सप्त-व्याहृती...७ (अंतिम).

सप्त व्याहृती: ७ (अंतिम)
तपः      सात व्याहृतींपैकी ही सहावी. तपः किंवा तपस् हे पद तप या क्रियापदापासून झालेले असून या क्रियापदाचा अर्थ प्रकाशणे, तेजस्वी होणे, उष्णता देणे, दुःख सहन करणे, शरीराला ताप देणे, जळणे असा होतो. म्हणून तपः या पदाने दुःख सहन करण्याची शक्ती, तप, धार्मिक तपस्या, ध्यान, नीतीधर्माचे आचरण, व्रत, यम-नियम इत्यादी अर्थ होतात. कष्ट सहन करून शुभ कर्मे करणे, हेच तप असते. मनुष्याने शीतोष्ण, सुख-दुःख, हानी-लाभ, भोजन मिळणे-न मिळणे आदी कष्ट सहन करण्याची शक्ती मिळवली पाहिजे. ज्ञान मिळवणे, अध्यापन करणे, राष्ट्रसंरक्षण किंवा राष्ट्रसेवा करणे, शेती, व्यापार वगैरे करताना अशा प्रकारच्या कष्टांचा सामना करावा लागतो, हे आपण जाणतोच. हे कष्ट सोसून जो समर्थपणे पुढे जातो, तोच जीवनात यशस्वी ठरत असतो. उपनिषदांमध्ये तपः या विषयावर अनेक वचने दिलेली आढळतात. तपो दानम् (छां. उ. ) : दान हेच तप आहे, तपसा प्राप्यते सत्वम् (मैत्री. ) : तपानेच सत्त्व प्राप्त होते, तपसा चीयते ब्रह्म (मुण्ड. ) : तपानेच ब्रह्मप्रकाश लाभतो, बलेन तपः तपसा श्रद्धा (महानारा. ) : तपाने बल प्राप्त होते, तपानेच श्रद्धा वाढते, शारीरं तपः । वाङ्मयं तपः । तपो मानसं । (गी. ) : शरीर, वाणी आणि मनाने तप केले पाहिजे, यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत (गी. ) : यज्ञ, दान, तप, कर्म सोडूं नये, स तपो लोकं जयति (नृ. पु. ) : तपानेच त्याने लोक जिंकले, आदी कांही वचने तपः चे स्वरूप दाखवितात. ऋग्वेदामधील तपसा ये अनाधृष्याः तपसा ये स्वर्युयुः (१०. १५४. २) : तपाने विजयी झाले, त्यांनी स्वर्ग प्राप्त करून घेतला, किंवा, त्वं तपः परितप्याजयः स्वः (१०. १६७. १) : तूं तपाने स्वतेज वाढवून स्वर्ग मिळविला आहेस, किंवा तपसा युजा विजही शत्रून् (१०. ८३) : तपाने आमचे शत्रू दूर कर, अशा वचनातून तपःच्या अर्थावर प्रकाश पडतो.

     पंडितजी असे दाखले देऊन उपदेशितात की, परिश्रम करण्याच्या वृत्तीनेच सर्व श्रेष्ठ कर्म सफल होत असते. जे तपाने साध्य होत नाही, असे कोणतेही प्राप्तव्य नाही. विश्वनिर्मितीसाठी ईश्वरानेही तप केले होते, त्यामुळे त्याला विश्व निर्मिता आले. मनुष्याचा सर्व अभुदय, निःश्रेयस् तपानेच साध्य होतो. विद्या, ज्ञान, बल, ऐश्वर्य, सामर्थ्य, प्रभाव, सुख, आनंद सर्व कांही तपाने साध्य होते.
 तप या शब्दातील ’त’ अक्षराचा अर्थ पाहाता नौका, पुण्य, अमृत, रत्न, बुद्ध असे कांही अर्थ कोषात दिसतात, तर 'प’ अक्षराने पिणारा, जसे पादप (वृक्ष), किंवा पालक, रक्षक (नृप) असे अर्थ दिसतात. समन्वयाने, तप या शब्दाद्वारे असा निर्देश होतो की शुभ कर्मांद्वारे प्राप्त पुण्ण्याने हा भवसागर तरून जाणारी नौका प्राप्त करून घेण्याची, अमृतप्राशनाचा लाभ करून देणारी तसेच जनपालन-रक्षणाचे महत्कार्य करण्यासाठी तपः ही एक साधना आहे.

सत्यं :      ही अंतिम व्याहृती. ’भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः’ या सांकेतिक शब्दांतून मानवाच्या व्यक्तिमत्व विकासाचे आलेखन सांगून आता सत्य या पदाने कोणता संकेत वेद देतात, ते पाहूं.
      सत्य या पदाने शाश्वततेचा बोध होतो. व्यवहारात सत्य म्हणजे सचोटी. वेदांमधील या विषयीची वचने अशी आहेत : ब्रह्मणो नाम सत्यमिति (छां. ८. ३. ४)- सत्य हेच ब्रम्हाचे नांव आहे, सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म (तै. २. १. १)- सत्य ज्ञानमय अनंत ब्रह्म आहे, सत्यमेव जयते नानृतम् (मुण्ड. ३. १. ५)- सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही, सत्यं सर्व प्रतिष्ठितं (महाना. )- सारे सत्यातच प्रतिष्ठित आहे, सत्यं वद धर्मं चर (तै. १. ११. १) - खरे बोला, धर्माने वागा, वगैरे.
     व्यवहारामध्ये लोभ हा सत्याचा अपलाप करण्यास कारण होत असतो. अध्यात्मामध्येही लोभ हाच वासनेला कारणीभूत होतो. शास्त्र सांगते की, अतृप्त वासनेतून जीव जनन-मरणाच्या चक्रात अडकला जात असतो. म्हणून लोभ सोडणे हे सत्याच्या आश्रयाला जाण्यासाठी आवश्यक ठरते. वासनांचा क्षय व्हावा, यासाठी संसारातून निवृत्त होऊन निरिच्छ मनाने वानप्रस्थाश्रमाचा पर्याय शास्त्राने सुचविलेला आहे.
     वानप्रस्थाश्रमात लौकिक व्यवहार थांबवून अंतिम सत्याचा शोध घ्यावयाचा, ज्ञानाद्वारे ब्रह्म जाणून घ्यायचे. ते साधले की जीवाला शाश्वततेचा लाभ होतो, सत्याचा लाभ होऊन चतुर्थ पुरुषार्थ म्हणजे मोक्ष हाही साधतो.
     या व्याहृती किंवा सांकेतिक पदांबाबत एक गोष्ट लक्षात येते. ती अशी की, जसे वेदांतील ऋचांना कोणा तरी ऋषींच्या नांवे जोडले गेले आहे, तसे या पदांबाबत म्हणता येत नाही. इतर मंत्रांबरोबर यांतील पहिल्या तीन किंवा एक-एक व्याहृती साधारणपणे जोडलेली दिसते. सूर्याचा गायत्री मंत्र म्हणताना विश्वामित्र ऋषींचा नामोच्चार केला जातो व 'ओम भूः भुवः स्व’ ने सुरुवात केली जाते. तसेच, हवनाचे मंत्र म्हणताना शेवटी ’स्वाहा’ म्हटले जाते. या सुरुवातीच्या व शेवटच्या पदांना संपुट म्हणता येईल.
      तैतिरीय उपनिषदातील तिसऱ्या वल्लीचा पांचवा अनुवाक (अध्याय) या व्याहृतींविषयी काय सांगतो, ते पाहाण्यासारखे आहे. भूः, भुवः व स्वः या तीन व्याहृती असून महाचमस् ऋषींचे पुत्र (वा शिष्य) याने चौथी व्याहृती महः ही प्रथम जाणली, तीच आत्मा होय, तीच ब्रम्ह होय. हे उपनिषद पुढे भूर्भुवःस्वःमहः या व्याहृतींची चार रूपे सांगते - 
     १) भूर्भुवःस्वः ही अनुक्रमे पृथिवी, अंतरिक्ष व स्वर्ग असून समस्त लोक महिमान्वित करणारा आदित्य अर्थात् सूर्यच  चौथी व्याहृती महः आहे.
    २) भूर्भुवःस्वः ही अनुक्रमे अग्नी, वायू, आदित्य व चंद्रमा (तो सर्व नक्षत्रांना उजळवितो) ही चौथी व्याहृती महः आहे.
   ३) भूर्भुवःस्वः ही अनुक्रमे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद असून ब्रह्म (सर्व वेदांना महिमान्वित करणारे) ही चौथी व्याहृती आहे.
   ४) भूर्भुवःस्वः ही अनुक्रमे प्राण, अपान, व्यान असून अन्न ही चौथी व्याहृती महः आहे. अन्नच सर्व प्राणांना महिमान्वित करते.
     अशा या भूः, भुवः, स्वः आणि महः या व्याहृतींची चार चार रूपे मिळून सोळा व्याहृती सांगून तैत्तिरीय उपनिषद उपदेशिते की, या सोळा व्याहृतींना जो तत्त्वतः जाणतो, तो ब्रह्म जाणतो आणि अशा ब्रह्मवेत्त्यासाठी समस्त देवता भेट समर्पण करतात. पुढे त्रिशंकू ऋषींचे वेदानुवचन दहाव्या अनुवाकात सुरुवातीस दिलेले आहे. 'मी या संसारवृक्षाचा समूळ उच्छेद करणारा आहे. माझी कीर्ती पर्वतशिखराप्रमाणे उन्नत आहे. अन्नोत्पादक सूर्याच्या ठिकाणी जसे उत्तम अमृत आहे तशाच प्रकारे मी अमृतस्वरूप आहे, मी प्रकाशमय धनाचे भांडार आहे, अमृताने परिसिंचित श्रेष्ठ बुद्धिमंत आहे!'...  ज्याला हे असे व्यक्तिमत्त्व लाभले तो या भूलोकात महान् ठरणारच.
      परमात्म्याचे भूतलावर अवतरण कसे होते, हे समजून घेण्यासाठीही सप्त व्याहृतींचा विचार केला जातो. तथापि, आपण माणूस म्हणून जगताना, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधून देणाऱ्या पं. सातवळेकर यांच्या या विचारांचा पाठपुरावा करणे श्रेयस्कर वाटते.