सप्त-व्याहृती...४.

भुवः           ही दुसरी महाव्याहृती. या पदात 'भुव अव कल्पते’ हा धातू आहे. कल्पना ही ज्ञानामधून निर्माण होते. भुवः चा   अर्थ  अग्नी असा असून अग्नी ज्ञानाची देवता आहे. अग्नी ज्ञानदाता, प्रकाशदाता, मार्गदर्शक आहे. तो पावक म्हणजे पवित्र करणाराही आहे. ज्ञानी माणूस लोकांना मार्गदर्शन करून सन्मार्गाने नेतो. हेच ज्ञान मनुष्याला उच्चत्व देऊन तारते. म्हणून (भूः -) 'अस्तित्वा’नंतर ज्ञानप्राप्तीची सूचना (भुवः -) हे पद देते. माणसासाठी केवळ पशूसारखे अस्तित्व नको तर त्याच्या जोडीला यशपूर्ण वैभव प्राप्त करण्यासाठी ज्ञानही हवे, हा भाव भुवः या पदातून व्यक्त होतो.

 पंडितजींनी निरनिराळ्या उपनिषदांतील कांही वचने सांगितली आहेत. (भुव इति यजुर्भ्यः।-छांदोग्य, भुव इति बाहुः।-बृहदा., भुव इत्यन्तरिक्षम्। भुव इति वायुः। भुव इति सामानि। भुव इत्यपानः।-तैती., नाभिर्भुवः।-मैत्रा., भुवोऽन्नं वायवे।-महा. ना., मध्यं भुवः।
- शिरस., यो वै रुद्रः यच्च भुवः।-शिरस., भुवो लोकस्तु जानुनोः।-नाद. ) त्यांचा भावार्थ ते विशद करतात : भुवः हे यजुर्वेदाचे सार आहे, यजुर्वेदाच्या मंत्रातून भुवः व्याहृती उत्पन्न झाली, भुवः हे बाहू आहेत (बाहू हे मानवी शरीरात कर्मशक्तीचे साधन आहे), भुवः हे अंतरिक्ष (अर्थात भूःच्या वर) आहे, भुवः हा वायू (अर्थात प्राण आहे), भुवः हे सामगानाची व्याहृती आहे (सामगायनाने मंत्रांची शोभा वाढते तद्वत ज्ञानाने जीवनाची शोभा वाढते), भुवः हे जीवनाचे महत्त्व आहे, भुवः हे नाभी तसेच मध्य आहे (जीवनात व्यवहार हा केंद्र असतो), भुवः हे अन्न तसेच वायू आहे (जीवनासाठी अन्न आणि वायू-प्राणऱ्हे अत्यावश्यक आहेत), शत्रुसंहारक रुद्र हीच भुवः ची शक्ती आहे ( ज्ञानपूर्वक कर्मानेच शत्रूचा नाश करता येतो).

 पुढे पंडितजी यजुर्वेदातील दोन मंत्र सांगतात - अयं पुरा भुवः तस्य प्राणो भौवायनो । वसंतः प्राणायनो गायत्री वासंती ॥(वाज. यजू. १३. ५४)-’हा समोर भुवः आहे. त्यापासून प्राण उत्पन्न झाला. प्राणापासून वसंत झाला नि वसंतापासून गायत्री छंद उत्पन्न झाला’, तसेच, भुवो यज्ञस्य रजसश्च नेता यत्रा नियुद्भिः सचसे शिवाभिः । दिवी मूर्धानं दधिषे स्वर्षां जिव्हामग्ने चकृषे हव्यवाहम ॥ (वाज. यजू. १३. १५, १५. २३) - 'तेव्हा तूं यज्ञाचा नि रजोलोकांचा अधिपती होतोस. जेव्हा कल्याण करणाऱ्या ज्वालांनी तूं युक्त होतोस, द्युलोकात तूं सूर्यास धारण करतोस नि यज्ञामध्ये हविर्द्रव्यांचे वहन करतोस’. पंडितजी सांगतात,   या मंत्रातून व्यक्त होत असलेली प्राणशक्ती, वसंत ऋतुचे वैभव अन गायत्री मंत्रासारखे महत्त्व हे सर्व पुरो भुवः - जो पुढे राहातो, जो नेता असतो, त्याचे ठायी दिसून येत असते. भुवः हा अंतरिक्षाचा तसाच यज्ञाचा नेता आहे. भुवर्लोक हा रजोलोक आहे म्हणजेच कर्मप्रधान आहे. म्हणून भुवः हे यज्ञस्थान आहे तसेच सर्व मानवी व्यवहाराचे स्थान आहे. म्हणून भुवः चा अर्थ 'ज्ञानपूर्वक कर्म करणे’ असा आहे. भू या धातूपासूनच भूः आणि भुवः ही दोन्ही पदे तयार झालेली असून या दोहींचा भाव वैभवयुक्त होऊन राहाणे, असा आहे. हे ज्ञानपूर्वक कर्म केल्यानेच साधते.

 या प्रथम दोन महाव्याहृतींनी ’अस्तित्वाचा’ बोध केला असल्याने येणाऱ्या एका शंकेचे निरसन पंडितजी करतात - भगवद्गीतेचे वचन आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च ।- जो जन्मतो, त्याचे मरणे आणि जो मरतो त्याचा (पुनः) जन्म होणे निश्वित आहे. याविषयी पंडितजी सांगतात, मृत्यू हा स्थूल तसेच सूक्ष्म देहास संभवतो कारण स्थूल देह हा अन्नमय असतो आणि सूक्ष्म देह हा प्राणमय असतो. या दोन्ही देहांचा बोध भूः व भुवः या दोन महाव्याहृती करून देतात. कारणदेह आणि महाकारण देह हे अनुक्रमे मनोमय आणि विज्ञानमय आहेत. ते स्वः या महाव्याहृतीने बोधित होतात. त्यांना ज्ञानपूर्वक केलेल्या कर्मांमुळे देहाच्या मृत्यूपासून बाधा येत नाही. ज्ञानप्राप्तीमुळे 'जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण करणे’ हा मृत्यूचा अर्थ रुजलेला असतो व मृत्यूचे भय संपलेले असते. उलट, त्यांच्यासाठी मृत्यू हा आनंदाचा विषय असतो. थोडक्यात, मनुष्याचे स्थित अस्तित्व ज्ञानविज्ञानामुळे आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.
                  ***