीमंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडायचे नाही, तर ते पाणी आपल्या डोळ्यांवर मारायचे. आपल्या शरीरात सूर्याचे स्थान आपले डोळे आहे. आकाशातल्या सूर्यावर असुर हल्ला करीत असतील, तर त्या सूर्याची काळजी घ्यायला मानव असमर्थ आहे. पण, जो सूर्य आपल्या शरीरात आहे, त्याला हवेतील प्रदूषण, अदृश्य जीवजंतू, प्रखर प्रकाश अशा कारणांमुळे ताप होत असतो. डोळ्यांवर वरचेवर पाणी मारल्याने डोळ्यांना होणारा त्रास मात्र वाचतो आणि हे आजच्या विज्ञानाला ही मान्य आहेच ना! ’ मला त्यांचे म्हणणे पटले, हे निराळे सांगावयास नको.
                                                                                                                                                                                                   (क्रमशः)